Wednesday, August 27, 2008

आवडलेले थोडे काही ...

संवेदचा कवितांचा खो एकदा धाडसाने(!) परतवुन लावला तर गिरीने दिलाच. माझे कवितांचे वाकडे अजिबात नाही. साध्या सोप्या कवीता कळतात देखील. पण कवितांची भीती का आणि कशी बसली माहिती नाही. तरी आवडलेल्या दोन(च) कवीता इथे देतेय. त्याआधी संवेदने लिहिलेले नियम परत डकवते इथे -

१. कविता आवडते पण पुर्ण आठवत नाही आणि हाताशी पुस्तकही नाही? हरकत नाही, आठवतं तेव्हढं लिहा. कवीचं नाव मात्र आवश्य लिहा

२. एक से मेरा क्या होगा सिन्ड्रोम? या वेळी तुम्ही तुमच्या सध्या आवडणारया टॉप २ कविता लिहु शकता आणि कवितांच्या प्रमाणात खो देखील देऊ शकता. जेव्हढ्या कविता तेव्हढे खो (जास्तीजास्त अर्थात २)

३. खो खो नीट चालवण्याची जबाबदारी अर्थात सारयांचीच. त्यामुळे तुमच्या पोस्ट मधे तुम्ही ज्या/जिला खो देताय, त्या/तीचं नाव तर लिहाच, शिवाय त्या/तिच्या ब्लॉगवर ही खो दिल्याची नोंद आवश्य करा

४. कविता का आवडली किंवा कवितेचा अर्थ किंवा काहीच स्पष्टीकरण आपेक्षित नाही

५. अजून नियम नाहीत :)

१. गवतफुला -

रंग रंगुल्या सान सानुल्या गवत फुला रे गवत फुला
असा कसा रे मला लागला सांग तुझारे तुझा लळा
मित्रांसंगे माळावरती पतंग उडवीत फिरताना
तुला पाहीले गवतावरती डुलता डुलता झुलताना
विसरुन गेलो पतंग नभीच अन विसरुनी गेलो मित्रांना
पाहुन तुजला हरखुन गेलो अशा तुझ्या रे रंगकळा
हिरवी नाजुक रेशिम पाती दोन बाजुला सळसळती
नीळ निळुली एक पाकळी पराग पिवळे झगमगती
तळी पुन्हा अन गोजिरवाणी लाल पाकळी खुलती रे
उन्हा मधे हे रंग पहाता भान हरपुनी गेले रे
पहाटवेळी अभाळ येते लहान होउनी तुझ्याहुनी
निळ्या करानी तुला तुला भरविते दवमोत्यांची कणीकणी
वारा घेऊन रूप सानुले खेळ खेळतो झोपाळा
रात्रही इवली होउन म्हणते अंगाईचे गीत तुला

मलाही वाटते लहान लहान होऊनी तुझ्याहुनही लहान रे
तुझ्या संगती सदा रहावे विसरुनी शाळा घर सारे
तुझी गोजीरी शिकुन भाषा गोष्टी तुजला सांगाव्या
तुझे शिकावे खेळ आणखी जादू तुजला शिकवाव्या
आभाळाशी हट्ट करावा खाऊ खावा तुझ्यासवे
तुझे घालुनी रंगीत कपडे फुलापाखरा फसवावे
रंग रंगुल्या सान सानुल्या गवत फुला रे गवत फुला
असा कसा रे मला लागला सांग तुझारे तुझा लळा

~ शांता शेळके.

२. नको नको रे पावसा -

नको नको रे पावसा असा धिंगाणा अवेळी
घर माझे चंद्रमौळी आणि दारात सायली ॥

नको नाचू तडातडा असा कौलारावरून
तांबे, सतेली, पातेली आणू भांडी मी कुठून ॥

नको करू झोंबाझोंबी माझी नाजूक वेलण
नको टाकू फूलमाळ अशी मातीत लोटून ॥

आडदांडा नको येऊ झेपावत दारातून
माझं नेसूचं जुनेरं नको टाकू भिजवून ॥

किती सोसले मी तुझे माझे एवढे ऐक ना
वाटेवरी माझा सखा त्याला माघारी आण ना ॥

वेशीपुढे आठ कोस जा रे आडवा धावत
विजेबाई कडाडून मागे फिरव पांतस्थ ॥

आणि पावसा, राजसा, नीट आण सांभाळून
घाल कितीही धिंगाणा मग मुळी न बोलेन ॥

पितळ्याची लोटीवाटी तुझ्यासाठी मी मांडीन
माझ्या सख्याच्या डोळ्यांत तुझ्या विजेला पूजीन ॥


-- इंदिरा संत


माझा खो स्वाती अंबोळे आणि उपासला ...

(दो से मेरा क्या होगा! हा सिंड्रोम मला होईल असे अजिबात वाटले नव्हते. पण झाले तेव्हा प्रचंड आनंद झाला!)