Friday, September 14, 2007

गणपती बप्पा मोरया!

गणपतीची तयारी कशी चालु आहे? फुले, दुर्वा, मणीवस्त्र, फुलवाती, साध्या वाती, तेल, तुप, कापुर, निरांजन, आरतीचे पुस्तक (!), प्रसाद, हार सगळी तयारी झाली का? काय? मणीवस्त्र म्हणजे काय? कसे करायचे माहीती नाही. अरेच्चा एवढेच होय१ सोप्पे आहे की ते! येथे टिचकी मरा . अगदी स्टेप बाय स्टेप दिलेय मी.

मग करा बघु बप्पासाठी मणीवस्त्र तयार.

Sunday, September 09, 2007

आई मला शाळेत जाऊ दे ...

सध्या इथे नुकतेच शाळा/कॉलेजेस सुरु झाली आहेत किंवा होत आहेत. सगळ्या दुकानांमधुन Back To School सेल चालु आहेत. निरनिराळ्या प्रकारचे पेन, रंग, वह्या, दप्तरे पाहिले की मला माझी शाळा सुरु होतानाची लगबग आठवते. सगळ्यांनाच होत असेल.
मी जवळपास तीन वर्षांची असल्यापासुन बालवाडीत जात होते कारण आजुबाजुची मुले शाळेत जातात तर मग मी का घरी बसायचे हा हट्ट. मग पप्पा शाळेत जाताना एका लहान बालवाडीत मला सोडुन पुढे कॉलेजला जायचे. ४ वर्षांची असताना बाराखडी, अंक वगैरे सगळे नीट येत होते म्हणुन मग मम्मी पप्पांना वाटले की मी पहील्या इयत्तेसाठी तयार आहे म्हणुन मग मला शाळेत घेऊन गेले. पण वय कमी असल्याने मुख्याध्यापकांनी मला शाळेत दाखल करुन घ्यायला नकार दिला. त्यावेळी मला त्या शाळेत घेत नाहीत म्हणुन पसरलेले भोकाड मला अजुनही आठवते आणि आजुबाजुची जनता अवाक! कारण शाळेत जाताना रडलेली जनता खुप असते आणि शाळेत घेत नाहीत म्हणुन रडणारे आमच्यासारखे शुरवीर खुपच कमी.

शाळेसाठीची खरेदी हा एक त्याकाळी सोहळाच असे कारण सगळ्या गोष्टी अगदी नेहेमीच मिळायच्या असे नाही दप्तरे फ़क्त मे, जुन, जुलै महीन्यातच मिळायची मधे अधे कधी दप्तर फ़ाटले तर तेच दुरुस्त करुन वापरण्याशिवाय गत्यंतर नसायचे. शाळेसाठी नवीन पाटी मिळणार का? ह्यावर्षी तरी मी मम्मीला मोठी झालीय असे वाटुन पेन्सिलच्या ऐवजी पेन मिळणार का? आणि पेन शाईचे न मिळता बॉलपेन मिळेल का असले बालसुलभ प्रश्न कायम खरेदीच्यावेळी डोक्यात. कारण घरात कितीही ’तु म्हणशील ते घेऊ’ असे म्हणलेले मम्मी पप्पा पाटील आणि कंपनी किंवा भालचंद्र स्टोअर्स किंवा रमेश स्टोअर्स मधे गेले की त्यांना जे आवश्यक वाटेल तेच घेउन यायचे आणि मग घरी आल्यावरचे मुसमुसणे, चिडचिड मग त्यावरचे रागावणे अगदी ठरलेले!
अशातच मग तिसरीच्या खरेदीच्या वेळी न मागता मिळालेला चांदीच्या रंगिबेरंगी कागदात गुंडाळलेल्या पाटीवरच्या पेन्सिलीचा अक्खा पुडा किंवा चौथीच्या खरेदीच्या वेळी न मागता मिळालेला कॅमलीनचा संपुर्ण कंपास असे मस्त धक्केही मिळायचे. असे मिळालेले धक्के ही अगदी मग न चुकता दरवर्षी मिळत गेले. कधी मस्त कार्टून्स असलेली ६ इंची पट्टी असेल किंवा मग ०.५ ची मेकॅनिकल पेन्सील असेल किंवा मग १२ रंगांच्या ट्युबचा सेट असेल. पण ते त्यावेळी कधी जाणवायचे नाहीच. आता आठवत रहाते की त्यावेळी शाळेसाठी उपयोगाचे पण जरा महागाचे, सर्वांकडे सहजी नसेल असे काहीतरी नक्की घेतले जायचे.

