Monday, February 23, 2009

सिंधुताई सपकाळ अर्थात माईंशी अनौपचारिक गप्पा

सिंधुताई सपकाळ यांच्याबरोबर अनौपचारीक गप्पा मारण्याची संधी गेल्या आठवड्यात मिळाली त्यातील काही भाग मयबोलीवर लिहिला आहे -

http://www.maayboli.com/node/5987

Sunday, February 22, 2009

केळीच्या बागा

Kelicha bag
पहिलीला असताना आम्हाला 'केळीच्या बागा मामाच्या' ही कविता होती. मस्त घड लगडलेल्या केळीच्या झाडाचे एक चित्र होते त्या कवितेशेजारी. ती कविता आणि ते चित्र माझ्या इतकी वर्षे झाली तरी मनात घर करुन राहिलेय. आमच्या मामांच्या परसात अगदी केळीच्या बागा म्हणण्या इतकी नसली तरी बरीच झाडे होती. आता केळीच्या झाडाला झाड म्हणायचे की नाही हा मुद्दा वेगळा! आज्जी, मामा आणि आम्ही एकाच गावात रहात असल्याने अजोळी जाउन रहायचे सुख खुप कमी. पण आज्जीकडे जाउन जेवणे वगैरे नेहेमीचेच त्यातल्या त्यात मी अगदी लहान असताना तरी जास्तीच. घरी खुप मामा शिकणारे, दुकान चालवणारे त्यामुळे भांडी पण खुप पडायची घासायला तशात भांडीवाली टिकणे मुश्किलिचे. या सगळ्यामुळे असेल मला आज्जीकडचे लहानपणी जेवलेले जे आठवतेय ते केळीच्या पानावरचेच. घरातलीच पाने असायची त्यामुळे कधीही काढली जायची. शक्यतो वार्याने वगैरे फाटलेली पाने पहिल्यांदा काढली जायची. केळीचे पान किंवा कोणताही भाग कापला की चिक गळतो आणि त्या चिकाचा डाग एकदा कपड्यांना लागला की कपडा फाटेल पण डाग जाणार नाही. त्यामुळे मामा लोकांना आज्जी सतत बजावुन सांगायची. केळीच्या झाडाचा परिचय हा असा. त्यामुळे केळीच्या पानात जेवणे म्हणजे आजोळची आठवण हे समिकरण बरेच दिवस होते. पुढे काही कारणांमुळे आजोळी जाणे एकदम बंदच झाले, केळीच्या पानांवर जेवणे फक्त मनातच राहिली.


माझा भाऊ लहानपणी बरेचदा अजारी असायचा. त्याच्या पथ्यासाठी आमच्याकडे केळी, पेरू, बोरे, चिंचा असले प्रकार कधी घरी आले नाहीत. मम्मी-पप्पांनी एक ठरवले होते की जे काही करु ते दोघांचे सारखेच. त्यामुळे त्याला चालत नाही म्हणुन मग मलादेखील नाही. मी कधीतरी हट्ट केलाच असेल तरीपण त्यांनी कधी मानले नाही आणि मला त्याचे पुढे काही वाटेनासे पण झाले. तया सगळ्यामुळे झाले काय तर लहान असताना शिकरण चपातीचे जेवण असल्याचे आठवतच नाही त्याऐवजी गुळ तूप पोळी, तूप साखर पोळी असे बरेचदा असे.दरम्यान आमचे स्वतःचे घर बांधुन झाले. मग घराभोवती कोणती झाडे लावायची असा विचार चालु असताना आमचा वॉचमन पलिकडच्या शेतातुन १-२ केळीचे अगदी बारके कोंब घेउन आला. ते जगतील अशी काही त्यांची परिस्थिती नव्हती पण असुदे लावुन पाहुयात असे ठरवुन जमिनीत रोवले. घरच्या धुण्या भांड्याचे पाणी, शेतातली काळी माती यामुळे असेल १५ दिवसात तेच कोंब मस्त तरारले आणि बघता बघता मोठे देखील झाले. केळीच्या झाडाचे एक असते की एक झाड नीट जगले की त्यालाच शेजारी शेजारी झाडे येत रहातात. त्यामुळे एकदा केळीचे एखादे रोप लावले आणि ते नीट वाढले तर शक्यतो घरातले केळिचे झाड हटत नाही. आमच्या केळीला पहिला घड धरला तेव्हाचा आनंद अजुन आठवतो. घड धरुन लहान लहान फण्या लागल्या. एकेदिवशी आम्ही शाळेला गेलो असताना मम्मीने लहान कोका काढुन आणला तेव्हा आम्ही केलेला गोंधळही आठवतोय. कशाला काढला, आपल्याला अजुन केळी मिळाली असती की वगैरे वगैरे. मम्मीने नीट कारणे सांगुन व्यवस्थित पटवुन दिले होते की हे करणे कसे चांगले आहे.

