Sunday, September 28, 2008

बागेतला फेरफटका

शनिवारी रविवारी कधी नव्हे ते थोडा वेळ मिळाला बागेत चक्कर टाकायला. आमच्या रोझमेरीला आलेली फुले त्यावरच्या मधमाश्या, तुळशीच्या झाडाला आलेल्या मंजि-या, लॅव्हेंडरची जांभळी फुले, टोमॅटोची वाढती झाडे, काकडीच्या वेलावरचे लेडी बग्ज, आळुच्या बारक्याश्या पानांवरचे दवबिंदु ही निसर्गचित्रे पहायला मिळाली. माझ्या तोकड्या फोटोग्राफीच्या बळावर काढलेले हे फोटो.Thursday, September 11, 2008

हायकू

कविता हा माझा प्रांत नोहे. पण परवा सुमेधाचा ब्लॉग आमच्या 'ह्यांना' दाखवत होते तिथे साखळी हायकुचे पोस्ट वाचले. त्याने त्याचवेळी थोडावेळ डोके चालवुन हे कागदावर उतरवले त्याला पण आता ८-१० दिवस होऊन गेले. मला ब्लॉगवर टाकायला आज सवड(?) मिळाली.

क्षितिजावर सोनेरी रंग कुंभ उधळिला
पुष्पोदरी भृन्ग विसावला

~ सं.पा.

Wednesday, September 03, 2008

मंगलमुर्ती मोरया!

वक्रतुंड महाकाय सुर्यकोटी समप्रभ|
निर्विघ्नं कुरुमे देवं शुभकार्येशु सर्वदा||

Hand Painted Ganesh

मला गणपतीच्या मुर्ती, फोटो जमवायचे अतोनात वेड होते. सध्या काही दिवस ते थोडे थांबवले आहे. ही तीन चित्रे पुण्याच्या एका मुलाने काढलेली आहेत. मला आवडतात म्हणुन माझ्या एका मैत्रिणीने माझ्यासाठी आणली. कडेच्या फ्रेम मला हव्या असलेल्या रंगाच्या न मिळाल्यामुळे मी साध्या फ्रेम्स आणुन रंगवल्या आहेत. आज घरी गणापती बसले. त्यामुळे सकाळी लवकर उठुन पुजा केली दोघानी. मग नैवेद्य बनवुन ऑफिसचे काम केले. रात्री दोन मित्रआरतीला आणि जेवायला होते. अगदी देशातल्या गणपती उत्सवासरखे वाटले मला तरी.

घरच्या गणपतीचे फोटो इथे टाकावे वाटत नाही म्हणुन मग माझ्या आवडीच्या या तीन चित्रांचा फोटो आज गणपती निमित्ताने देतेय. सोबत मोदक आणि तुपाची वाटी. माझ्या अज्जीकडे मोदकाचा आकार असा असतो. आम्ही याला फुलपाखराचे मोदक म्हणतो. सकाळी मोदक करताना आज्जीची खुप आठवण झाली म्हणुन मग तिच्या प्रकारचे मोदक केले.

Modak va toop

Wednesday, August 27, 2008

आवडलेले थोडे काही ...

संवेदचा कवितांचा खो एकदा धाडसाने(!) परतवुन लावला तर गिरीने दिलाच. माझे कवितांचे वाकडे अजिबात नाही. साध्या सोप्या कवीता कळतात देखील. पण कवितांची भीती का आणि कशी बसली माहिती नाही. तरी आवडलेल्या दोन(च) कवीता इथे देतेय. त्याआधी संवेदने लिहिलेले नियम परत डकवते इथे -

१. कविता आवडते पण पुर्ण आठवत नाही आणि हाताशी पुस्तकही नाही? हरकत नाही, आठवतं तेव्हढं लिहा. कवीचं नाव मात्र आवश्य लिहा

२. एक से मेरा क्या होगा सिन्ड्रोम? या वेळी तुम्ही तुमच्या सध्या आवडणारया टॉप २ कविता लिहु शकता आणि कवितांच्या प्रमाणात खो देखील देऊ शकता. जेव्हढ्या कविता तेव्हढे खो (जास्तीजास्त अर्थात २)

३. खो खो नीट चालवण्याची जबाबदारी अर्थात सारयांचीच. त्यामुळे तुमच्या पोस्ट मधे तुम्ही ज्या/जिला खो देताय, त्या/तीचं नाव तर लिहाच, शिवाय त्या/तिच्या ब्लॉगवर ही खो दिल्याची नोंद आवश्य करा

