Sunday, October 02, 2011

आठवणींचे नवरात्र
आम्ही लहान असताना नवरात्र म्हणजे दांडिया हे समीकरण नव्हते. नवरात्र म्हणजे भोंडला, खिरापत, शारदोत्सव हेच आम्हाला माहिती होते. थंडी नुकतीच सुरु झालेली असायची त्यामुळे दिवस लहान झाल्यामुळे संध्याकाळी ६.३० लाच अंधार वाटायचा. शाळा सुटली की धावत पळत घरी यायचे कारण सगळ्यांच्या घरचे भोंडले असायचे. संपूर्ण कॉलनीमधे साधारण २०-२५ घरांमधे तरी जायचे असायचे त्यामुळे घरी आल्या आल्या दप्तरे टाकायची आणि भोंडल्याला पळायचे. सगळ्या मुली छान छान ड्रेस घालून येत. कुणाकडे पहिला भोंडला हे पण ठरलेले असायचे. आदल्या दिवशी पाटाच्या मागच्या बाजुला हत्तीचे चित्र काढून ठेवलेले असायचे. माझ्या मम्मीने काढलेला हत्ती फार मस्त असायचा त्यामुळे आमच्या आजुबाजुच्या काही घरांमधल्या पाटांवर मम्मीने काढलेलाच हत्ती असायचा. असे हत्ती काढलेले पाट अंगणात मधे मांडायचे. फुलं-पत्री वगैरे वाहून भोंडल्याला सुरुवात व्हायची. एकमेकींच्या हातात हात घालून पाटाभोवती फेर धरायच्या. संथ सुरात एका लयीत गाणी सुरु व्हायची -


ऐलमा पैलमा गणेशदेवा
माझा खेळ मांडून दे करी न तुझी सेवा ...


पहिल्या दिवशी एकच गाणे म्हणायचे ही आम्हाला शिक्षा वाटायची ... शुरु होतेही खतम हो गया? असे काहीसे. मग खिरापत ओळखण्याचा मज्जेचा कार्यक्रम! त्याची सुरुवात नेहेमी श्रीबालाजीचि सासू अशी होई.


श्री - श्रीखंड
बा - बासुंदी
ला - लाडू
जी - जीलेबी
चि - चिवडा
सा - साखर
सु - सुधारस


आता भोंडल्यासाठी सुधारस कोण कशाला करेल असली अक्कल कुणाला नव्हतीच मुळी! बरेचदा ५-६ प्रयत्नांमधे जे काही केलेले असेल ते ओळखले जाई. तर कधीतरी पोहे, उप्पिट वगैरे पासून सुरु झालेली गाडी पुर्‍या, केककडे पण वळायची. अजून बरीच घरं फिरायची असल्याने आम्ही हारलो अशी सपशेल कबूली देऊन आम्ही मिळालेला प्रसाद खात खात पुढल्या घरी रवाना होत असू. पाठीमागे सगळे आवरून ठेवायचे काम घरचेच कोणीतरी करत असे. सगळ्या घरचा भोंडला करून घरी येईतोवर शाळेचा अभ्यास वगैरे काही आठवतही नसे. काही वर्षी दुसरी घटक चाचणी त्याच दरम्यान असे, पण नेहेमी सहामाही परीक्षा तोंडावर आल्याने घरी येऊन पटापटा हातपाय धुवुन अभ्यासाला बसायची घाई असायची. खिरापती खाऊन पोटं भरलेली असत. अभ्यास खुप असेल तर मग घरचा ओरडा थोडाफार खावा लागत असेच.

