Friday, June 29, 2007

पत्ते, कॅरम, सुट्टी ...

मी साधारण ३री मधे असताना १ रुपायाचा ठोकळा नवीन निघाला होता. प्रत्येकवेळी सुट्ट्या पैशांबरोबर तो मिळाला की आम्ही एका डब्ब्यात साठवुन ठेवत असु. तेव्हा मधेच कधीतरी पुण्याला गेलो तेव्हा अजु-गौरीचा छोटासा कॅरमबोर्ड पाहीला आणि मला पण तो आपल्याकडे असावा असे वाटले. पण मम्मी-पप्पा एवढा छोटा बोर्ड घ्यायला तयार नव्हते. तरी माझा हट्ट चालुच होता. मग एकदा कधीतरी दुकानात गेलो असताना पप्पाना हवा तसा मोठा कॅरमबोर्ड मिळाला तर तो बाजुला ठेवायला सांगुन मग घरी गेलो आणि त्या डब्ब्यात साठलेले पैसे मोजले ते पुरेसे असावेत बहुतेक. आम्ही संध्याकाळी परत जाउन तो नवा कोरा बोर्ड घरी घेउन आलो. पण तो खुप मोठा होता म्हणुन मग मी खुप चिडचीड केलेली आठवते. त्या घराजवळ दुपारी खेळायला थोडीफ़ार मुले होती पण मम्मी खुपवेळ उन्हात खेळु द्यायची नाही. मग घरीच सुबोधबरोबर कॅरम खेळायचे. तो खुप रडारड करायचा, पण पर्याय नसे!!!
तेव्हा मी मात्र रात्रीची अगदी आतुरतेने वाट पहायचे. टीव्ही नव्हता त्यामुळे मग रेडीओवरची नाटके, गाणी काहीतरी ऐकत मम्मी पप्पा आमच्या दोघांबरोबर कॅरम खेळायचे. पप्पांना पण उत्साह असायचा खेळायचा. मी आणि पप्पा एकत्र, सुबोध आणि मम्मी. मजा यायची. सुरुवातीला मला आणि सुबोधला नीट जमावे म्हणुन मग दोन्ही हाताने खेळायला परवानगी असायची. तसेच अंगठा पण वापरु शकत असु. पण मम्मी पप्पा मात्र फ़क्त उजव्या हाताने खेळायचे. आमची मम्मी कॅरम डबल्सची कॉलेजची चॅम्पियन होती. आणि पप्पा होस्टेलमधे नेहेमी खेळत त्यामुळे त्यांना सवय होती. पप्पांचे रेबाउंड्स तर एकसे बढकर एक असायचे. हे बघत बघत खुप शिकता यायचे. मग सुबोधबरोबर दुपारी प्रॅक्टीस पण करायचे मी कधीतरी. मधुनच कधी माने काका आणि काकु रात्री एखादा डाव टाकायला यायचे. मग त्यांचा खेळ बघत बघत दिवाणवर झोपी गेलेले पण आठवते. पूर्ण उन्हाळ्याच्या सुट्टीभर असे रात्री खेळत बसलेले आठवते.