४. कविता का आवडली किंवा कवितेचा अर्थ किंवा काहीच स्पष्टीकरण आपेक्षित नाही

५. अजून नियम नाहीत :)

१. गवतफुला -

रंग रंगुल्या सान सानुल्या गवत फुला रे गवत फुला
असा कसा रे मला लागला सांग तुझारे तुझा लळा
मित्रांसंगे माळावरती पतंग उडवीत फिरताना
तुला पाहीले गवतावरती डुलता डुलता झुलताना
विसरुन गेलो पतंग नभीच अन विसरुनी गेलो मित्रांना
पाहुन तुजला हरखुन गेलो अशा तुझ्या रे रंगकळा
हिरवी नाजुक रेशिम पाती दोन बाजुला सळसळती
नीळ निळुली एक पाकळी पराग पिवळे झगमगती
तळी पुन्हा अन गोजिरवाणी लाल पाकळी खुलती रे
उन्हा मधे हे रंग पहाता भान हरपुनी गेले रे
पहाटवेळी अभाळ येते लहान होउनी तुझ्याहुनी
निळ्या करानी तुला तुला भरविते दवमोत्यांची कणीकणी
वारा घेऊन रूप सानुले खेळ खेळतो झोपाळा
रात्रही इवली होउन म्हणते अंगाईचे गीत तुला

मलाही वाटते लहान लहान होऊनी तुझ्याहुनही लहान रे
तुझ्या संगती सदा रहावे विसरुनी शाळा घर सारे
तुझी गोजीरी शिकुन भाषा गोष्टी तुजला सांगाव्या
तुझे शिकावे खेळ आणखी जादू तुजला शिकवाव्या
आभाळाशी हट्ट करावा खाऊ खावा तुझ्यासवे
तुझे घालुनी रंगीत कपडे फुलापाखरा फसवावे
रंग रंगुल्या सान सानुल्या गवत फुला रे गवत फुला
असा कसा रे मला लागला सांग तुझारे तुझा लळा

~ शांता शेळके.

२. नको नको रे पावसा -

नको नको रे पावसा असा धिंगाणा अवेळी
घर माझे चंद्रमौळी आणि दारात सायली ॥

नको नाचू तडातडा असा कौलारावरून
तांबे, सतेली, पातेली आणू भांडी मी कुठून ॥

नको करू झोंबाझोंबी माझी नाजूक वेलण
नको टाकू फूलमाळ अशी मातीत लोटून ॥

आडदांडा नको येऊ झेपावत दारातून
माझं नेसूचं जुनेरं नको टाकू भिजवून ॥

किती सोसले मी तुझे माझे एवढे ऐक ना
वाटेवरी माझा सखा त्याला माघारी आण ना ॥

वेशीपुढे आठ कोस जा रे आडवा धावत
विजेबाई कडाडून मागे फिरव पांतस्थ ॥

आणि पावसा, राजसा, नीट आण सांभाळून
घाल कितीही धिंगाणा मग मुळी न बोलेन ॥

पितळ्याची लोटीवाटी तुझ्यासाठी मी मांडीन
माझ्या सख्याच्या डोळ्यांत तुझ्या विजेला पूजीन ॥


-- इंदिरा संत


माझा खो स्वाती अंबोळे आणि उपासला ...

(दो से मेरा क्या होगा! हा सिंड्रोम मला होईल असे अजिबात वाटले नव्हते. पण झाले तेव्हा प्रचंड आनंद झाला!)

Sunday, June 08, 2008

Why Raw?

मागच्या एका पोस्टमधे मी Raw Food खात होते असा उल्लेख होता. त्यावर ब-याच लोकानी प्रश्न विचारले होते. त्याला उत्तरे द्यायचा हा छोटासा प्रयत्न. ही मझी स्वत:ची मते आहे. तुम्हाला स्वत:वर यातले काहीही प्रयोग करायचे असल्यास स्वत:च्या जबाबदारीवर आपल्या डॉक्टरच्या सल्ल्याने करावेत. Mints याबाबतीत कशासही जबाबदार नाही.