नविन पुस्तके, वह्या हा तर नवीन शाळेचा अविभाज्य भाग. पप्पा मनापासुन सगळ्या पुस्तकांना कव्हर्स घालुन द्यायचे. पुढे त्यांनी मलाच शिकवल्याने मी पण त्यांच्याच तन्मयतेने ते काम करायचे. आजदेखील मी देशातुन येताना जी पुस्तके आणते त्यांना पप्पा कव्हर्स घालुन देतात! त्यानंतर त्यावर आपल्या ’सुवाच्य’ अक्षरात नाव घालायचे आणि मग शाळेत गेल्यावर सगळ्यांच्या वह्यांवर आई/बाबा/मामा/काका/मोठे बहीण/भाऊ यांनी घातलेली नावे पाहीली की झालेली चिडचीडही आठवते. मला वहीच्या पहील्या पानावर नावाव्यतीरीक्त काही लिहिलेले आवडायचे नाही. आणि शक्यतो शेवटच्या पानावरही गिरगिटु नये असेही वाटायचे. साधारण ९ वी किंवा १० वी मधे असताना माझ्या डोक्यात एक कल्पना आली ती म्हणजे नावाच्या पानावर एक चित्र काढुन ते रंगवायचे. ते पण काम मग मी शाळा सुरु होण्याआधी पूर्ण करत असे. दरवर्षी एक वेगळी थीम घेउन! शेवटच्या पानावरच्या गिरगटण्यावर उपाय नाही सापडला कधी ...

पावसाळी चप्पल आणि छत्री किंवा रेनकोट घेण ही पण एक शाळा सुरु होतानाचीच खरेदी. तसेच नवीन युनिफॉर्म्सची खरेदी पण हा एक आनंदसोहळाच! केस लहान असल्याने रिबीन्स वगैरे घेणे हा भाग नसे. तसेच नविन दप्तर हेही एक प्रकरण असे. मला आवडलेली कुठलीही चप्पल, छत्री किंवा दप्तर फक्त शोभेसाठीच आहे हे मम्मी मला पटवुन देउन ’उपयोगी’ आणि ’टिकावु’ वस्तु घेउन यायची. मग घरी आल्यावर धुसफ़ुस कारण शाळेतल्या ’चांगल्या’ मुली मला नावे ठेवतील ही चिंता!

आता शाळा/कॉलेज संपले. आता ह्या ’Back To School' मधे जाउन मी एखादे नवीन प्रकारचे पेन मिळतेय का पहाते . किंवा Back To School Drive साठी जाऊन एखाद्या गरजु मुलीसाठी सगळी खरेदी अगदी मनसोक्त करुन येते. ती खरेदी अगदी माझ्याचसाठी आहे इतक्या तन्मयतेने फ़िरुन ती खरेदी करुन माझ्या शाळेच्या खरेदीची आठवण ताजी करुन येते.

Thursday, September 06, 2007

बेळगाव की बोळगाव

आज प्रकाश संत यांचे ’पंखा’ वाचत होते खुप दिवसानी. त्यातली भाषा, जागांचे उल्लेख सगळे आहेत ते बेळगावचे. बेळगावशी पहीला संबंध कधी आला माहीत नाही. मला आठवतेय तसे गिरिशकाकांच्या लग्नाला की रिसेप्शनला पहिल्यांदा बेळगावला गेलेले ते आठवते. हे सगळे असले तरी बेळगावचा पहीला ऐकीव उल्लेख आठवतो तो म्हणजे रावसाहेब! पु. ल. नी बेळगावच्या भाषेची एवढी सुंदर नक्कल केलीय की बास. पण ते गाव मनापासुन घर करुन राहीले ते मात्र दोन कारणांसाठी - एक म्हणजे आमचे हरिमंदिर आणि दुसरे म्हणजे आज्जीचे घर. हरिमंदिराविषयी मी पामर काय लिहिणार. तिथे मिळालेली शांती जगात मला अजुन कोठेही अनुभवता आलेली नाही.