पुढे कधीतरी असेच मे महीन्यात समोरच्या घरात रहाणा~या मुली पत्ते खेळायला येते का म्हणुन बोलावयला आल्या. तेव्हा मला पत्त्यांचे घर करतात, आणि त्यात ४ प्रकारची पाने असतात ह्यापेक्षा अधिक काहीही माही नव्हती. तेव्हा पण पप्पांनी बाजारात जाउन पत्यांचे २ कॅट विकत आणुन आम्हाला शिकवायला सुरुवात केली. पहील्यांदा भिकार-सावकार पासुन सुरु झाले. मी आणि पप्पा एकत्र आणि मम्मी आणि सुबोध एकत्र असे करुन ७-८ खेळायचो. आम्ही दोघे मग दुपारी प्रॅक्टीस म्हणुन खेळायचो. भरपुर भांडण आणि मम्मीचे डोके खाउन दुपारभर दंगाच दंगा. पुढे कधीतरी त्या खेळांचा कंटाळा यायला लागला असावा. मग आम्हाला रमी कसे खेळायचे याचे शिक्षण सुरु झाले. पहील्यांदा ७ पानानी खेळायला सुरुवात कारण १३ पाने हातात मावायची नाहीत. मग सिक्वेन्स कसा लावायचा, प्युअर सिक्वेन्स कुठला असे सगळे शिक्षण सुरु झाले. कोल्हापुरला म्हणे मी अगदी लहान असताना अण्णा, आजी, अज्जारी, मम्मी, पप्पा, बाबा, डॅडी, वगैरे सगळे बसुन रात्री रमी खेळायचे. कारण तोच एक खेळ सगळ्यानी मजा करत खेळता यायचा. त्यामुळे तो पण घरात जिव्हाळ्याचा विषय होता. सगळ्या जुन्या गोष्टी ऐकत खेळायचो. त्यावर्षीपासुन मग एक दिवस पत्ते, एक दिवस कॅरम असे खेळ चालायचे रात्री.
मग एकदा सुट्टीला बेळगावला गेले तेव्हा मात्र झब्बु, लॅडीस, नॉट-ऍट-होम असले तुफ़ान प्रकरणे शिकुन आम्ही परतलो होतो. आणि तेव्हा सगळी चुलत भावंडे एकमेकांशी इतके भांडायचो पत्याच्या खेळावरुन की एकदा आत्याने रागवुन घरातले सगळे कॅट चुलीत भिरकावलेले होते. तरी आमच्याकडे दुसरेदिवशी परत पत्ते बघुन घरच्यानी फ़क्त डोक्याला हात मारला होता!
पुढे कधीतरी अजु सुट्टीसाठी कराडला यायचा. तोपर्यंत पप्पा थोडेफार कंटाळलेले असायचे खेळायला. कारण त्यांना वाचन करायचे असायचे. मग आम्ही त्यांना वाचन करायला सोडुन वर गच्चीवर जायचो. रम्मी तोपर्यंत फार बोअरींग वाटायला लागली होती कारण लॅडिसची गोडी लागलेली. मग ३२ कळ्या=१ लाडू, वक्खय, हुकुम असली प्रकरणे म्हणजे धमाल! रात्री १२ वाजेपर्यंत आम्ही धुमाकुळ घालयचो. कधीतरी आवाज खुप मोठा झाला की मग पप्पा ओरडायचे बास आता झोपा! की आम्ही तेवढ्यापुरते शांत आणि मग परत ये रे माझ्या मागल्या! मग सकाळी उठुन परत एकदा ओरडा खायचा! पप्पा कॉलेजला गेले की मग अंजु, माणिक वगैरे यायचे मग परत आमचे पत्त्याचे डाव बसायचे. माणिक खुप चीटींग करायची मग सुबोध आणि तिची भांडणे! तो १० वर्षाचा आणि ती २५ - बघायाला प्रचंड मजा यायची.
हे आमचे पत्त्यांचे, कॅरमचे वेड साधारण मी १२ वी मधे जाईपर्यंत होतेच. दर सुट्टीमधे पत्ते बाहेर यायचे कपाटातुन. दारामागुन कॅरम बाहेर निघायचा. दुपारी रात्री डाव बसायचे. १२ वी नंतर परीक्षाच जुनमधे संपायच्या. आम्हाला सुट्ट्या लागेपर्यंत बाकी सगळ्यांच्या शाळा सुरु. तोपर्यंत टीव्हीची पण चटक लागलेली असल्याने रात्रीचे डाव पण बंद झलेले.

परवा ऋचाबरोबर उनो खेळताना मला माझ्या लहानपणीची आठवण आली. पत्ते खेळताना केलेला दंगा, भांडणे आठवली. चटकन डोळ्यात पाणी आले. आता तशा सुट्ट्याही मिळणार नाहीत आणि मिळाल्यातरी बाकीची सगळी कामे सोडुन पत्ते खेळणे होणारही नाही!