मी David Wolfe या raw Foodist च्या सेमिनार ला गेले होते. त्याची यामागची भूमिका बरीचशी अशी आहे -

१. शाकाहार हाच मानवाचा मूळ आहार आहे. मानवाचे दात, सुळे, दाढा मांस भक्षणासाठी तयार झालेल्या नाहीत. तसेच शरिरात तयार होणारे पचनरस हे शाकाहारासाठी योग्य असेच तयार होतात. शाकाहार याचा अर्थ प्राणीजन्य पदार्थ जसे दूध, दूधापासुन तयार होणारे पदार्थ, मध, मासे, कोणत्याही प्रकारचे मांस हे शरीरास कोणतेही जीवनावश्यक घटक पुरवत नाही. Calcium, Vitamin D वगैरे घातलेले दूध बाजारात मिळते आणि ते शरीराला कसे चांगले आहे याचा बराच प्रचारही केलेला आढळतो. तसेच या प्राण्यांचे दूध आणि मांसासाठी जे वेगवेगळ्या पद्धतीने torture केले जाते तो भागही किती un-humane आहे हे आपण संगीताच्या ब्लॉगमधे वाचले आहेच.

२. पदार्थ घेताना शक्यतो organic घ्यावेत. किटकनाशके, जंतुनाशके, अनेक प्रकारची रासायनीक खते वापरल्यामुळे पालेभाज्या, फळभाज्या, वेगवेगळ्या प्रकारची फळे यामधले बरेचसे जीवनावश्यक घटक नष्ट होतात. त्यामुळे शरीरास आवश्यक असणारी जीवनसत्वे मिळत नाहीत.

३. आधीच असा किटकनाशकांनी भरलेला, खतांवर वाढलेला भाजीपाला पुढे शिजवला तर त्यातली शिल्लक राहीलेली जीवनसत्वे नष्ट होतात. त्यामुळे आपण जे अन्न खातो त्याचा शरीरला पोषणाच्या द्रुष्टीने काहीही उपयोग होत नाही.

४. ११५ डिग्री फॅरेनहाईट्च्यापुढे तापवलेले अन्न हे शिजवलेले अन्न समजले जाते. या तापमानापर्यन्त कच्च्या पदार्थामधील घटकद्रव्ये टिकून रहातात.

५. कोणत्याही प्रकारचे तेल जर 'Expeller Process' ने काढले असेल तर त्यामधले जीवनसत्व टिकून रहाते. व्यावसायीक जे तेल काढले जाते ते 'solvent based extraction या पद्धतीने काढले जाते. या पद्धतीमधे बरीच हानिकारक द्रव्ये तेलामधे मिसळली जातात. त्यामुळे तेल दुकानामध्ये अनेक दिवस राहिले तरी खराब होत नाही. पण त्यामधे मिसळलेल्या अनेक प्रकारच्या stabilizers आणि solvents मुळे शरिराला अपाय होऊ शकतो.

६. या सर्व कारणांमुळे नैसर्गीकरित्या वाळवलेले पदार्थ जसे फळांच्या काप, वेगवेगळ्या तैलबीया खाणे हे शरिरासाठी अत्यंत पोषक समजले जाते.

७. बाजारात ज्याप्रकारचे चॉकलेट व कॉफी मिळते ती भाजलेली असल्यामुळे त्यातले उपयोगी घटकपदार्थ नष्ट झालेले असतात. त्यावर त्यात लोणी साखर मिसळल्यामुळे त्याच्यामुळे होणारी शरिराची हानी ही अनेकपटीनी अधीक असते.

८. मका, गहु, सोयाबीन हे धान्य पिकवताना खूप प्रकारची खते, किटकनाशके वापरली जातात. तसेच कापणी केल्यावर ते धान्य अधीक काळ टिकावे याकरिताही त्यावर वेगवेगळ्या प्रकारचे प्रोसेसींग होते. त्यामुळे या प्रकारच्या धान्यापासून बनवलेल्या पदार्थांमुळे शरिराला हानी पोहोचते.

