Tuesday, November 28, 2006

रविवार माझ्या आवडीचा ...!!??!!

दिवस उद्याचा हा सवडीचा
रविवार माझ्या आवडीचा

गेले कित्येक रविवार काम, खरेदी, कुणाचे वाढदिवस अशातच चालले आहेत. खुप दिवसापासुन रविवारी फ़क्त आराम करायचा, गाणी वगैरे ऐकत मनसोक्त पुस्तके वाचायची, मनसोक्त चित्रे काढायची इच्छा आहे. मला आठवतात ते सगळे लहानपणीचे रविवार असेच मस्त लोळत पुस्तक वाचलेले किंवा रंगाच्या गराड्यात बसुन असंख्य चित्रे काढलेले. टेलीव्हीजन नावाचा प्रकार मी लहान असताना म्हणजे मी १०वी मधे जाईपर्यंत घरी आलेला नव्हता त्यामुळे तो सगळा वेळ मला माझे बरेच उद्योग करण्यासाठी वापरता यायचा.

रविवार सकाळ सुरु व्हायची ती नेहेमीप्रमाणे पप्पांनी लावलेल्या रेडीओमुळे, जी अजुनही होते कराडला गेले की! मग मम्मीने कप मधे घालुन दिलेले दुध गरम आहे म्हणुन तासभर पित बसायचे. तास अन तास दुध पित बसते ही रोजची ओरडणी रविवारी पण चुकायची नाहीत! मग अंघोळ वगैरे करुन आठ सव्वाआठला बालोपासनेला जायचे आणि रमत गमत साडेदहा पर्यंत परत यायचे. कधी मम्मी पप्पा मंडईत गेलेले असायचे, मग ते येईपर्यंत लैलाच्या आई घरात बसवुन ठेवायच्या. तोपर्यंत मग पेपर अलेला असेल तर (तेव्हा कराडला लोकसत्ता दुपारपर्यंत कधीतरी यायचा) बालविभाग वाचत बसायचे. किशोर, कुमार ही मासीके पण घरी यायची, अमृत पण असायचा काहीतरी वाचत बसायची खोड लागली. मम्मी पप्पा मंडईतुन आले की जेवण करुन जेवुन मम्मी पेपर वाचत बसायची कोडी सोडवणे हा तिचा आवडता छंद होता. दुपारभर चित्रे काढणे, सुबोधबरोबर भांडणे, बाहेर खेळायला जाऊ का अशी भुणभुण लावणे. पप्पांची डुलकी झाली की ते दुपारी विविधभारती, किंवा सिलोन रेडीओवर हिंदी गाणी लावायचे. काही कळायचे नाही पण कानावर पडायचे.

कधी कधी सकाळी उठायला उशीर झाला आणि बालोपासनेला गेले नाही तर मग सकाळचे बालोद्यान ऐकायला मिळायचे. शमा खळे, रचना आणि योगेश खडीकर यांची गाणी अगदी तोंडपाठ होती. पप्पांना गाणी ऐकायची प्रचंड हौस होती (आणि अजुनही तितकीच आहे!) त्यामुळे कामगार सभा, आपली आवड, लहान मुलांची आपली आवड, दुपारी मुंबई ब केंद्रावर लहान मुलांच्यासाठी कथावाचन वगैरे असायचे. फास्टर फेणे, गोट्या पहिल्यांदा तिथे ऐकले. टी.व्ही नव्हता त्यामुळे संध्याकाळी सगळी गल्ली डबाऐसपैस, लगोरी, लपाछपी असले फुटकळ खेळ खेळायचो. पण ते सुद्धा संध्याकाळीच कारण मम्मी पप्पा आज्जीबात दिवसभर घरातुन बाहेर पाठवायचे नाहीत. घरात बसुन वाचन करणे, अभ्यास करणे, चित्रे काढणे हे सगळ्यात महत्वाचे वाटे. आजुबाजुला रहाणारी मुले-मुली म्हणजे एका वर्षात २ वेळा बसले तरी चालते ह्या प्रकारात मोडणारी होती त्यामुळे पण असेल. आठवीनंतर ३ वर्षे शेजार नव्हताच त्यामुळे मग माझेच काही काही उद्योग चालायचे. त्या दरम्यान रवीवारच्या सुट्टीत केलेला एक अतीशय महत्वाचा उद्योग म्हणजे मैत्रीणीन्च्या घरी जाउन वेगवेगळी फुलझाडे गोळा करणे, वेलींना आलेल्या फुलांचे गाठींचे गजरे करणे!!

काय धमाल दिवस होते! गेल्यावर्षी मामेभावंडांचे रविवार बघीतले आमच्याच गावात, ह्या पोरांना रेडीओ माहीत नाही, बालगीते माहीत नाहीत, दिवसभर कसले कसले क्लास आणि टी. व्ही.!! कळत नाही ही मुले काही गमावताहेत की आम्ही खुप सारे क्लास न करुन खुप काही शिकलो नाहीये ...

