Wednesday, May 02, 2007

संथ वाहते कृष्णामाई

नदीचा आणि माझा पहिला संबंध कधी आला माहीत नाही. पण मला आठवते ते कोयना नदीमधे सुरेखा कपडे धुवायला गेली असताना तिच्या पाठीपाठी मी मम्मीला न सांगता गेलेले आणि घरी आल्यावर बराच ओरडा खाल्ला होता ते!
कराड कोयना-कृष्णेच्या प्रीतीसंगमासाठी प्रसिद्ध असल्याने नदीशी ओळख होणे अटळच होते. कृष्णा नदीशी ओळख सुरुवातीला फक्त घाटावर जाउन भेळ खाणे, जत्रेत जाऊन फ़ुगे आणणे या प्रकारातुन झाली. त्यामानाने कोयनानदी आपली वाटायची, अजुनही वाटते. त्याला मुख्य कारण म्हणजे कोयनेच्या धरणावर आमचे आण्णा इंजिनीअर होते त्यामुळे पप्पा, काका वगैरेंचे लहानपण कोयनानगरमधेच झालेले. त्यांच्याकडुन अनेक कथा ऐकुन नदी नीटच माहीत झालेली. मम्मी पण हेळवाक, कोयनानगर भागातली असल्याने तिच्याकडुन पण खुपच ऐकलेले नदीबद्दल, धरणाबद्दल. ही खळाळती कोयना! अगदी अल्लड मुलीसारखी!
लहान असताना ११ डिसेंबरला आज्जीबरोबर कोयनेला जाउन आत्याच्या समाधीला जायचो तेव्हा अत्तार अजोबांच्याबरोबर नेहेमी नदीवरुन पाणी आणलेले आठवते. तो दिवस नेहेमीच लक्षात राहील ...
कराडला आम्ही आज्जीच्या घरचा गणपती नेहेमी कोयनेमध्येच विसर्जीत करायचो. पाण्याचा स्पर्ष हवाहवासा वाटायचा. पावसाळ्याच्या दिवसात नदीला पाणी आले की दत्तमंदिराच्या मागे डोह आहे तिथे लोक वाहुन जातात वगैरे आठवते त्यामुळे दत्ताच्या देवळात जायला खुप भिती वाटायची. आम्ही जेव्हा शनिवारपेठेमधे रहात होतो तेव्हा कोयना अगदी माघेच होती. नळाला पाणी नसले की सुरेखा कपडे धुवायला नेहेमी नदीवर जायची. नदीला खुप पाणी असायचे त्या भागात. कडेला दगडावर उभे राहीले की मस्त चकाकताना दिसे. पण पाण्यात जायचे धाडस होत नसे. बरोबरची मुले सहजी पाण्यात जाऊन मस्ती करत पण माझे कधी धाडसच होत नसे.

कृष्णा नदीला पूर येणार अशा बातम्या यायला लागल्या की कॉलेजभागात रहाणा~या मुलीनाघरी सोडत असत. पण आम्ही कॉलेज्च्यामागे रहायला गेलो आणि शाळेत असताना पुर कधी आलाच नाही त्यामुळे अर्ध्या शाळेतुन घरी कधी यायला मिळाले नाही. कॉलेजमधे असताना मात्र २-३ वेळा पुर अला पण कॉलेजला जावेच लागले!! नशीब नशीब म्हणतात ते हेच बहुदा!

आमच्या गावाजवळ खोडशीचे कृष्णेवर बांधलेले एक धरण आहे. धरणाच्या सैदापुरच्या भागात एक रेणुकामातेचे मंदीर आहे. त्यादेवीची पौष महीन्यात यात्रा असते त्यामुळे आम्ही डबे बांधुन घेउन तिकडे जात असु. देवदर्शन करुन नदीकाठाला बसुन डबे खायचे, मस्त अंताक्षरी खेळायची, पाण्यात खेळायचे आणि संध्याकाळी परत यायचे. तिथे पण धरणाच्या मागच्या तलावातल्या पाण्याचा आठवतो. त्यात खेळायला नाही मिळायचे. सैदापुरमधुन खोडशीला लोक सहजी धरणाच्या भिंतीवरुन चालत जात त्याचे अप्रुप वाटे. एकदा आम्ही मुली मुली लांबच्या रस्त्याने कुठे रेणुकेला जायचे म्हणुन गावातुन नदीमधुन आलेलो. येताना आपण खुप मोठे धाडस करतोय असे वाटलेले अगदी पण घरी जाउन प्रत्येकीने ओरडा खाल्याचे दुसरे दिवशी समजले! इथली ती शांत कृष्णा अगदी मोठ्या मुलीसारखी. वाईला पाहीलेला कृष्णेचा शांतपणा अधोरेखीत करणारी...

घाटावर जाऊन कृष्णा-कोयनेचा संगम बघायला आवडायचा. पुढे महाबळेश्ररला सहलीला गेल्यावर त्यांचा उगम बघीतला. या दोघी बहीणी एकेठिकाणी उगम पाऊन वेगवेगळे मार्ग काढत, आपल्या सहवासात येतील त्या तृषार्तांना तृप्त करीत, अनेक गावे समृद्ध करत, इतर नद्यांना कवेत घेत कराडपर्यंत येतात. कित्येक वर्षांनी दोघी बहीणी कशा कडकडुन भेटतील तितक्याच कडकडुन भेटतात. तो संगम बघताना अगदी छान वाटायचे. पुढे जाताना मात्र कृष्णा नाव घेउन, शांतपणा धारण करुन त्या पुढे निघतात. ही बंगालच्या उपसागराला जाउन मिळण्यापुर्वी ही आमची कृष्णा कित्येक आयुष्य समृद्ध करुन जाते.