Wednesday, December 14, 2005

सूरपूजा

कोल्हापुरच्या अंबाबाईचे देउळ, संध्याकाळची साधारण चार साडेचार ची वेळ. मी तेव्हा कोल्हापुरला शिकायला होते दोन वर्षे. मी आणि अंजु काहीतरी खरेदीसाठी विद्यापिठातुन लक्ष्मीपुरीमधे आलेलो. सिटीबस मधुन उतरल्यावर देवीला नमस्कार करुन मग बाकीच्या कामाला जायचे ही सवय ठरलेली होती. त्याप्रमाणे मी आणि अंजु अंबाबाईच्या समोरच्या बाजुला जो गणपती आहे त्याचे दर्शन घेउन देवीच्या गाभार्याकडे गेलो. जाता जाता मी अंजुला म्हणाले कोणीतरी गातेय बघ. तिच्या ही गोष्ट लक्षात यायला बराच वेळ लागला. देवीला नमस्कार केला. देवळात फारच कमी गर्दी होती, अजीबात नव्हतीच म्हणा ना!

पुढे जाउन गाभार्यात डोकावुन पाहिले तर आत कोणीतरी सोवळे नेसुन गात होते. मग अम्ही तिथेच गाणे ऐकत बसुन राहीलो. साधारण १५ मिनिटे गेली आणि गायन थांबले. कोणता राग होता, वगैरे मला काही समजले नाही, अजुनही समजत नाही! पण ऎकयला अतीशय सुंदर वाटले. मग गायक देवीला नमस्कार करुन बाहेर आले - पहाते तर पंडीत जसराज! डोळ्यावर विश्वास बसेना. परत एकदा खात्री करुन घेतली मनाशी की तेच आहेत. सोवळे नेसलेले, साधे नम्र भाव असलेले पंडीतजी एकदम फ़ार जवळचे वाटले. पण त्याक्षणाला त्यांची स्वक्षरी घ्यावी असे अजिबात वाटले नाही. ते दृश्य डोळ्यात साठवुन आम्ही आमच्या कामासाठी निघुन गेलो.

त्यानंतर मी जेव्हा जेव्हा देवळात जाते, तेव्हा तेव्हा पंडीतजीनी बांधलेली सुरपूजा कायम मनात झंकारते आणि तो क्षण मी मनातल्या मनात परत जगते.

Tuesday, December 13, 2005

हरीवंशराय बच्चन यांची एक कविता ,,,

Posted by Picasa

स्पर्श

काल पल्लवीकडे गेलेले तिच्या धाकट्या बाळाला पहायला. संदीप ने दार उघाडले आणि मागुन हृषीकेश ने जे मला पट्कन मिठी मारली. मन एकदम भरुन आले. लहान मुलाना किती आपुलकी असते ना! मला तसेच १५ मिनिटे तरी चिटकुन होता तो. पल्लवीशी गप्पा मारताना तो मी त्याच्याशी गप्पा माराव्यात हा त्याचा आग्रह!

त्यानंतर त्याची खेळणी बघ, पुस्तक वाच करत त्याच्याशी खेळले. ओजसला पण पाहीले. त्याच्याशी खेळायचे म्हणजे त्याला घेउन बसायचे!! पण धमाल आली. लहान मुलांचा स्पर्श, त्यांच्या पावडर, तेल ह्याचा मिश्र गंध - एक वेगळिच अनुभूती.

ह्या सगळ्याचा आनंद मला स्वत:च्या बाबतीत मिळणर आहे का? ह्याचा विचार करुन सध्याच्या आनंदावर कशाला पाणी फिरवायचे ...

Monday, December 12, 2005

मराठी मधे लिहिताना

आजकाल मराठी लिहिताना त्रास होतो अशी ओरड ऎकली आणि मनाशी म्हाणाले - आपले असे नको व्हायला. तरी मायबोली वर बरेचदा मराठीतच लिहिले जाते. अलीकडे तरी जास्तीच. पण घरी पत्रे पाठवणे थांबलेच जवळजवळ. असे कधी झाले नक्की आठवायचा प्रयत्न केला तर असे आठवतेय की - रोजच्या आयुष्यातल्या चाकोरीतुन खुप गोष्टी घरी सांगु नयेत ह्या कारणामुळे पत्रे फ़ारच त्रोटक व्हायला लागली आणि कधितरी थांबलीच.

आता पत्र लिहीतच नाही त्यामुळे मराठी अक्षराचा काय निकाल लागलाय ते पहावेच लागेल एकदा!! पण टंकलेखीत मराठी जपुन रहावे म्हणुन हा प्रपंच.

~मिनु.