जोगीण

काल प्रिया च्या चाट चा status message ह्या कुसुमाग्रजांच्या कवितेच्या पहिल्या ३ ओळी होत्या. मी कवीतांपासुन नेहेमी ४ हात लांब रहाणारी, पण ह्या ओळी मात्र एकदम भावल्या. तिच्या परवानगीने मग मी तो माझा status message केला (अर्थात तिला दुसरी ह्या कवितेसारखी अजुन एक मस्त कविता मिळालीच!!) त्यावर अजुन एका मैत्रीणीने विचारल्यावरुन ही सगळी कवीता इथे टाकतेय.

जोगीण

साद घालशील तेव्हाच येईन,
जितकं मागशील तितकंच देईन...
दिल्यानंतर देहावेगळ्या सावलीसारखी निघून जाईन...

तुझा मुगुट मागणार नाही,
सभेत नातं सांगणार नाही...
माझ्यामधल्या तुझेपणात जोगीण बनुन जगत राहीन...

~कुसुमाग्रज

सुमेधा, वृषाली सारख्या मैत्रीणीना आश्चर्याचा धक्का बसल्यावाचुन रहाणार नाहीये !!!

Tuesday, November 21, 2006

एकटेपणा

मला सगळ्यात जास्ती नकोसा वाटतो तो एकटेपणा. मला आठवतेय तशी मी सतत माणसांमधेच राहीले आहे. पण माणसांच्या गोतावळ्यात राहुनही कधीकधी एकटेपणा घेरतो त्याला काय म्हणायचे? मला आठवतेय ४थी मधे शाळा सुटल्यावर scholaship चा क्लास असायचा. तो झाला की मी आणि मेघु टंगळमंगळ करत घरी जायचो. घरी जाईपर्यंत साधारण २ वाजायचे म्हणुन शाळा सुटल्यावर खाण्यासाठी मम्मी पप्पांच्याबरोबर १०.३० ला चपाती-भाजी किंवा भाजी-भाकरी-लोणी असा डबा द्यायची. वर्गात सगळ्यांचेच तसे डबे यायचे. आम्ही शाळा सुटल्यावर साधारण १२ वाजता तो डबा खायचो.
घरी पोहोचायचे तेव्हा मम्मीच्या शिकवण्या, शिवणकाम, शिवणकामाचे क्लास असे काही ना काहीतरी चालु असायचे. त्यामुळे मग मला राहिलेला भात वगैरे एकटीलाच खावे लागायचे. एकटीला जेवताना अज्जिबत जेवण जायचे नाही. कसे तरी पोटात ढकलायचे आणि अभ्यास किंवा खेळ सुरु करायचा. मला अजुनही कधितरी ते एकटीने जेवलेले आठवते आणि एकदम एकटेपणाची जाणीव होते. गेले काही दिवस असेच एकटीने जेवतेय. घर थंड पडलेले, बाहेर ५ वाजताच दाटुन आलेला काळोख, ह्या सगळ्यामुळे खाण्याची इच्छाच नाहीशी होते. मग हा एकटेपणा घालवण्यासाठी रोज घरी भारतात फोन करायचा किंवा मग रात्री उशीरापर्यंत chatting करत बसायचे. सकाळी मग नीट जाग येत नाही वेळेवर मग निश्चय करायचा कि आजपासुन वेळेवर झोपायचे!
सध्या घरी सुबोधच्या लग्नाची तयारी खुप जोरात चालली आहे आणि मी सगळे मिस करतेय. ते मला मिस करताहेत की नाही महिती नाही, असावेत असे वाटतेय. पण ह्या सगळ्यामुळे मला माझ्या एकटेपणाची जाणीव खुप प्रकर्षाने होते आहे. जेवावे वाटत नाही. काहीही न करता फ़क्त बसुन रहावे असे वाटत रहाते. सगळ्या जगावर चिडचिड होते. पण ती चिडचीड कुणालाच कळत नाही.

गेले काही वर्षे एका अर्थाने एकटीच रहातेय, पण एकटेपणाची सवय मात्र अजीबातच झालेली नाहीये. कधीकधी ह्या गोष्टीचा आनंद होतो कधी स्वत:चा प्रचंड राग येतो.

आज मला सतत ऐकावे वाटतेय असे गाणे -
मै और मेरी तनहायी अक्सर ये बाते करते है।



ह्या गाण्याचा आणि एकटेपणाचा काही संबंध आहे का? असावा ...

