Tuesday, August 01, 2006

पाउस - एक love hate relationship

सध्या कराड मधे पावसाने नुसते थैमान घातलेय त्याचे फोटो पाहुन आणि मम्मी कडुन कहाण्या ऐकुन मला कराडमधे घालवलेले असंख्य पावसाळे आठवले.

प्राथमीक शाळेत असताना पाउस फार अवडायचा शाळा घरापसुन लांब होती आणि एखादे दिवशी रेनकोट विसरले तर मनसोक्त भिजायला मिळायचे. मम्मीचा ओरडा मिळायचा पण त्याचे फारसे काही वाटत नव्हते. पावसाच्या साचलेल्या पाण्यात मनसोक्त उड्या मारत भिजत यायचे. ते पावसाळ्याचे बूट नामक जो प्रकार मिळायचा त्याने माझ्या पायाची सालटी निघालेली असायची. त्यात माती जाउन झणझणायचे. पावसात सारखे खेळल्याने सर्दी खोकला असायचाच. बुचाची फुले वेचायची त्याचे गजरे करायचे. श्रावण तशातच यायचा. आमच्या त्या शाळेत नागोबाचे देऊळ होते. इतर दिवशी आम्ही त्या कट्ट्यावर खेळायचो. पण नागपंचमी दिवशी शाळेला सुट्टी असल्याने मग सकाळी शाळेत पाटीपूजनाला जाउन यायचे. नारळ खोबरे चघळत रिमझिम पावसात भिजत घरी. संध्याकाळी परत नागोबाला जायचे. पावसाचा आणि नागपंचमीचा इतका अतूट संबंध होता की बास. पावसाळ्यात शाळा सुरु ह्वायची त्यामुळे ती पुस्तके न भिजता घरी यावित म्हणुन मग प्लास्टीकच्या पिशव्या असायच्या. पाटीसाठी अजून एक पिशवी - उतारा भिजुन पुसु नये.
त्याकाळात पाउस म्हणजे मजा वाटायची - पाउस आला की आनंद व्हायचा.

पाचवीमधे गेले तेव्हा हट्टाने छत्री मागुन घेतली. मग सायकल आल्यावर त्या छत्रीचे नखरे परवडेनासे झाले. ६वी ७वी मधे पाउस रोमांचक असतो वगैरे जाणवु लागलेले. मैत्रीणींबरोबर एका हातात सायकल आणि एका हातात छत्री घेउन खिदळत घरी यायचे. कॊलेजची पोरे मुद्दाम पाणी उडवुन जायची. पाटीपुजन वगैरे बंद झालेले. पावसाचे पाणी बघत बसायची खोड लागली.

७वीच्या वर्षात पावसाने हाहाकार माजवलेला... एका नवीन घरात भाड्याने रहात होतो. तिथे बाहेर पाऊस पडायचा तितकेच घरात गळायचे. मम्मीने वर्षाचे धान्य भरुन ठेवले होते ते सर्व भिजुन गेले. स्वत:च्या घरात जाणर म्हणुन आनंद मानायचा की घरातले अन्न धान्य नासधुस होताना पाहुन अश्रू गाळायचे या चिंतेत मम्मी पप्पा असायचे. सुबोध एकदा शाळेतुन घरी आला आणि मम्मी त्याला जेवायला वाढत होती तेवढ्यात इतका जोराचा पाउस आला की त्याला जेवायला सुद्धा मिळाले नाही. त्याक्षणाला मम्मीला काय वाटले असेल ते एक तीच जाणे! ... त्यावर्षी पावसाने डोळ्यातून पण पाऊस आणला ... एका महीन्यात प्रचंड नुकसान करुन गेला हा पाऊस. त्यावर्षी मात्र तो नकोसाच वाटला ...

तिथुन स्वत:च्या घरात आलो. आपले घर म्हणुन एक वेगळाच आनंद होता. आजुबाजुला सगळी शेतिच होती. शाळेला बसने जावे लागणार होते कारण तोपर्यंत मामासाहेबानी सायकल हरवलेली होती. शेतात राहयला आल्यामुळे आजुबाजुचे शेतकरी पावसाची आतुरतेने वाट पहाताना पाहुन वेगळेच वाटायचे. गरम काळ्या मातीत पडलेला वळीवाचा पाऊस त्याचा तो खमंग वास अहाहा... शाळा सुरु होईपर्यंत मग असाच वळिव खिडकितुन बघत श्रीमानयोगी, मृत्युंजय, व्यक्ती आणि वल्ली अशी एकामागोमाग एक पुस्तके वाचुन काढत वळीव काढला. शाळा सुरु व्हायचे दिवस आल्यावर मग शाळेच्या खरेदीबरोबर नविन पावसाळी चप्पल, नवीन छत्रीची खरेदी झालेली.
आणि शेतात घर असण्याचे तोटे पहिल्या शाळा सुरु झाल्याच्या पहिल्या १५ दिवसातच समजले. घरापर्यंत जाण्यासाठी शेताच्या पाणदी मधुन रस्ता - गुडघा गुडघा चिखल असे करत बस गाठेपर्यंत कसरत व्हायची. मधे कॊलेज लागयचे तिथे चिखलाने बरबटलेले पाय धुवुन बस गाठायला पळायचे.
पावसाचा पूर्ण चार्म तिथेच संपला...