शविवार-रविवारचे भोंडले खुपच रंगत असत. लवकर सुरुवात केली जाई.  सगळी गाणी सुरात काहीवेळेस तारस्वरात देखील म्हणली जात. भोंडला संपल्यावर मग आम्ही एखाद्या मैत्रिणीच्या दारात घोळका करून बसायचो. नविन वेगळी गाणी कोणाला माहिती आहेत का? याची थोडी चाचपणी होई. प्रत्येकीला आपल्या घरचा भोंडला सर्वात सुंदर व्हावा असे वाटे. प्रत्येकीलाच आपली खिरापत कुण्णाकुण्णाला ओळखू येऊ नये असे वाटे. आठव्या नवव्या दिवशी सगळ्या घरांमधे येवढी गाणी म्हणून यायला उशीर होणारच हे माहिती असेल तर आम्ही काहीजणी ४-५ भोंडले झाले की परत जायचो. मग दुसरे दिवशी खिरापतीत काय काय होते यावर शेवटपर्यंत थांबलेल्या आणि न थांबलेल्या मुली यांच्यात एक मोठा परीसंवाद घडे. त्यातले फलित 'तुम्ही नव्हतात तिथे किती मस्त खिरापत होती आणि कित्तीतरी दिली' येवढाच असे! अशावेळी घरच्यांचा राग यायचा पण त्यांच्या मनाविरुद्ध काही करायची टाप नव्हती.


हे १० दिवस म्हणजे शारदीय नवरात्राचे. आमची मुलींची शाळा असल्याने हे नवरात्र आमच्या शाळेत दरवर्षी साजरे होई. आधी आठ दिवस वर्गात कृष्णा, नाना वगैरे शिपाई सूचना वही घेऊन येई. मग कोणत्या दिवशी शारदोत्सव असणार, कोणकोणते कार्यक्रम होणार याची रुपरेषा वर्गातल्या बाई सांगत. शाळेला सुट्टी असली तरी समुहगीत, भाषण, निबंध, हस्ताक्षर इत्यादी स्पर्धा असत. तसेच एखादे दिवशी लिंबू-चमचा, तीन पायांची शर्यत, पोत्यात पाय घालून पळणे, स्लो सायकलींग अशा पण स्पर्धा असत. एके वर्षीतर पुष्परचना स्पर्धा अर्थात फ्लॉवर अ‍ॅरेंजमेंट स्पर्धा पण ठेवल्या होत्या! तिथे मुलींनी ओळखीच्या कुणाकडूनतरी रचना करून आणून नंबर मिळवलेले लक्षात आल्याने ही स्पर्धा बंद केली. शाळेतला हा उत्सव ३ दिवसांचाच असे. आमच्या शाळेत पहिल्या मजल्यावर फक्त ४ वर्ग, शिवणहॉल आणि ऑफिसेस येवढेच होते. त्यामुळे ५वी ब च्या वर्गातले बाक दुसरीकडे हलवून तिथे शारदेची मोठी मुर्ती बसवली जाई. पांढर्‍या रंगाची साडी नेसलेली शारदा, गळ्यात फुलांचा हार, कडेला तेवत असलेल्या समया, अगदी मोजकीच पण एकदम साधीशी आरास असे. आमच्या चित्रकलेच्या बाई आणि सर मिळून समोर सुंदर रांगोळी काढत. त्या वर्गात जायला मुलींना परवानगी