Wednesday, October 25, 2006

Tuesday, October 10, 2006

मेहेन्दीचा अनोखा रंग

30 Sept ला मी Hers Annual Breast Cancer walk ला गेलेले. हे माझे तिथे जाण्याचे दुसरे वर्ष. मला hike ला जायला आवडते म्हणुन मी पहिल्या वर्षी जाणार होते पण त्या संस्थेच्या चालीकेला कळले की मला बर्यापैकी ठीक मेहेंदी काढते आणि हौशी कलाकार आहे वगैरे. तिने मला गळ घातली आणि मी त्यावर्षी जाउन जवळपा्स ७५-८० पोरी आणि बायकांच्या हातावर नक्ष्या काढुन परत आलेले. मला त्याचे पार अप्रुप न वाटल्याने, त्याचे फ़ार महत्व न वाटल्याने गेल्या वर्षी मी गेलेच नाही. ह्यावर्षी त्या चालीकेचा परत फोन आला आणि मी हो म्हणाले. एक तर वेळ होता आणि मेहेंदी काधायला हात शिवशिवत पण होता. पण ह्यावेळी बाकीचे volunteers खुपसे interested नसल्याने गर्दी तशी कमीच होती. एक साधारण ६० वर्षाची दोक्यावर अजिबात केस नाहीत अशी तरुणी(!)तिच्या २ मैत्रिणींच्यासोबत माझ्याकडे आली आणि म्हणाली की तिच्या डोक्यावर मागच्या बाजुला एक डिझाईन कढणार का? मला तिच्याकडे बघुन कल्पना आलीच होती की ती सध्या किमोथेरपी मधुन जात असावी. मी आनंदाने एक डीझाईन काढले. तेवढ्यात मग opening ceremony चालु झाला आणि ती मला म्हणाली की ती walk झाल्यावर परत येइल. त्या ओपनींग सेरेमोनी मधे मला कळाले की ती सगळ्यात अलिकडची survivor आहे. तिचे operation होऊनफक्त २ महीने झालेले. माझ्या डोळ्यात एक्दम पाणी आले. किती उत्साही होती ती! इतक्या मोठ्या life threatening event मधुन जाउन पण एकदम उत्साही, खेळकर!
उद्घाटनाचा कार्यक्रम एकदम मनाला स्पर्शुन जाणारा होता. माझ्या एका मैत्रीणीची आई २ वर्षापूर्वी breast cancer मुळे अचानक गेली आणि मला ह्या विषयाची गंभीरता जास्ती समजली. सगळ्यानी आपापले नविन वय सांगितले. एक जण तर ३० वर्षे survivor आहे.
Walk संपला आणि ती कन्या माझ्याकडे परत आली म्हणाली आता परत थोडे डीझाईन काढ! मग मी तिच्या डोक्यावर मागच्या बाजुला अजुन काही डिझाईन काढले. तिच्या मैत्रीणीना खुप आवडले. तिच्या आनंदात त्यानी मला पण सामील करुन घेतले. माझ्या डोळ्यातुन एकदम पाणी आले. माझी कला अश्याप्रकारे कधी कोणाला आनंद देईल असे मला अजीबात वाटले नव्हते. त्यानंतर जवळपास १०-१५ जणी येउन माझे आभार मानुन गेल्या कारण काय तर - I helped a survivor enjoy her day and she helped many of them to celebrate!

Saturday, September 02, 2006

॥ गणपती बप्पा मोरया ॥



घरी मम्मी पप्पा गणपती बसवायला लागुन जवळपास आता २० वर्षे तरी होत आली. गणपती माझ्या अतीशय आवडीचा देव. तसा तो सगळ्यांचाच असतो म्हणा. गेल्या ७ वर्षातल्या गणपतीला मी भारतात नाहीये. माझ्या पद्धतीने मी माझ्यापुरता गणपती साजरा करते. सकाळी उठुन दुर्वा काढुन आणणे, त्या निवडुन नीट त्याच्या जुड्या बनवणे, फुले काढुन आणणे, रांगोळी काढणे असले उद्योग करत सकाळ जायची. घरात मम्मी नंदादीप ठेवते मग त्यात तिला मदत करणे. फ़ुलवाती, कापसाची वस्त्रे करणे ह्यात पण मम्मीला मी आवडीने मदत करायचे. अता ते काही करत नाही- करावे वाटते पण ...
मला माझ्या आठवणीतले खुप गणपती कोल्हापुरला किंवा पुण्याला आजी जिथे असेल तिथे असायचे ते पण आठवतात. आम्ही सुट्टी घेउन जायचो. आजी गेल्यावर मग पुण्यात काकांच्याकडे असायचा गणपती ते पण आठवते. पण लक्षात राहीलेला एक गणपती - मी फ़क्त २ वर्षाची होते, कोल्हापुरच्या घरात बसवलेला गणपती, अण्णा करत असलेली पुजा अंधुक आठवते. बाकी काही नाही आठवत. मग अण्णा गेल्यानंतर पप्पा आणि कडगावच्या अज्जांबरोबर जाउन आणलेला गणपती, घरातली पुजा, विसर्जनाला मी हट्टाने गेलेले, घरचा गड्याने, नागाप्पाने, गणपती विसर्जन करताना वाईट वाटलेले अजुन आठवते.
कराडला जेव्हा आम्ही स्वत:च्या घरी रहायला आलो तेव्हा आणलेला पहीला गणपती पण आठवतो. मी आणि मामा गेलो होतो आणायला. पाउस पडत होता. आणि बसमधुन चिखलातुन सावरत आणलेला गणपती आठवतो. रात्री आम्ही चौघे मिळुन गणपतीची आरास करायचो. खुप आरास नसायची मग ते सगळे मी वेगवेगळ्या flower arrangements करुन सजवुन टाकायचे. रोजाचे पंचाम्रुत करायचे काम माझ्याकडे असायचे. ऋषीपंचमीला मम्मी सकाळी भजनाला पाथवायची ते पण आठवते. त्यादिवशी जाताना आजीसाठी आमच्या बागेत पिकवलेली भाजी आजिच्या उपसासाठी बरोबर न्यायचे. मग मम्मी संध्याकाळच्या भजनाला जाताना मग परत आजीसाठी काहीतरी घेउन जायची.

