Wednesday, August 29, 2007

श्रद्धा की अवडंबर?

गेल्यावर्षी भारतात गेले होते त्यावेळी प्रकर्षाने जाणवलेली एक गोष्ट म्हणजे देवळांची वाढणारी संख्या, खुप वेगवेगळ्या महाराजांची नावे, व्याख्याने वगैरेंच्या जाहीराती. प्रत्येक गल्लीत असलेली गणपती मंडळे प्रत्येकाचे वेगळे ऑफीस! अचानक हा बदल कधी झाला? इतके वेगवेगळे साधु अचानक कुठुन आणि कधी आले? त्यांना स्वत:च्या प्राचाराची आवश्यकता का वाटायला लागली. हे सगळे नक्की बदलले कधी.

लोकमान्य टिळकांनी ज्या कारणासाठी गणेशोत्सव चालु केला होता त्याच कारणाने अजुनही चालु ठेवावा असे मला अज्जीबात वाटत नाही पण त्याला आलेले प्रचारकी म्हणा किंवा बाजारु जे स्वरुप आहे ते कोठेतरी खटकते. गल्लोगल्ली असलेली गणेश मंडळे आहेत ती नक्की काय कामे करतात? त्या गल्लीतला गुंडच त्याचा प्रमुख असतो बरेचवेळा. हट्टाने देणग्या ’घेतल्या’ जातात. मोठे मोठे स्पिकर्स आणुन ढणढण गाणी लावायची आणि त्यावर नाचायचे. शेजारी पाजारी वृद्ध लोक असतील लहान बाळे असतील त्याचा काहीही विचारच नाही. ह्या सगळ्यात आपण गणपतीची पुजा करतो म्हणजे काय करतो, कशासाठी करतो ह्याचा सारासार विचार तरी केला जातो की नाही माहीत नाही. ह्या मंडळांचे जे कोणी कार्यकर्ते असतात त्यांना नोक~या, शाळा, कॉलेजेस वगैरे तरी असतात की नाही हे तो गणपतीबप्पाच जाणे!

एकुणच सगळ्याला खुप बाजारु स्वरुप आलेय. सगळ्या नवीन ’साधु-संताना’ आपल्या प्रवचनांच्या पानपान भरुन जाहीराती कराव्या लागतात. कित्येकांच्या अंगावर प्रचंड दागदागीने, भरजरी साड्या वगैरे दिसतात. पुर्वीचे संत तुकाराम महाराज, ज्ञानेश्वर महाराज, अक्कलकोट महाराज, वगैरे जे होऊन गेले त्यांचा साधेपणा हाच त्यांचा दागीना वाटायचा. हे कधी आणि कसे बदलले? खरोखर विचार करायला लावणारी गोष्ट आहे. कित्येक रुपये खर्च करुन लोक तिरुपतीला जातात तिथे ताटकळत उभे रहातात अक्षरशः १ मिनीटापुरते दर्शन मिळते त्यासाठी इतका अट्टाहास का? जी गोष्ट बालाजीची तिच गोष्ट कोल्हापुरच्या अंबाबाईची. गेले ३-४ वर्षे मी कोल्हापुरला जाऊन देवळात गेले नाहीये का? तर इतकी गर्दी आणि चो~या मा~या हेच नित्याचे. लोक खरोखर अचानक इतके देवभक्त झाले का? कळत नाही. गेल्यावर्षी तिरुपतीप्रमाणे पंढरपूरला देखील पैसे देवुन लगेच दर्शन मिळण्याची वेगळी रांग चालु केली होती अजुनही आहे की नाही माहीती नाही. पण वारीबरोबर येणारे भक्तगण तिष्ठत त्या सावळ्या विठुरायाच्या दर्शनासाठी उन्हा-पावसाचे ताटकळत उभे असताना कोणी धनवंत फक्त धनाच्याच बळावर स्वत:च्या गाडीतुन येउन दर्शन घेउन जाणार हे चित्र प्रचंड संतापदाय़ी आहे.

माझा देवावर विश्वास आहे. तोच माझा पाठीराखा आहे ह्याबद्दल माझी खात्री देखील आहे. पण त्याचे हे असले अवडंबर झालेले मनाला पटतच नाही. हे कुठेतरी बदलले पाहीजे. बदलण्यासाठी एखाद्या लोकमान्यांची, फुले, अंबेडकरांचीच आज आपल्या समाजाला गरज आहे.