नसे. बहेरूनच दर्शन घ्यायचे असा नियम होता. तीनही दिवसाचे वेळापत्रक आधी कळलेले असे. सुट्टी असली तरी शाळेत हजेरी घेतली जाई. त्यामुळ शाळा बुडवलेली चालायची नाही. इतरवेळी शाळेत जायला कुरकुरणार्‍या आम्ही शारदोत्सवात मात्र हसत हसत जायचो. अगदी आजारपणदेखील या ३-४ दिवसांमधे येऊ नये असंच वाटायचं. साधारण सकाळी ८ ते १२ कार्यक्रम झाले की दिवसभर सुट्टीच! मोठ्या वर्गांमधे मात्र शिक्षक-शिक्षिका भरभरून अभ्यास देत तेव्हा मात्र राग यायचा. 
तिसर्‍या दिवशी शारदोत्सवाच्या हळदी कुंकवाचे सगळ्यांना निमंत्रण असे. प्रत्येकजण तयार होऊन, ठेवणीतले कपडे घालून आईबरोबर शाळेत जायचो. दारात आमचे मुख्याध्यापक सगळ्यांचे स्वागत करायला उभे असत. सगळे शिक्षक कडेला गप्पा मारत बसलेले असयाचे कारण त्याव्यतिरिक्त त्यांना करण्यासारखे काहीही नसे. आत गेल्यावर एकदम नटून थटून आलेल्या शाळेच्या शिक्षिका दिसत. मस्त भरजरी साड्या नेसलेल्या, काही नथ, तन्मणी वगैरे घातलेल्या, काही मोजकेच सोन्याचे दागिने घातलेल्या बाई काही वेगळ्याच दिसत. आमच्या शाळेला मोठा एक हॉल होता तिथे हे हळदीकुंकु असायचे. सतरंजी अंथरलेली असायची त्यावर जाऊन बसले की एखाद्या बाई येऊन हळदी-कुंकु, अत्तर, गुलाबपाणी, पान सुपारी आणि एखादी बर्फी असे द्यायच्या. माझी मम्मी त्याच शाळेत शिकलेली होती त्यामुळे तिच्यापण काही शिक्षिका मला होत्या. तिच्या एक-दोन वर्गमैत्रिणी पुढे आमच्याच शाळेत शिक्षिका म्हणून लागल्या होत्या. मम्मीला त्यातले कोणीही भेटू नये असे मला अगदी मनापासून वाटे. 'अगं तू इतकी शांत होतीस, तुझी मुलगी किती बोलते!', 'अगं तिला येतं ग सगळं पण खूप आळशीपणा करते!' किंवा 'तिच्याकडून जरा स्पेलिंग वगैरे नीट पाठ करून घे गं!' अशा काय काय तक्रारी केल्या जायच्या. घरी येईपर्यंत मम्मीची बोलणी खायला लागायची. याला अपवाद एखादाच! ९-१०वी मधे गेल्यावर आम्हा सगळ्या मुलींना 'टिनेजरी' शिंगं फुटायची. मग मुद्दाम एकदम टुकार कपडे घालून कार्यक्रमांना जाणे, कोणत्याही स्पर्धांमधे भाग न घेणे, जितका म्हणून स्नॉबिशपणा करता येईल तेवढा करत असू. ११वीत मात्र आम्ही शाळेतला शारदोत्सव नाही हे जाणवून किती चुकल्यासारखं वाटलं होतं! 

