Thursday, October 04, 2007

जे जे उत्तम ...

नंदनने लिहायला चालु केले आणि आगावुपणाने लग्गेच सांगितले की टॅग का चालु करत नाही? मला अजीबात वाटले नव्हते की तो मनावर घेईल ;) पण तो नंदन आहे हे विसरले! आज स्वाती परत टॅग केले आणि अजुन लोकानी आठवण करुन द्यायच्या आत लिहावे म्हणुन बसले आणि आवडणारी सगळी पुस्तके समोर काढली आणि हे लिहु का ते असे काहीसे झाले.
नंदन ने हा उपक्रम सुरु करण्यासाठी ’पुस्तक वाचताना, अनेकदा काही परिच्छेद आवडतात. संपूर्ण पुस्तकाचा विचार केला तर ते कदाचित तितके महत्त्वाचे नसतीलही; पण त्या त्या वेळेला ते आवडून जातात. असेच काही आवडलेले उतारे, कुठल्याही भाष्याशिवाय देण्याचा हा एक उपक्रम. अर्थात मागचा-पुढचा संदर्भ जरी नसला, तरी तो तितका उतारा वाचनीय वाटावा इतपत उद्धृत करण्याचा प्रयत्न करेन.’ असे साधे सोपे समीकरण देउनही ते आता कठीण वाटतेय :)


माझ्या अत्यंत आवडत्या उता-यांपैकी खालील एक उतारा -
धबधब्याजवळ पोचल्यावर अम्हाला काय करावं आणि काय नाही तेच समजेना इतका आनंद झाला होता. कोण पाणी उडवायला लागला कोण पाण्यात पळायला लागला. टुकण्या पाण्यातच बसुन राहीला. त्याने शर्ट काढुन टाकला होता. कणब्या रंगीत दगड गोळा करत होता. मुली फुले गोळा करत होत्या. मास्तरांनी कोट, टोपी काढुन धोतराचा काचा मारला होता. ते धबधब्यांच्या रांगेत उभे राहुन हसत होते. त्यांच्या डोक्यावरचे काळे कुरळे केस आम्ही पहिल्यांदाच पाहीले. टोपी आणि कोट नसलेले, हसणारे मास्तर आम्हाला आमच्यासारखेच वाटायला लागले. जोरात पाऊस आला तेव्हा ते देवळाकडं पळाले नाहीत. आमच्याबरोबरच भिजत राहिले. मग वेलंगीबाईही धबधब्यांच्या रांगेत येउन उभ्या राहिल्या आणि त्याही हसायला लागल्या. सगळीकडं हिरवंगार होतं. आणि सगळीकडं भरुन राहीलेला वासही हिरव्याच रंगाचा असावा, असं वाटत होतं.

पायाखालुन आणि वरुन वाहाणारं पाणी गुदगुल्या करुन पुढं जात होतं. इकडं तिकडं पळणारी मुलंमुली हळूहळू त्या धबधब्याच्या समोरच आली. आपोआपच आमची एक साखळी तयार झाली. लोखंडीसाखळीसारखी नाही, तर रंगीबेरंगी, वेगळ्या वेगळ्या हसणा-या बोलणा-या आवाजांची साखळी. आम्ही वेगवेगळी मुलं नव्हतोच, तर आम्ही सगळी एकच आहोत, असं मॅड्सारखं वाटत होतं. वाहाणा-या पाण्याच्या विरुद्ध दिशेनं एकमेकांच्या हातात हात घालुन आम्ही कुठतरी निघालो आहोत, असं वाटत होतं. मधेच मॅड्सारखं पिवळंधमक ऊन पडलं. कुठं कुठं भरुन राहीलेलं पाणी अंगठीतल्या खड्यासार्खं चमकायला लागलं. माझ्या डाव्या हातात कुणाचा तरी हात होता. तो थोडासा टोचणारा हात जाउन नवाच कोणता तरी हात आला होता. न पहाताच असं वाटत होतं की हा हात ओळखीचा आहे. मी डावीकडं पाहिलं तर शेजारी सुमी उभी होती. तिनं माझा हात घट्ट पकडला होता. ती माझ्याकडं पाहुन हसत होती. पाण्याचे कितीतरी बारीक थेंब तिच्या केसांत अडकुन राहीले होते. ती माझ्या डोळ्यातच पहात होती. त्या हिरव्या रंगाच्या वासातूनही सुमीच्या केसांतील सोनटक्क्याच्या फुलांचा वास येत होता. खरं तर त्या सर्व हसण्याला आणि ओरडण्याला सोनटक्क्याच्या फुलांचा वासच असावा, असं वाटत होतं. माझ्या डोक्यात असला कही गोंधळ चालू असताना सुमी म्हणाली,
"किती छान आहे ना?"
मी मान हलवली.

-----------
साखळी, ’वनवास’ - प्रकाश नारायण संत

आता मी खालील लोकाना टॅग करते -
संवेद
सुमेधा
प्रियंभाषीणी
कृष्णाकाठ
परागकण

मी शक्यतो अत्तापर्यंत ज्यांना टॅग केले गेले नाही असे लोक शोधायचा प्रयत्न केलाय.

(P.S. सुमेधा आणि संवेद या दोघाना अजुन कोणीतरी तग केल्याचे दिसले. म्हणुन बदलते आहे. नवीन टॅग खालीलप्रमाणे -
शोनू
गायत्री)