मामांकडचा गणपती अप्पाअसेपर्यंत ते घरीच बनवायचे. त्याचे ते साचे वगैरे सगळे ते नीट ठेवायचे श्रावणातच त्यांची मूर्ती बनवायची गडबड सुरु व्हायची. गौरीचे मुखवटे पण ते घरी बनवायचे. शाळा असल्यामुळे सगली प्रोसेस कधी पूर्ण पहायला नाही मिळाली पण घरी बनवलेला गणपती असल्याने आजीकडच्या गणपतीची मजा वेगळीच असायची. मामा लोक अगदी मन लावुन साग्रसंगीत आरास करायचे. मुंबईला असलेले मामा नेहेमी गणपतीला सुट्टी काढुन घरी यायचे. विसर्जनाच्या दिवशी मग एक मामा पप्पांच्या मदतीला घरी येणार मग आमचा गणपती विसर्जन करुन, प्रसादाची खिरापत वाटुन मग आजीकडचा गणपती पोचवायला मग मी आणि कधीतरी सुबोध मामांकडे जायचो. आम्ही नदीपासुन दुर रहायचो म्हणुन मग आमचा गणपती विहिरीमधे विसर्जन करायचो. मामांचा गणपती मात्र नेहेमी नदिवर मग धाकटा मामा अगदी नदीमधे आत जाउन गणपती विसर्जन करायचा. पण आम्हा पोराना मात्र नदिच्या पाण्यात पाय घालायची पण परवानगी नसायची. कारण कोयना दुथडी भरुन वहात असायची, बरेचदा विसर्जनाच्यावेळी पऊस पण असायचा. आजीकडचे विसर्जन होईपर्यंतजवळ्पास रात्रीचे साडेसात वाजायचे. खिरापत घेउन मग घरी येत असताना मग मामालोकांच्या डोक्यात गणपती पहायला जायचे विचार यायचे. मग एक मामा सायकलवरुन मम्मीला सांगायला घरी सुटायचा. मग आजीकडेच जेउन रात्रभर गणपती बघुन मग आजीकडे झोपायचे मग कोणीतरी मामा सकाळी ८ वाजता घरी सोडायचा. आजीच्या बरोबर तिच्या अंथरुणात झोपायला मस्त वाटायचे. सकाळी जाग यायची ती आजी गणपतीचे सगळे आवरुन ठेवत असायची त्याचे आवाज ऐकतच.

सहावी ते जवळपास बारावी पर्यंत जवळपास हाच कार्यक्रम असायचा. नंतर हे सगळे कधी आणि का बंद झाले ते पण समजले नाही. दरवर्षी गणपती मधे ह्या सगळ्या आठवणी जाग्या होतात, कधी हसु येते कधी रडु येते. सगळ्याच्या आठवणी येतात. अजोबानी केलेले गणपती आता पहायला नाही मिळणार म्हणुन वाईट वाटते. पण माझा गणपती बाप्पा येताना माझ्यासाठी सहत्रावधी आठवणींचे मोदक घेउन येतो हेच मला खुप महत्वाचे वाटते.

Wednesday, August 16, 2006

आजी

आज एका मित्राशी बोलताना सहज आज्जीचा उल्ल्लेख आला आणि मला माझ्या दोन्ही आज्यांची अतोनात आठवण झाली. त्या दोघी पण अपापल्या परीने great होत्या. मी लहान असतना आज्याना नावाने हाका मारायची पद्धत नव्हती. त्यामुळे आम्ही आईच्या आईला कराडची आजी आणि पप्पंच्या आईला कोल्हापुरची आजी असे साधे सरळ ओळखायचो.