शाळा-कॉलेजच्या संपूर्ण आयुष्यात मी फक्त एकदा गरब्यासाठी गेले होते ते देखील माझ्या एका गुजराती वर्गमैत्रिणीमुळे तिच्या घरच्यांच्या बरोबर. आमच्या गावात गुजराती-मारवाडी समाज भरपूर. ते लोक एखादे मंगल कार्यालय भाड्याने घेऊन तिथे गरबा खेळत. दांडीया होता की नव्हता ते देखील आता मला आठवत नाही. तिथे २-३ तास नाचून रात्री ११ वाजता घरी येताना दुखलेले पाय याव्यतिरिक्त मला त्यातले काहीही आठवत नाही.


याच नऊ दिवसांमधे आम्ही कोयनेकाठच्या दैत्यनिवारीणी देवीच्या दर्शनाला जायचो. तिथे भली मोठी रांग असायची. खेळणी-फुगे-गाड्या वगैरेंचे स्टॉल, भेळेच्या गाड्या वगैरे असायचे. अगदी जत्राच दुसरी! मंदिराच्या कडेने कोयना नदीकडे जायला पायर्‍या होत्या. तो रस्ता बरेचदा बंदच केलेला असे. सगळ्याजणींनी एकत्र घोळक्याने जाऊन घोळक्याने येणे आणि सोबतीला गप्पा! आजुबाजुच्या बायका एकमेकींच्या सोबतीने जात कारण ५-६ किलोमिटर अंतर चालून जायचे असे. टांगे, रिक्षा असल्यातरी सगळ्यांना परवडण्यासारख्या नसत आणि त्या भागात बसची सोय नव्हतीच. आजीकडे घट बसवलेला असे. ज्या दिवशी दैत्यनिवारिणीला जाऊ त्याच दिवशी आज्जीकडे जाऊन यायचो. परात, त्यातला नारळ आणि कडेच्या मातीत उगवलेले धान्य, घटाला चढत्या क्रमाने वाहिलेले कारळ्याच्या फुलांचे हार आणि सोबत असलेला नंदादीप यामुळे आज्जीचे देवघर खुप प्रसन्न दिसे. गव्हाच्या लोंब्या वगैरे वर टांगलेल्या असत. आज्जी आठव्या दिवशी कडाकण्या करायची. गोल, चक्र, वेणी, फणी असे बरेच तळलेले प्रकार करून ते घटावर बांधायचे. दसरा झाला की ते खायला मिळत काही काही गोष्टी घटाबरोबर विसर्जन होत असत.


खंडेनवमीला शस्त्रास्त्रे, पुस्तके, वगैरेंची पूजा जवळपास प्रत्येक घरी सारखीच. एखादे शस्त्र कमी-अधिक येवढेच. पहिली ते चौथीत असताना दसर्‍यादिवशी शाळेत पाटीपूजन असायचे. पाटीवर १ आकड्याची सरस्वती, ती पण कडेने मस्त नक्षी वगैरे काढून ती आम्ही रंगवायचो. सकाळी फुलं, गुळखोबरे, पाटी आणि एक पुस्तक घेऊन शालेत जायचे. तिथे वर्गात बसून प्रार्थना म्हणायची. ते झाल्यावर 'या कुन्देन्दु तुषार हार धवला...' ही प्रार्थना म्हणायची. गुळखोबरे खाऊन घरी यायचे. सायकली-गाड्यां धुवून पुसून एकदम लक्ख करायच्या. त्यांची पूजा करून हार घालायचे. घराला तोरण, दारात मोठी रंगीत रांगोळी असा थाट असे. गोडाधोडाचे जेवण झाले की संध्याकाळच्या सोनं लुटायला जाण्याचे वेध लागत. आम्ही मैत्रिणी अगदी दूरदूरपर्यंत शाळेतल्या बाईंना वगैरे जाऊन सोने देऊन त्यांचा अशिर्वाद घेऊन यायचो. घरात-दारात-रस्त्यात पडलेल्या सुकलेल्या आपट्यांच्या पानांचा सडा संपलेले नवरात्र अधोरेखित करायचा.


देशाबाहेर आले, गणपती-दिवाळी हे सण अगदी आवर्जून साजरे होतात. नववर्ष म्हणून गुढीपाडवा देखील साजरा होतो. पण दसर्‍याच्या दहा दिवसांचा तो सोहळा मात्र आता नाही. खंडेनवमीला लक्षात आले तर पुस्तक-शस्त्र पूजा आणि दसर्‍यादिवशी लक्षात असेल तर गाड्यांची पूजा यात नवरात्र 'साजरं' होतं. पूर्वीच्या आठवणी मनात फेर धरतात आणि भोंडला सुरु होतो -


अक्कणमाती चिक्कणमाती,
अश्शी माती सुरेख बाई खड्डा तो खणावा
अस्सा खड्डा सुरेख बाई जातं ते रोवावं
अस्सं जातं सुरेख बाई पिठी ती दळावी
अश्शी पिठी सुरेख बाई करंज्या कराव्या
अश्श्या करंज्या सुरेख बाई तबकी ठेवाव्यात
अस्सं तबक सुरेख बाई शेल्याने झाकावं
अस्सा शेला सुरेख बाई पालखी ठेवावा
अश्शी पालखी सुरेख बाई माहेरी धाडावी
अस्सं माहेर सुरेख बाई खायाला मिळतं
अस्सं सासर द्वाड बाई कोंडोनी मारतं
अस्सं आजोळ गोड बाई खेळाया मिळतं ...