यापुढेही जाऊन शरीरासाठी आवश्यक असणारे Calcium आम्ही कसे आणि मिळवायचे हा प्रश्न येतोच. त्यासाठी David Wolfe यांच्याकडून मिळालेले उत्तर याप्रमाणे - 'ब-याच पालेभाज्यांमधे आणि बदाम, आक्रोड यामधे शरीराला आवश्यक तेवढे calcium मिळते. वरून मिसळलेले calcium शरीरातून बाहेर टाकले जाते. त्यामुळे दूधामुळे शरीराला calcium मिळते हा समज चुकीचा आहे. '


याबद्दल जेवढे लिहावे तेवढे कमीच आहे. माझा याबद्दलचा अभ्यासही अतिशय तोकडा आहे. अधीक माहितीसाठी खालील पुस्तके वाचावीत -
Sunfood Diet Success System

The Raw Transformation: Energizing Your Life with Living Foods

Eating For Beauty

तुम्हाला जर कच्चे पदार्थ खायला सुरुवात करायची असेल तर प्रथम प्राणीजन्य पदार्थ खाणे बंद करावे. साखर, गूळ यासारखे पदार्थ बंद करावेत. त्यानन्तर शिजवलेले अन्न कमीकमी करत जाऊन कच्च्या पदार्थांचे जेवणातले प्रमाण वाढवत जावे. १००% बदल पहिल्यदिवशी करण्यापेक्षा हळुहळू केलेला बदल दीर्घकालीन यश देणारा असतो.

माझ्या Raw Recipes इथे मिळतील -
Mints' Raw Recipes

मी खालील पुस्तके रेसीपीसाठी वापरते -
Raw: The Uncook Book: New Vegetarian Food for Life
Raw

Monday, April 14, 2008

रात्र थोडी आणि सोंगे फार ...

काल माझ्या एकुणच स्वभावाचा, रोजच्या दिनक्रमाचा कामाचा वगैरे आढावा घेत होते. आणि मुख्य जाणवलेली गोष्ट म्हणजे प्रत्येक नवीन दिसणार्या कामात रस घेणे हा मला असलेला अवगुण! हो अवगुणाच!

भरतकाम करायची आवड म्हणुन मग एक मोठे काम हातात घेतलेय ते आठवड्यातुन एकदा-दोनदा हातात घेउन बसते. वाचनाची आवड आहे म्हणुन मग एक इंग्लिश, एक मराठी अशी किमान २ पुस्तके माझ्या टेबलवर सापडतील. स्वयंपाकाची आवड म्हणुन मग त्याचे फोटो, अर्ध्या आधिक लिहिलेल्या रेसिपीज लॅपटॉपवर सेव्ह केलेल्या. आठवड्यातुन किमान एकदा तरी कुंभारकाम करुन आणलेली भांडी! घर सजवायचे म्हणुन कोणते पेंटींग करायचे वगैरे ठरवत आणलेले थोडेफ़ार सामान. बागकाम सुरु केलेले आहे म्हणुन मग वेगवेगळ्या बिया, कंद, कुणाकुणाकडुन आणुन लावलेल्या कसल्या कसल्या फांद्या, वेगवेगळ्या प्रकारच्या कुंड्या वापरायच्या म्हणुन सुरु केलेल्या शोधानी भरलेले बुकमार्क्स. कुठल्या कुठल्या नाटकाच्या/ नाचाच्या कार्यक्रमाना तोंडे रंगवायला मदत करायला जाउन संपून जात आसलेले वीकेंड्स. आवडते म्हणुन पुस्तकाच्या दुकाना/ग्रंथालयाना भेटी देउन आणलेली पुस्तके नीट वर्गवरी करायची म्हणुन आणलेले शेल्फ. ब्लॉग वाचुन त्यावर लिहिलेल्या कॉमेंटस. फोतोग्राफीची आवड म्हणुन जमवलेले सामान.

रोजचे ऑफिसचे आणि घरचे काम वेगळेच!

अता वाटतेय की थोडे bead work शिकले पाहीजे. त्याच्वेळेला असेही वाटते की आपण कुठेतरी बहेर्गावी जाऊन सुट्ट्यांचा आनंद पण मिळवला पाहीजे! या सगळ्याला कुठेतरी वेळ मिळाला पाहीजे. ठोडक्यात काय माझे सध्या रात्र थोडी सोंगे फ़ार असेच चालु आहे.

त्याच्वेळेला हे कुठेतरी थांबवले पाहीजे हे देखील पटते. पण काय कमी करावे ते समजत नाही. त्यामुळे सध्या माझा फ़ूड ब्लॉग आणि भरत्काम व कुंभार्काम या गोष्टी सोडुन सगळ्या छंदाना थोडे दिवस विश्रांती देणार आहे. हा संकल्प कमीत कमी ६ महिने तरी पाळायचा विचार आहे. आता बघु कुठवर जमते ते.