आज इथे बे एरीया मधे रहाताना पावसाळा म्हणले की आठवते ती तुफ़ान थंडी. नशीब एवढेच की बर्फ़ उकरावा लागत नाही. ऒफीसच्या खिडकितुन पाउस बघत माझी सहकारी अतिशय भावुक होते. मनात पावसात मनसोक्त भिजण्याची स्वप्ने पहाते. तिला पाहुन वाटते, आपल्याला हे सर्व Romantic का नाही वाटत? मग थोडावेळ विचार केल्यावर जाणवते अत्ता घरी असते तर मस्त पैकी हीटर लावुन पायावर शाल घेउन पुस्तक वाचत पडायला काय बहार येईल. एखाद्या वीकेन्ड ला ते स्वप्न सत्यात पण येते. माझ्या मनाने मी पावसाचा आनंद घेते.

असा एखादा दिवस मी अगदी मनापासुन मी पाउस enjoy करते पण बरेचदा त्याला पाहुन मनावर मळभ दाटुन येते, लहानपणीचे पावसाने वाया घालवलेले दिवस आठवतात ... वाईट वाटते पण मी त्याला माफ़ करुन पुढे चालु लागते ....

10 comments:

Y3 said...

प्रत्येक पाऊस असाच आठवणींचे थेंब घेऊन येतो.... काही थेंब पिसासारखे हळूवार अंगावर पडतात...तर काही चिंब भिजवून नकोस करतात..
खूप सुंदर लेख आहे..

Anonymous said...

यतीनशी सहमत. लेख खूपच सुंदर आहे. ओघवता झालाय.

Unknown said...

ho..khupach mast lihila ahe ha lekh! Shaletale pawsache dewas aathawale..too good!

Anonymous said...

लेख मस्त लिहिला आहे.
कराड मध्ये पावसाळ्यात बघण्यासारखे अजुन एक ठिकाण म्हणजे कराड चा प्रिती-संगम. कृष्णा-कोयना नुसत्या उधळलेल्या असतात.

-राहुल

GD said...

मिनोती, मस्तच!!!

कृष्णा-कोयना नुसत्या उधळलेल्या असतात. <<<

राहुल, एकदम!
एकदा आतेबहिणीचे लग्न होते आणि मुहूर्ताच्या आधी कृष्णेच्या पलीकडच्या काठावर अगदी कडेला लागूनच छोटी छोटी देवळे आहेत तिकडे देवाला गेलो होतो. त्या एकदम काठावर बसून कृष्णा-कोयनाची एकमेकींवर उसळणारी रूपे पाहून तिथून निघायची अजिबत इच्छा होत नव्हती! तुम्ही लोकं तिथे गेला नसाल तर पावसाळ्यात तिथे जाच!

Sumedha said...

खूप छान आहे नोंद. पाऊस ही गोष्टच अशी आहे की प्रत्येकालाच काही ना काही आठवणींनी भिजवून टाकतो!

Anonymous said...

वा वा! छानच लिहीले आहेस.

या आधीचा सोन्या पण फार सुरेख होता.

दुथडीभरून वहात असलेली कृष्णा मी वाईला बघीतली आहे. आता वाईला गेलो की नदीची अवस्था बघवत नाही.

विनायक

Mints! said...

यतीन, शैलेश, राहुल, GD, सुमेधा, विनायक, a-xpressions प्रतिक्रियांबद्दल धन्यवाद.
घाटाच्या पलीकडे राहिल्यामुळे घाटावरचे दृष्य खुप वेळा पाहीले नाहीये.

Arundhati said...

Faarach sundar! Itka chaan kadhi lihayla laaglis ga :-)?

Keep it up!! And may the good posts rain ;)

Rasika Mahabal said...

amazing lihil ahes... kharach pavasat bhijalyasarakha vatal.