कोल्हापुरच्या आज्जीला नेहेमी स्वेटर विणत नाहीतर भरतकाम करताना पहिलेले. ती सतत स्वत:ला कशात तरी गुंतवुन ठेवायची. एक्दम भारदस्त व्यक्तिमत्व होते. आता मला तिचा आवाज नाही आठवत. पण तिच्याबरोबरचे प्रसंग मात्र इतके नीट आठवतात न. तिच्या साड्या. तिची देवाला जायची पिशवी. तिच्या गळ्यातली चेन, तिच्या कुड्या. तिचे बाबा घरी यायचे त्यांच्याबरोबरचे बोलणे. तिच्या वडीलांवर तिचे अतोनात प्रेम होते असे सगळे सांगतात. काकांबरोबरचा कानडी-मराठी संवाद. माझ्यावर आणि अजुवर नीट लक्ष ठेवणे. ती देवासमोर लिंगपुजा करायला खुर्चीत डोळे मिटुन बसलेली. मम्मी स्वयंपाक करत असेल तर तिला मदत करताना दिसते. काका लोक सुट्टीवर आले असले किंवा येणार असतील तर चकल्या करायची आणि कायम कट्ट्यावर बसुन सगळे करायची. इडलीचे पीठ रगड्यावर वाटतानाची आजी दिसते. मशिनवर काहीतरी शिवत बसलेली आजी दिसते. वायरच्या पिशव्या करतानाची आजी. मला हाताला धरुन वटेश्वराच्या देवळात नेतानाची आजी. मला एकबाजुला दार असलेलीच रिक्षा लागत म्हणुन कित्येक वेळ वाट पहात बसलेली आजी. एवढ्या तेवढ्या रस्त्यासाठी रिक्षा कशाला पहिजे म्हणुन चिडणा~या काकांकडे काणादोळा करणारी आजी. मी आणि अजुने नीट जेवावे म्हणुन घराभोवती चक्कर मारत जेवु घालणारी, आमच्या मागोमाग घराभोवती तिने किति चकरा टाकल्या असतील त्याला नेम नाही. माझ्या आणि काकांची भांडणे माझी बाजु घेउन सोडवीणे. मी दुध नीट आणि पटकन प्यावे म्हणुन वेगवेगळी अमीशे दाखवणारी आजी.
सुबोधचा जन्म झाला तेव्हा मी आज्जीबरोबर कोल्हापुरला होते. कराडला मम्मीला भेटायला आलॊ तेव्हा मम्मीला दवाखान्यात बघुन मी प्रचंड घाबरले होते. आजीने जवळ नेउन सुबोध दाखवला होता. ती कोल्हापुरला असेल तेव्हा मी तिच्याबरोबर कोल्हापुरला आणि ती पुण्याला असेल तेव्हा मी पुण्याला. तिच्या बरोबरचे मला आठवतात ते दिवस - मोरपंखासारखे मऊ गुदगुल्या करुन जातात. माझ्या त्या वयातल्या सगळ्या आठवणी तिच्या बरोबरच निगडित आहेत.
मधे कोल्हापुरच्या घरी गेलेले तेव्हा तिने केलेली पेंटींग्स पाहीली परत तिच्या आठवणीनी डोळ्यात गर्दी केली. तिने पेंट केलेली एक साडी अजुन मम्मीकडे आहे - मला आठवतेय त्याप्रमाणे मी नेसलेली पहिली साडी ती !!! तीची एक खुप जुनी डायरी त्यातल्या सगळ्या नोंदी इंग्लिश मधे आहेत !! तिच्या विणकामाच्या सुया, तिची स्वेटरच्या डीझाईनची इंग्लिश पुस्तके हा खजाना मला सापडला तेव्हा झालेला आनंद झालेला अजुनही जशाचा तसा आठवतो! आयुष्यात अनेक आघात पचवलेली पण स्वभावाने कडवट नसलेली अशी माझी आजी. ती गेली तेव्हा मी तिसरीमधे होते तिचे शेवटचे दर्शनपण मिळाले नाही मला ....