(ही माझी वैयक्तीक मते आहेत त्याचा कृपया अन्य गोष्टीशी संबंध लावु नये ही विनंती)

Tuesday, August 28, 2007

ऐलतीर-पैलतीर

दोन आठवड्यापुर्वी मिशन पीक ला जाण्याचा पराक्रम केला आणि येताना उतारावर दगडांवरुन पाय सटकुन पडले इतके की ९११ ल फोन करुन त्यांच्या मदतीने राहीलेले अंतर खाली यावे लागले. ते पडणे इतके मोठे निघाले की आता पायाला ६ आठवडे प्लास्टर घालुन बसणे एवढाच उपाय होता. तर सध्या अस्मादीक कुबड्या घेउन कसे चालावे ह्याचे प्रशिक्षण घेत आहेत!

घरी (म्हणजे देशात) रोजचे फोन चालु आहेत. इथे मला मदतीला कोणी नाही म्हणुन घरचे हळहळताहेत आणि त्यांची आठवण येउन माझ्या डोळ्यातले पाणी ओसरत नाहीये. इथे रहाताना घरच्यांची आठवण न होता दिवस पुढे सरकत नाहीत
आणि तिथे गेले की इथल्या काळज्या मनातुन जात नाहीत. एकुण हे द्वंद्व प्रत्येक परदेशस्थ भारतीयाच्या मनात चालु असते. तिकडुन मदतीला लगेचच कोणी येउ शकेल ही परीस्थीती नाहीये. इथल्या मैत्रीणी आपापल्या भागादौडीने थकलेल्या! मला येउन मदत करण्याची त्यांची कितीही इच्छा असेल तरीही ते शक्य होत नाही. ह्या सगळ्या परीस्थीतीमधे ’आपण भारतात असतो तर’ हा विचार उचल खातो. देशात असते तर घरुन कोणीही निश्चीत आले असते मदतीला हे नक्कीच कारण पासपोर्ट, व्हीसा, थंडी, भाषा असल्या गोष्टीचा त्रास नसता झाला. आले मनात की तिकीट काढुन आले इतके ते सोपे होते. डॉक्टरशी समोरासमोर बसुन पाहीजे तितके प्रश्ण विचारता आले असते. रात्री-अपरात्री गरज लागली तर कदाचीत डॊक्टरने फोन उचलुन मदतही केली असती. येवढ्या सगळ्या जमेच्या बाजु आहेत! मग आपण इथे काय करतोय? कशासाठी इथे रहातो? पैसा? मान-मरातब? सुखसोयी? पैसा आहे पण रोजचे घरचे काम आपले आपणच करावे लागते. अगदी कितीही कंटाळा आला तरी भांडी घासणे, केर, स्वयंपाक हे सगळे आपले आपणच बघावे लागते. भाजीपाला, किराणा सामान आपले आपणच घरात आणावे लागते.
पण हवेचे प्रदुषण, आवाजाचे प्रदुषण नाही. शनिवार रविवार सुट्टी अपल्याला आवडते ते शिकण्यात घालवता येते. शिक्षण पुढे चालु ठेवता येते. मुलांसाठी सुसज्ज पाळणाघरे आहेत आणि तिथे मुलांची आबाळ होणार नाही ह्याची खात्री असते. जात-पात, धर्माच्या नावावर चालणारे दंगे नाहीत. रोजच्या व्यवहारात तुम्हाला तुमच्या जातीचा दाखला द्यावा लागत नाही. सामाजीक समानता जाणवते. तुमच्या उत्पन्नाच्या प्रमाणात तुम्हाला आयकर द्यावाच लागतो. एखाद्या कागदपत्रासठी उगीचच अडवणुक केली जात नाही. रस्ते, पाणी, वीज, वहातुक ह्यासारख्या रोजच्या गरजांसाठी धावपळ करावी लागत नाही.

एकीकडे राहीले तर घरचे सगळे जवळ आहेत पण रोजच्या जगण्यासठी कराव्या लागणा~या लढाईत आपण जगणेच विसरुन जाउ की काय अशी भीती आहे. दुसरीकडे सुसज्ज सोयीनी जगताना घरच्यांपासुन, आपल्या देशापासुन, आपल्या मुळांपासुन फ़ारकत घेतोय की काय अशी भीती आहे.

ऐलतीरी राहायचे की पैलतीरी हया प्रश्नाचे उत्तर प्रत्येकाने आपापल्या आवडीनुसार, परीस्थीतीनुसार, घ्यायचे असते, घेतलेलेही असते.