आज्जी म्हणजे माझ्या वडीलांची मावशी. बहीण गेल्यावरही तितक्याच आपुलकीने आमच्या सगळ्यांचे लाड करणारी आज्जी. मला आज्जी म्हणले आठवणा~या ४ आज्जीपैकी एक. माझे आजोळ कराडच. त्यामुळे आजोळी जाणे वगैरे अप्रुप आम्हाला कधी चाखायला मिळालेच नाही. त्यातुनही अजोळी बरेच तिढे पडल्याने आज्जी, अजोबा आणि एक मामा यांच्याशिवाय कोणी प्रेमाचे वाटु नये अशी परीस्थीती. त्याच न कळत्या वयात आत्या आणि काकांच्या लग्नासाठी म्हणुन बेळगावला रहायला गेले होते. घरात आम्ही १०-१२ चुलत भावंडांची पलटण होती. त्यात मी सगळ्यात मोठी! त्यावेळी आम्हा भावंडांचे एकमेकांशी नक्की काय नाते आहे हे सांगणेही जमत नसे. टि. व्ही. नव्हता त्यामुळे सतत कसला ना कसला तरी खेळ खेळत आमचा दंगा चालायचा. आजोबांचा होलसेलचा मोठा व्यावार होता आणि त्याचे ऑफीस घरात असल्याने त्याची पण वर्दळ सतत असायची. मराठीची वेगळी ढब आधीपासुन माहीत होती पण तिथे राहिल्यावर आमच्याही भाषेत झालेला फ़रक कधी जाणवला नाही. ’आत्ता हेच जेवुन सोडलो बघा.’ असली वाक्ये ऐकुन हसणारे आम्ही २ दिवसात नकळत पणे तसेच बोलायला लागलेलो. घरात राचोटीअज्जा म्हणुन एक स्वयंपाकी होते खुप वयस्कर. ते अजुशी वगैरे कधीतरी इंग्लिशमधे बोलायचे. ऐकुन मजा वाटायची. घरात निम्मे लोक मराठी आणि निम्मे कानडी त्यामुळे सहज दोन्ही भाषा कळायला लागलेल्या. सकाळी अज्जारी दुकानात जाईपर्यंत जरा घरात शांतता कारण निम्मी पलटण उठलेली नसायची. कधीतरी लवकर उठुन अज्जारींच्याबरोबर दुध घ्यायची वेळ आली की ततपप होणार हे नक्की कारण ते नक्की कुठले तरी मराठी वाक्य ऐकवुन हे म्हणजे काय ते सांग असले काहीकाही सांगत! बेळगावमधे राहुनही आज्जी आणि अज्जारी मराठी नेहेमी वाचत त्याचे त्यावेळी आश्चर्य वाटायचे.
समादेवी गल्ली, मारुती गल्ली, गोंधळी गल्ली, रेडीओ टॉकीज, सन्मान, बिस्कीट महादेव, मिलिटरी महादेव, कित्तुर चन्नम्माचा पुतळा, बाळेकुंद्री ही सगळी ठिकाणे तिथे राहील्याने माहीत झाले. लाल मातीने पांढ~या फॉकचे जे काही नमुने झालेले ते बघुन मम्मी जवळपास बेशुध्दच पडायची राहीलेली. बेळगावला खाल्लेली ओल्या काजुची उसळ, आलेपाक अवल्लक्की, कुंदा अजुनही आठवत रहातो. प्लांचेट हा प्रकार तिथे पहिल्यांदा पाहीला. प्रचंड भीती वाटलेली तेही नीट आठवते.
तिथुन पुढे एक वर्षाआड का होईना बेळ्गावला जात आले आणि ते गाव तिथली माणसे, भाषा यांच्या परत नव्याने प्रेमात पडत आले. त्याच दरम्यान कधीतरी पुलंची रावसाहेबची कॅसेट घरी आणलेली. त्याची पारायणे करताना बेळगावची मिठास सतत वाढत राहीली. परवा डिसेंबरमधे बेळगावला जाउन आले बराच फ़रक झालेला जाणवला. आज्जी अजोबा दोघेही थकले. आज्जारींची पुर्वीइतकी भीती पण वाटत नाही पण आदर मात्र पुर्वीपेक्षा दुपटीने वाढलाय. त्यांच्या कर्तुत्वाचा मोठेपणा आता जास्ती भावतो. चुलत भाऊ बहिणी आता खुप मोठे झालेत तरी तेच प्रेम तीच आपुलकी अजुनची आहे. गाव बदलले बोळही आता राहीले नाहीत पण मातीचा रंग, हवा अज्जिबात बदललेला नाही. अजुनही आज्जी बाजारात तेवढ्याच उत्साहाने जाते पण आता धाकटी चुलत बहीण तिच्या सोबत असते.

गाव बदलत जाईलच, माझे जाणे जसे जमेल तसे जेव्हा जमेल तेव्हा ह्या प्रकारात जाईल पण प्रकाश संतांची पुस्तके आणि पुलंचे रावसहेब मला मी पाहीलेल्या बेळगावची आठवण नक्की करुन देतील.