दुसरी आजी, कराडची आजी त्यामानाने खुप साधी घरगुती. छोटी अंगकाठी, एकदम कृश शरीर, काळजीने पडलेल्या सुरकुत्या. पण कधीही न खचलेली माझी आजी. तिच्या स्वयंपाकाला काय मस्त चव आसायची. पटापट काम करायची. कमरेत वाकलेली, सतत काहीतरी निवडत बसलेली, पुजेचे साहित्य तयार करतानाची आजी. तिने घासलेली देवाची पितळॆची भांडी इतकी लखलखायची की बास! ही आजी पुजेला पाटावर बसायची. तिच्या चेहेर्यावरचा तो सात्विक भाव अजुन आठवतो. कधीतरी आमच्याकडे रहायला यायची त्यावेळी मम्मीच्या आणि तिच्या गप्प रात्ररात्र चालायच्या. आजी गावातच असल्याने तिच्याकडे जाउन राहायचे प्रसंग खुप आले नाहीत. पण सगळ्यात जास्ती संबंध तिच्याबरोबरच आले. ती स्वयंपाक करताना पाहुन मला खुप शिकायला मिळले. तिला मी पावभाजी शिकवली, पुलाव शिकवला. प्रचंड हालाखिच्या परिस्थितीमधे पण अजिबात न मोडणारी आजी. आजोबा गेल्यानंतर खचलेली तरी मामांच्या पाठीमागे उभी असलेली आजी. माझ्या विणकामाचे भरतकामाचे कौतुक करणारी आजी. ते पाहुन माझ्या दुस~या आजीची आठवण हमखास काढणारी ही आजी. कुणाकडुन, अगदी पोटच्या मुलांकडुनपण कसलीही अपेक्षा न करणारी आजी. वयाच्या ७०व्या वर्षी पण अंबट ताक, अंबटचुक्याची भाजी आवडीने खाणारी आजी. देवळात जाउन भजनाला बसलेली आजी. देवावर प्रचंड विश्वास असणारी आजी. माझ्या पहील्या पगारात मी तिला घेतलेली साडी कौतुकाने नेसणारी आजी. तिने मला दिलेला गणपती माझ्या पुजेमधे आहे - पूजा करताना मला नेहेमी तिची आठवण येते. मम्मी आणि नंतर मी तिला दर सोमवारी भेटायला जात असु तेव्हा आमची वात बघत दुकानात एकटीच बसलेली आजी. मला आणि सुबोधला गुळाच्या कणकेच्या करंज्या आवडतात म्हणून आवर्जुन करणारी आजी. तिचे घरी केलेले बुंदीचे लाडू, घरी केलेल्या जिलेब्या -- आहाहा.
ती गेली तेव्हा मी भारतात नव्हते. मला मम्मीकडुन कळाले तेव्हा एकदम जाणवले - सगळे आजीआजोबा गेले. हक्कने हट्ट पुरवुन घेणारी ठिकाणे आता राहिली नाहीत.त्यानंतरच्या सगळ्या भारतभेटीमधे मामांकडे गेले की पहील्यांदा जाणवते ते हे की, आता आजी दुकानात कधीही दिसणार नाहिये! इथल्या पहिल्या पगारात मी तिला साडी नाही घेउ शकले याची पण खंत वाटते!

Tuesday, August 01, 2006

पाउस - एक love hate relationship

सध्या कराड मधे पावसाने नुसते थैमान घातलेय त्याचे फोटो पाहुन आणि मम्मी कडुन कहाण्या ऐकुन मला कराडमधे घालवलेले असंख्य पावसाळे आठवले.

प्राथमीक शाळेत असताना पाउस फार अवडायचा शाळा घरापसुन लांब होती आणि एखादे दिवशी रेनकोट विसरले तर मनसोक्त भिजायला मिळायचे. मम्मीचा ओरडा मिळायचा पण त्याचे फारसे काही वाटत नव्हते. पावसाच्या साचलेल्या पाण्यात मनसोक्त उड्या मारत भिजत यायचे. ते पावसाळ्याचे बूट नामक जो प्रकार मिळायचा त्याने माझ्या पायाची सालटी निघालेली असायची. त्यात माती जाउन झणझणायचे. पावसात सारखे खेळल्याने सर्दी खोकला असायचाच. बुचाची फुले वेचायची त्याचे गजरे करायचे. श्रावण तशातच यायचा. आमच्या त्या शाळेत नागोबाचे देऊळ होते. इतर दिवशी आम्ही त्या कट्ट्यावर खेळायचो. पण नागपंचमी दिवशी शाळेला सुट्टी असल्याने मग सकाळी शाळेत पाटीपूजनाला जाउन यायचे. नारळ खोबरे चघळत रिमझिम पावसात भिजत घरी. संध्याकाळी परत नागोबाला जायचे. पावसाचा आणि नागपंचमीचा इतका अतूट संबंध होता की बास. पावसाळ्यात शाळा सुरु ह्वायची त्यामुळे ती पुस्तके न भिजता घरी यावित म्हणुन मग प्लास्टीकच्या पिशव्या असायच्या. पाटीसाठी अजून एक पिशवी - उतारा भिजुन पुसु नये.
त्याकाळात पाउस म्हणजे मजा वाटायची - पाउस आला की आनंद व्हायचा.

पाचवीमधे गेले तेव्हा हट्टाने छत्री मागुन घेतली. मग सायकल आल्यावर त्या छत्रीचे नखरे परवडेनासे झाले. ६वी ७वी मधे पाउस रोमांचक असतो वगैरे जाणवु लागलेले. मैत्रीणींबरोबर एका हातात सायकल आणि एका हातात छत्री घेउन खिदळत घरी यायचे. कॊलेजची पोरे मुद्दाम पाणी उडवुन जायची. पाटीपुजन वगैरे बंद झालेले. पावसाचे पाणी बघत बसायची खोड लागली.

