Thursday, May 11, 2006

जेव्हा तिची नी माझी रानात भेट झाली ...

१० वी ची पूर्व परीक्षा चालु होती. दुसरा दिवस - इंग्लिश आणि जीवशास्त्र असे २ पेपर होते. मी आणि अंजु नेहेमीप्रमाणे अगदी १२ वाजायला शाळा भरायची तर ११.४५ ला घरातुन निघालेलो. पेपरची धाकधुक होतीच. त्यातुन पाणंदीतुन जाणारा म्हशींचा कळप दिसला. मी थांबले आणि अंजुला म्हणाले आता आपल्याला पोचायला नक्कीच उशीर होणार. ती म्हणाली काही नाही होत उशीर. आणि तिने स्वत:ची सायकल तशीच त्या म्हशींच्यामधुन दामटवली. आणि ती त्या कळपाच्या दुसर्या टोकाला जावुन माझी वाट पहात उभी राहीली. मी घाबरत घाबरत माझी सायकल म्हशींच्या घोळक्यात घातली आणि दोन म्हशींचे जे काय भांडण लागले म्हणता!! नळावर कशा बायका एकमेकींच्या अंगावर धावुन जातात अगदी तस्सेच एक म्हैस दुसरीच्या अंगावर गेली की धावुन. तिला बापडीला काय पडलेले की मनुष्य नामक एका प्राण्याचे एक छोटे पिल्लु सायकल नामक वहानावर बसुन तिथुन जातय. तिने जी ढुशी मारली म्हणता!! मला हलकासा (??)धक्का देउन तिने तिच्या मैत्रिणीवर हल्ला केला. दुसरी बाई थोडीच गप्प बसणार आहे? तिने लगेच उलट धक्का मारला. ह्या सगळ्या हलक्या धक्क्यांचा परीणाम म्हणून मी एकदम पाणंदीच्या कडेला झाडात जाउन पडलेले. त्या नादात माझा चष्मा सुरक्षीत ठेवु शकले. तोपर्यंत म्हशीवाले काका आले ते सोडवायला. अंजु आली माझी सायकल दोघानी मिळुन उचलली. अंगाला असह्य वेदना होत होत्या. शाळेचा ड्रेस चिखलाने भरलेला. सायकलचे चाक वाकडे झालेले. घर ३ मिनिटावर होते पण ह्या प्रकारात आधीच ७ मिनिटे वाया गेलेली. परीक्षेची जाणीव झाली आणि मग तसाच आमचा मोर्चा शाळेकडे वळवला. १० मिनिटे उशिर झाला, नुकतीच प्रार्थना संपलेली पण पेपर सुरु नव्हता झालेला. मुख्याध्यापकाना सगळे सांगितले आणि पेपर ला गेले. दुपारच्या सुट्टीत उजळणी करण्याऐवजी माझ्यावर उद्भवलेल्या प्रसंगाची उजळणी, शहानीशा आणि उहापोह वगैरे झाला. टिंगल टवाळी न करतील त्या कन्याशाळेतल्या १०वी अ च्या विद्यार्थीनी कसल्या ....

अशी झालेली ती अविस्मरणीय भेट आज तुमच्या भेटिला आणलीय.

3 comments:

Anonymous said...

लेख छानच आहे. सगळा प्रसंग डोळ्यासमोर उभा राहीला.

Y3 said...

सूरेख...
अशाच आठवणींच्या रूपाने आयुष्यातले प्रसंग मनात राहतात.. नंतर कधीही आठवून हसू येत.. कधी कधी ते दिवस हरवल्याच वाईटही वाटत..

abhijit said...

लहानपणी एकदा रानात म्हशीच्या पाठीवरून पडलो होतो त्याची आठवण झाली. चांगलं नांगरलेलं रान होतं. पहिल्यांदा असं वाटलं की तू शिर्षक द्यायला चुकली आहेस. लेख वाचला तेव्हा एक्दम हसायला आलं. :-)