Wednesday, July 18, 2007

अविनाश धर्माधिकारी

गेल्या शनिवारी अविनाश धर्माधिकारी यांचे भाषण ऐकण्याचा योग आला. त्यांचा हा बे एरीया मधला तिसरा कार्यक्रम आणि मला हे तिनही कार्यक्रम पहायचा आणि ऐकायचा योग आला. मला हा कार्यक्रम तितकासा आवडला नाही कारण नसलेले नाविन्य! आणि मुख्य म्हणजे महाराष्ट्र मंडळाच्या कार्यक्रामात दिसणा~या सर्व चुका परत एकदा दिसल्या. जवळपास ३०% लोक लहान मुलाना घेऊन आले होते आणि त्यांची रडगाणी सतत चालु होती आणि आईवडीलांजवळ थोडीसुद्धा courtsey नव्हती की आपल्यामुळे लोकाना त्रास होतोय तर बाहेर घेउन जावे. महाराष्ट्र मंडळाची निवेदिका बोलताना आपण घरगुती गप्पा मारतोय ह्या पद्धतीने निवेदन करत होती. शेवटी म.मं.च्या नेहेमीच्या सवयीप्रमाणे त्यांनी ह्यावर्षीच्या सगळ्या कार्यक्रमांची जाहीरात करुन घेतली!

आता थोडे भाषणाविषयी! धर्माधीकारींचे स्वत:चे कार्य, व्यक्तीमत्व इतके मोठे आहे की त्याविषयी कधीही ऐकायला कंटाळा येत नाही. पण हा कार्यक्रम न आवडण्याचे मुख्य कारण असे की जाहीरात करताना २०२० चा भारत अशी केली होती आणि त्याबद्दल एकही वाक्य ते बोलले नाहीत. त्यांना न विचारताच कार्यक्रमाचे नाव जाहीर केले होते की काय अशी शंका आली. सुरुवात करताना त्यांनि असे जाहीर केले होते की शेवटी चर्चेसाठी वेळ राखून ठेवण्यात येईल पण तेवढा वेळच पुरला नाही. शेवटी ३ लोकानी चाणक्य मंडळाच्या कार्याबद्दल सांगण्याचे प्रयोजन काय हे कळले नाही. ते जे बोलले त्यातले मला जवळपास ४०% आधीच्या भाषणांमुळे, त्यांच्याबद्दल इतर कुठे वाचल्यामुळे माहीती होते. परत ऐकण्यात स्वारस्य नव्हते असे नाही पण नवीन ऐकायला जास्त आवडले असते. या माणसाचे कार्य प्रचंड आहे आणि आधी केले मग सांगीतले असे असल्याने प्रभाव जस्ती पडतो हे पण तितकेच खरे. स्वत:च्या कामावर त्यांचा प्रचंड विश्वास आहे आणि स्वत:चे कठोर परीक्षण करण्याची बुद्धी आहे. ३ वर्षांपुर्वी ते आलेले असताना त्यांनी भारताचा स्वयंपूर्णतेकडे होणारा प्रवास उदाहरणे देउन सांगितलेले आठवतेय. त्यापद्धतीने ते बोलले असते तर ते जास्त सयुक्तीक ठरले असते. हे भाषण आनंद निश्चीत देउन गेले, दुपारी घरी डुलक्या घेण्यापेक्षा काहीतरी चांगले ऐकल्याचे समाधान मिळाले. आणि इतर देशातुन येणा~या वक्त्यांपेक्षा त्यांचा ’तुम्ही इथे राहुनही आपल्या देशासाठी काहीतरी करु शकता’ हा दिलासादायक सुर पण आवडला. आणि इथे रहातो म्हणुन खिल्ली उडवणे, इथे येउन फ़क्त मदतीची अपेक्षा न करणे हेही वेगळे जाणावले.

शेवटी बाहेर पडल्यावर जाणवलेले आणि अजुनही सतत जाणवत रहाते ते म्हणजे ह्या माणसाची दुर्दम्य इच्छाशक्ती, आपल्या देशाबद्दलची श्रद्धा, देश एक महासत्ता होऊ शकेल हे स्वप्न उराशी बाळगुन आपण त्यादृष्टीने काय करु शकतो ह्याची जाणीव करुन देणारा प्रचंड आशावाद, कार्यकर्ता कसा असावा ह्याबद्दलची स्पष्ट आणि पडखर मते. आपल्या कार्याबद्दलची आत्मीयता आणि तळमळ. या आणि कदाचीत फ़क्त याच कारणांसाठी कदाचीत मी कित्येकवेळा हा कार्यक्रम पहायला-ऐकायला जाईन.