७वीच्या वर्षात पावसाने हाहाकार माजवलेला... एका नवीन घरात भाड्याने रहात होतो. तिथे बाहेर पाऊस पडायचा तितकेच घरात गळायचे. मम्मीने वर्षाचे धान्य भरुन ठेवले होते ते सर्व भिजुन गेले. स्वत:च्या घरात जाणर म्हणुन आनंद मानायचा की घरातले अन्न धान्य नासधुस होताना पाहुन अश्रू गाळायचे या चिंतेत मम्मी पप्पा असायचे. सुबोध एकदा शाळेतुन घरी आला आणि मम्मी त्याला जेवायला वाढत होती तेवढ्यात इतका जोराचा पाउस आला की त्याला जेवायला सुद्धा मिळाले नाही. त्याक्षणाला मम्मीला काय वाटले असेल ते एक तीच जाणे! ... त्यावर्षी पावसाने डोळ्यातून पण पाऊस आणला ... एका महीन्यात प्रचंड नुकसान करुन गेला हा पाऊस. त्यावर्षी मात्र तो नकोसाच वाटला ...

तिथुन स्वत:च्या घरात आलो. आपले घर म्हणुन एक वेगळाच आनंद होता. आजुबाजुला सगळी शेतिच होती. शाळेला बसने जावे लागणार होते कारण तोपर्यंत मामासाहेबानी सायकल हरवलेली होती. शेतात राहयला आल्यामुळे आजुबाजुचे शेतकरी पावसाची आतुरतेने वाट पहाताना पाहुन वेगळेच वाटायचे. गरम काळ्या मातीत पडलेला वळीवाचा पाऊस त्याचा तो खमंग वास अहाहा... शाळा सुरु होईपर्यंत मग असाच वळिव खिडकितुन बघत श्रीमानयोगी, मृत्युंजय, व्यक्ती आणि वल्ली अशी एकामागोमाग एक पुस्तके वाचुन काढत वळीव काढला. शाळा सुरु व्हायचे दिवस आल्यावर मग शाळेच्या खरेदीबरोबर नविन पावसाळी चप्पल, नवीन छत्रीची खरेदी झालेली.
आणि शेतात घर असण्याचे तोटे पहिल्या शाळा सुरु झाल्याच्या पहिल्या १५ दिवसातच समजले. घरापर्यंत जाण्यासाठी शेताच्या पाणदी मधुन रस्ता - गुडघा गुडघा चिखल असे करत बस गाठेपर्यंत कसरत व्हायची. मधे कॊलेज लागयचे तिथे चिखलाने बरबटलेले पाय धुवुन बस गाठायला पळायचे.
पावसाचा पूर्ण चार्म तिथेच संपला...

आज इथे बे एरीया मधे रहाताना पावसाळा म्हणले की आठवते ती तुफ़ान थंडी. नशीब एवढेच की बर्फ़ उकरावा लागत नाही. ऒफीसच्या खिडकितुन पाउस बघत माझी सहकारी अतिशय भावुक होते. मनात पावसात मनसोक्त भिजण्याची स्वप्ने पहाते. तिला पाहुन वाटते, आपल्याला हे सर्व Romantic का नाही वाटत? मग थोडावेळ विचार केल्यावर जाणवते अत्ता घरी असते तर मस्त पैकी हीटर लावुन पायावर शाल घेउन पुस्तक वाचत पडायला काय बहार येईल. एखाद्या वीकेन्ड ला ते स्वप्न सत्यात पण येते. माझ्या मनाने मी पावसाचा आनंद घेते.

असा एखादा दिवस मी अगदी मनापासुन मी पाउस enjoy करते पण बरेचदा त्याला पाहुन मनावर मळभ दाटुन येते, लहानपणीचे पावसाने वाया घालवलेले दिवस आठवतात ... वाईट वाटते पण मी त्याला माफ़ करुन पुढे चालु लागते ....

Friday, July 21, 2006

सोन्या

आज अचानक तुझी आठवण झाली. एका मित्राने विचारले तुझ्यकडे कुत्रा आहे का? पटकन उत्तर आले हमम हो! आणि एकदम आठवले तुला जाउन आता ९ वर्षे होतील. तु गेलास तेव्हा तुझ्या नजरेतले प्रेम कळले. घरातले तुझे सगळ्यात आवडते माणुस म्हणजे मम्मी. मी तशी नावडत्या माणसातच जमा तुझ्या दृष्टीने.