Kelphul

केळ अशी परत आमच्या आयुष्यात आली. घरच्या केळफुलाची भाजी करताना मम्मीने मला केळफूल कसे सोलावे, कसे ताकाच्या पाण्यात घालुन त्याचा काळेपणा कसा घालवता येतो वगैरे वगैरे. त्यावेळी मम्मीचा खुप राग यायचा कशाला हे सगळे माहिती पाहिजे म्हणुन. पण त्यावेळी तिने ब-याच गोष्टी दाखवल्यामुळे, सांगितल्यामुळे आज कधी अडचण पडत नाही. पुढे घरच्या केळीचा घड काढताना केळ पण कापावी लागते हे कळले. तेव्हा अक्खे झाड काढायचे म्हणुन खुप वाईट वाटलेले. पण मामा, मम्मीचे म्हणणे की त्या केळीच्या झाडाला परत घड येत नाही यामुळे ते काढावेच लागते. तेव्हा पण वाईट वाटले होते. येवढे झाड वाया जाणार म्हणुन. पण तेव्हाच लक्षात आले केळीचे झाड अज्जिबात वाया जात नाही. पाने जेवायला वापरतात. बुंध्याचे सोप काढुन भाज्याच्या पेंड्या बांधायला वापरतात. काही काही बायका केळ पाडल्यावर त्यातुन जो पांढरा चिक गळतो तो पापडाचे पीठ भिजवायला वापरतात. उरलेले झाड गाई-म्हशी वगैरे जनावरे संपवुन टाकतात. घड काढुन आणल्यावर तो थोडावेळ बहेर ठेवायचा कारण त्याचा चिक पडुन फरश्या खराब होतील म्हणुन. पुढे केळी पिकुन पोटात जाईपर्यंत रोज तो घड एकदा सकाळी उठल्या उठल्या आणि शाळेतुन परत आल्यावर पहायचा. वेलची केळी असल्यामुळे रंग आणि चव दोन्ही अप्रतीम होती. एवढी झाडे असुनही केळीच्या पानावरील जेवणे मनातच राहिली. पुढे दर आठवड्याला एक घड या हिशोबाने केळी मिळत तरीदेखील कंटाळा आला नाही कधी. निम्मा घड कोणाकोणाला देण्यात तर निम्मा घड घरी अशी वाटणी असल्याने कधी कंटाळा आला नाही.

Pangat

अलिकडे भुसावळ-जळगावला जायचा योग आला. तेव्हा केळीच्या बागेचे फोटो काढायचे अगदी ठरवुन गेले होते. त्यामुळे तिथे गेल्या गेल्या सगळ्यांच्या मागे तीच भुणभुण लावली होती. आणि त्याचवेळी घरच्या भांडीवालीने दांडी दिल्यामुळे घरी केळीची पाने जेवायला आणली गेली. मग मला आवडते म्हणुन मग नाष्टा, जेवणे सगळेच केळीच्या पानावर मिळु लागले. अगदी पुरणपोळी, साबुदाणा खिचडी पासुन ते शेतात केलेल्या पिकनीकचे जेवण देखील केळीच्या पानावर जेवण. केळीच्या पानावर अगदी मनसोक्त जेवले ब-याच वर्षांनी. केळीच्या बागेचे, केळीच्या घडाचे, कोक्याचे(केळफुलाचे) फोटो काढले.येवढेच नव्हे तर कच्च्या केळ्याची भाजी, केळफुलाची भाजी, कच्च्या केळ्याचे वेफर्स, कच्च्या केळीच्या पिठाचे थालीपीठ असले सगळे प्रकार खायला देखील मिळाले.