मेधाने महत्वाचा प्रश्नाला हात घातलाय - तुमच्या पुस्तकांची तुमच्यानंतर तुम्ही काय सोय लावणार आहात? असले अतिशय high funda विषय मला कधीच कसे सुचत नाहीत असा विचार करतच हे लिखाण करतेय.
खरंच माझी पुस्तके माझा जीव की प्राण आहेत. कुणी पुस्तकचे कोपरे वगैरे दुमडुन खुण वगैरे करत असेल तर मला प्रचंड राग येतो. देशात काहीही विकत घ्यायला जमत नसेल तर वाईट वाटत नाही पण दिलखुष बुकस्टॉला जाता आले नाही तर मात्र खुपच त्रास होतो.
मला पुस्तकांची आवड पप्पांच्यामुळे लागली. त्यांनी स्वत:ला पुस्तकांच्यासोबत रहायला आवडेल म्हणुन ग्रंथपालाची नोकरी पत्करली. स्वत:चे कित्येक पगार पुस्तकांवर खर्च केले. आम्हाला कधी बाहेर खायला घेउन गेले नाहीत पण चांगली पुस्तके वाचायला मिळावीत, संग्रही असावीत म्हणुन खुप खर्च केला. प्रसंगी मम्मीशी वादावादी पण झाली असेल. त्यांच्याकडे श्रीमानयोगीचे २ खंड आहेत तेही पहिल्या आवृत्तीतले आणि त्यांनी नावनोंदणी करुन घेतलेले. तसेच पुलंची खुप पुस्तके पहिल्या / दुस~या अवृत्तीतली. प्रकाश संतानी स्वत: स्वाक्षरी करुन भेट दिलेली पुस्तके. असले collection असताना त्याचे पुढे काय हा विचार करावासाच वातत नाही. मला भारतातुन येताना ती सगळी पुस्तके इकडे आणायची खुप इच्छा आहे त्यासाठी पप्पा तर तयार होतील कारण त्यांची पोरे सुस्थळी पडतील याची त्यांना खात्री आहे पण सुबोध आणि मम्मी असे दोन मोठे अडथळे पार करावे लागतील. 'मोह वाईट' वगैरे वाक्ये पुस्तकात लिहायला ठिक पण ती प्रत्यक्ष आचरणात आणणे काही शक्य वाटत नाही. पुस्तकांच्या बाबतीत तर नाहीच. पप्पांच्या पुस्तकांचे जाउदे पण माझ्या पुस्तकांचे काय करायचे? फ़ार काही मोठे collection नाही माझे पण आहे ते माझे आहे. संभाजी, बापलेकी, शरदासंगीत, वनवास, शाळा, गौरी देशपांडेंची बरीचशी पुस्तके, अनील अवचटांची पुस्तके!! माझ्यानंतर माझ्या ह्या लेकरांचे काय होणार? माझ्यानंतरचे जाउदे पण कायमचे भारतात जायचे ठरवले तर त्या पुस्तकांचे काय करायचे? लालूने दिलेले गिफ्ट, बाळुदादानी दिलेली पुस्तके अशी पुस्तके कुणाला नाही देऊ शकणार. काही पुस्तके अगदीच टाकावु आहेत त्यांचे काय करायचे हे ठरवणे खुप अवघड जाणार नाही पण माझ्या प्रिय पुस्तकांचे काय?
माझ्या दागदागीनांचे, साड्या, कपड्यांचे काय करायचे ते ठरवताना कदाचीत मला त्रास होणार नाही. पुस्तकांच्या बाबतीत निर्मोही होणे मला तरी शक्य होईल असे वाटत नाही? तुम्हाला काय वाटते? तुम्ही ठरवलेय तुम्ही तुमच्या पुस्तकांचे तुमच्यानंतर काय करायचे? कुणाला ह्यावर Tag व्हायला आवडेल?