Saturday, June 23, 2007

कुर्म्याची गोष्ट

मी M. Sc. ला दुस~या वर्षाला असतानाची गोष्ट. आम्हाला आमच्या सिनिअर मुलीनी पन्हाळा इथे नेउन welcome पार्टी दिलेली. त्यामुळे आम्हाला पण त्यांना going away पार्टी द्यायची होती. त्या ६ मुली होत्या आम्ही १८!! त्या सहा मुलीनी सगळे व्यवस्थीत organize केले होते. आम्ही अगदी उत्साहाने कुर्मा भाजी आणि पुरी करायची असे ठरवले. लोकल मुलीनी पु~या करुन आणायच्या आणि होस्टेलच्या मुलीनी कुर्मा भाजी करायची असेही ठरले. रेसीपी बहाद्दर मी. स्वयंपाकाची सवय असलेल्या म्हणजे मी, वंदना, शारदा आणि थोडीफ़ार स्वाती! शुक्रवारी रात्री जाउन राजारामपुरीमधुन भाजी आणायची आणि शनीवारी सकाळी लवकर उठुन भाजी करायची ठरले.
संध्याकाळी भाजी आणायला गेलो तर पिशवी कमी पडली. त्याकाळी भाजीवाले प्लास्टीकच्या पिशव्या देत असत. तर आम्ही भाजी घेतली आणि पिशवी दे म्हणले तर म्हणे आठ आणे पडतील. थोडी घासाघीस केली तरी ऐकायला तयर नाही. मग वंदना म्हणे ए तुझी ओढणी आहे ना चल त्यात बांधुन नेऊ! मी आणि भाजीवाला दोघेही आवाक! तिने खरोखर माझी ओढणी घेउन त्यात टोमॅटो बांधले. दुस~या कोप~यात कोथींबीर, खोबर्याचे तुकडे बांधले आणि चलत होस्टेल गाठले.
सकाळी उठुन सामान काढले आणि लक्षात आले की रूममधल्या स्टोववर हे प्रकरण होणार नाही. मग अंजुला थोडी गळ घातली कारण ती त्यावेळी मेसची मॅनेजर होती. तिने मामाना जाउन सांगितले. मामानी आपल्या तारस्वरात किंचाळुन काय काय सुचना केल्या. कांदा वगैरे कापलेले होतेच. मेसचा तो भलामोठा गॅस सुरु करुन त्यावर ती अवाढव्य कढई तापायला ठेवली. तेल घातले ते त्यात दिसेचना. मामा हसायला लागले. म्हणे एवढ्याश्या तेलाने काय होणार मग त्यांनी त्यात तेल घातले. त्यात कांदा घालुन मी ते मोठ्या उलतण्याने भाजायला घेतले. मी आणि शारदाने ते करायचे असे ठरले होते. तेवढ्यात तिला नवरोबाचा फोन आला! आमच्या लक्षात आले ही काय आता कमीतकमी अर्धातास तरी येत नाही. मग वंदना आली मदतीला. स्वाती आणि वैशाली राहीलेले बटाटे वगैरे कापायला सुरुवात केली. मसाला भाजुन झाला आणि लक्षात आले मेस मधे मिक्सर नाही!!! मग आमची तंतरली. आता एवढा घाट घातलेला त्याचे काय करायचे. मामा म्हणाले पाटा आणि वरवंटा आहे तो घेउन करा सुरु. मी कधी ते वापरले नसले तरी करावे लागणारच होते. परत वंदना आली मदतीला. तिला पाट्याची खुप सवय होती. मग तिने थोडे आणि मी थोडे असे करत मसाला वाटला. मग पुढचे काम सोपे होते. असे करत साधारण २ तासानी आमचा कुर्मा तयार झाला. मामा बघायला आले तर एकदम खुष! कारण त्यांना वाटत होते आम्ही सगळे अर्धवट टाकुन गायब होऊ म्हणुन. आम्ही सगळे मोठ्या भांड्यात केले म्हणुन कुर्मा पण खुप झालेला. मग मामाना थोडा चवीला ठेवला, अंजु, सुरेखा आणि विभावरीसाठी थोडा काढुन ठेवला. तयार होऊन बसलो तर भुक लागली. लोकल मुली आल्या नव्हत्या. सिनीअर पण अजुन आल्या नव्हत्या. मग काय मामांना सांगुन ४ चपात्या आणल्या आणि मस्त पैकी त्या मेहेतीने केलेल्या कुर्म्याचा आस्वाद घेतला!! जेव्हा बाकीच्या गॅंगला कळले की आम्ही इतक्या मेहेतीने केलेय सगळे तेव्हा त्या सगळ्यांनी पण तितक्याच झपाट्याने फडशा पाडला.

परवा cruise वर भारतीय मेनु मधे कुर्मा केलाय असे जेव्हा शेफ आदित्य ने सांगीतले तेव्हा मला आमच्या कुर्म्याची आठवण आली कित्येक वर्षानी.