Saturday, September 02, 2006

॥ गणपती बप्पा मोरया ॥घरी मम्मी पप्पा गणपती बसवायला लागुन जवळपास आता २० वर्षे तरी होत आली. गणपती माझ्या अतीशय आवडीचा देव. तसा तो सगळ्यांचाच असतो म्हणा. गेल्या ७ वर्षातल्या गणपतीला मी भारतात नाहीये. माझ्या पद्धतीने मी माझ्यापुरता गणपती साजरा करते. सकाळी उठुन दुर्वा काढुन आणणे, त्या निवडुन नीट त्याच्या जुड्या बनवणे, फुले काढुन आणणे, रांगोळी काढणे असले उद्योग करत सकाळ जायची. घरात मम्मी नंदादीप ठेवते मग त्यात तिला मदत करणे. फ़ुलवाती, कापसाची वस्त्रे करणे ह्यात पण मम्मीला मी आवडीने मदत करायचे. अता ते काही करत नाही- करावे वाटते पण ...
मला माझ्या आठवणीतले खुप गणपती कोल्हापुरला किंवा पुण्याला आजी जिथे असेल तिथे असायचे ते पण आठवतात. आम्ही सुट्टी घेउन जायचो. आजी गेल्यावर मग पुण्यात काकांच्याकडे असायचा गणपती ते पण आठवते. पण लक्षात राहीलेला एक गणपती - मी फ़क्त २ वर्षाची होते, कोल्हापुरच्या घरात बसवलेला गणपती, अण्णा करत असलेली पुजा अंधुक आठवते. बाकी काही नाही आठवत. मग अण्णा गेल्यानंतर पप्पा आणि कडगावच्या अज्जांबरोबर जाउन आणलेला गणपती, घरातली पुजा, विसर्जनाला मी हट्टाने गेलेले, घरचा गड्याने, नागाप्पाने, गणपती विसर्जन करताना वाईट वाटलेले अजुन आठवते.
कराडला जेव्हा आम्ही स्वत:च्या घरी रहायला आलो तेव्हा आणलेला पहीला गणपती पण आठवतो. मी आणि मामा गेलो होतो आणायला. पाउस पडत होता. आणि बसमधुन चिखलातुन सावरत आणलेला गणपती आठवतो. रात्री आम्ही चौघे मिळुन गणपतीची आरास करायचो. खुप आरास नसायची मग ते सगळे मी वेगवेगळ्या flower arrangements करुन सजवुन टाकायचे. रोजाचे पंचाम्रुत करायचे काम माझ्याकडे असायचे. ऋषीपंचमीला मम्मी सकाळी भजनाला पाथवायची ते पण आठवते. त्यादिवशी जाताना आजीसाठी आमच्या बागेत पिकवलेली भाजी आजिच्या उपसासाठी बरोबर न्यायचे. मग मम्मी संध्याकाळच्या भजनाला जाताना मग परत आजीसाठी काहीतरी घेउन जायची.

मामांकडचा गणपती अप्पाअसेपर्यंत ते घरीच बनवायचे. त्याचे ते साचे वगैरे सगळे ते नीट ठेवायचे श्रावणातच त्यांची मूर्ती बनवायची गडबड सुरु व्हायची. गौरीचे मुखवटे पण ते घरी बनवायचे. शाळा असल्यामुळे सगली प्रोसेस कधी पूर्ण पहायला नाही मिळाली पण घरी बनवलेला गणपती असल्याने आजीकडच्या गणपतीची मजा वेगळीच असायची. मामा लोक अगदी मन लावुन साग्रसंगीत आरास करायचे. मुंबईला असलेले मामा नेहेमी गणपतीला सुट्टी काढुन घरी यायचे. विसर्जनाच्या दिवशी मग एक मामा पप्पांच्या मदतीला घरी येणार मग आमचा गणपती विसर्जन करुन, प्रसादाची खिरापत वाटुन मग आजीकडचा गणपती पोचवायला मग मी आणि कधीतरी सुबोध मामांकडे जायचो. आम्ही नदीपासुन दुर रहायचो म्हणुन मग आमचा गणपती विहिरीमधे विसर्जन करायचो. मामांचा गणपती मात्र नेहेमी नदिवर मग धाकटा मामा अगदी नदीमधे आत जाउन गणपती विसर्जन करायचा. पण आम्हा पोराना मात्र नदिच्या पाण्यात पाय घालायची पण परवानगी नसायची. कारण कोयना दुथडी भरुन वहात असायची, बरेचदा विसर्जनाच्यावेळी पऊस पण असायचा. आजीकडचे विसर्जन होईपर्यंतजवळ्पास रात्रीचे साडेसात वाजायचे. खिरापत घेउन मग घरी येत असताना मग मामालोकांच्या डोक्यात गणपती पहायला जायचे विचार यायचे. मग एक मामा सायकलवरुन मम्मीला सांगायला घरी सुटायचा. मग आजीकडेच जेउन रात्रभर गणपती बघुन मग आजीकडे झोपायचे मग कोणीतरी मामा सकाळी ८ वाजता घरी सोडायचा. आजीच्या बरोबर तिच्या अंथरुणात झोपायला मस्त वाटायचे. सकाळी जाग यायची ती आजी गणपतीचे सगळे आवरुन ठेवत असायची त्याचे आवाज ऐकतच.

सहावी ते जवळपास बारावी पर्यंत जवळपास हाच कार्यक्रम असायचा. नंतर हे सगळे कधी आणि का बंद झाले ते पण समजले नाही. दरवर्षी गणपती मधे ह्या सगळ्या आठवणी जाग्या होतात, कधी हसु येते कधी रडु येते. सगळ्याच्या आठवणी येतात. अजोबानी केलेले गणपती आता पहायला नाही मिळणार म्हणुन वाईट वाटते. पण माझा गणपती बाप्पा येताना माझ्यासाठी सहत्रावधी आठवणींचे मोदक घेउन येतो हेच मला खुप महत्वाचे वाटते.