मला अजुन आठवते तुला अंजु पिशवीत घालुन घेउन आलेली. तुझा रंग काळा म्हणुन तू सुबोधला तर अजिबात आवडला नव्हतास. दिसायला आधीच्या राजा इतका काही तू देखणा नव्हतास पण चुणचुणीत मात्र नक्किच होतास. काही दिवसातच तुला समजले घरातले कोण प्रेम करते, कोण खाउ देते. मग मम्मी बाहेर गेली मंडईला कि तुझे रडणे चालू! नंतर नंतर तर मम्मी आंघोळीला गेली तरी तसेच. एकेदिवशी पप्पांचा राग अनावर जो झाला कि त्यांनी तुला काठीने मारले. मी सुबोध नको म्हणत असताना. मम्मी अंघोळिहुन आल्यावर तुझ्याकडे आली आणि म्हणाली, 'काय झाले माझ्या सोन्याला?' तुझ्या डोळ्यात चक्क पाणी होते रे. पण ह्या अनुभवातुन तु काही शिकलास का? तर नाही !!! तुझे रडणे तसेच चालु राहीले. सोन्या रडतोय म्हणजे मम्मी बाहेर गेली आहे ते सगळ्या सोसायटीला कळायचे! एकदा असेच मम्मी झोपली असताना तु अचानक रडू लागलास, तेव्हा आपल्या घरी यायला लागलेल्या एक काकु परत गेल्या का तर सोन्या रडतोय म्हणजे मम्मी घरात नाही!

मम्मीला आज्जीने एक तोंडलीचा वेल दिलेला लावयला. तो तिने लावला जिन्याशेजारी - पर्ययाने तुझ्या घराशेजारी. तो वाढुन त्याला तोंडली लागल्यावर ती तू कधी मटकावयला चालु केलीस ते आम्हाला कधी कळलेच नाही. तु असेपर्यंत त्या एकढ्या मोठ्या वेलाची तोंडली कधी म्हणुन आम्हला खायला मिळाली नाहीत. आणि तु गेल्यावर इतक्या टोपलीभर तोंडल्यांचे आता काय करायचे म्हाणुन तो वेलच मम्मीने आता काढुन टाकला. चपाती दिली कि नाखुष असणारा तू, शिरा केलेल्याचा वास आला की किती वर खाली उड्या मारायचास. घरात केलेला प्रत्येक गोड पदार्थ तुला मिळालेला आहे. दुध, चहा हे तुझे आवडीचे पदार्थ. मिटक्या मारत खालेल्ले श्रीखंड, करंजी, चिरोटे, बर्फ़्या आणी बरेच काही!
सोसायटीतला मोत्या आला की तुझा झालेला राग राग आठवला की हसु येते. तु १२ वर्षे होतास त्या १२ वर्षात सोसायटीमधे कुणाकडे कधीही चोरी झाली नाही. तुझा दबदबाच तेवढा होता.
पप्पांबरोबर फ़िरायला जाणे, मम्मीकडुन लाड करुन खाऊ खाणे, सुबोधकडुन लाड करुन घेणे आणि माझा राग राग करणे हा तुझा नेहमीचा दिवस. आयुष्यात तू फक्त एकदाच माणसाला चावलास आणि तो मनुष्यप्राणी म्हणजे मी! मी अंगण झाडण्यासाठी केरसुणी काढत होते तेव्हा बहुतेक मी तुला मारणारच आहे असे वाटले बहुदा, जे माझ्या हातातुन रक्त काढलेस की बास. आज मी जेव्हा त्या जखमेचा व्रण बघते, मला तु जिन्यावर वरखालीपळायचास तेच आठवते.
तू गेलास तेव्हा तुझ्या जीवाभावाची चारही माणसे तुझ्याशेजारी होती. त्यांच्याकडे प्रेमाने पहात तू प्राण सोडलास. तू गेलास आणि घरातल्या भाकर्यांची संख्या कमी झाली. पण कित्येक दिवस लक्षातच नाही यायचे तू आता नाहीस. तू घरीयेण्याआधी २ कुत्री सांभाळुन झालेली, पण तू गेलास आणि परत कुणाला घरी आणावेसे वाटलेच नाही. तुझी कमी भरुन काढणारे कुणी भेटेल असे वाटलेच नाही.

शोनु, तू आम्हाला काय दिलेस, खुप प्रेम, खुप सुरक्षीतता! आणि आमची आयुष्ये सम्रुद्ध करुन गेलास !!

ह्या आगळ्या मित्राच्या खुप आठवणी आज त्या मित्रामुळे जाग्या झाल्या, तुम्हा दोघानाही धन्यवाद!!

Saturday, July 01, 2006

माझे आवडते मित्र -

रजनीगंधा, आभार, मला पुस्तकाबद्दल लिहायची संधी दिल्याबद्दल.

घरामधे लहानपणापसुन पाहिलेली रेलचेल, पप्पानी दर महिन्याच्या पगारात घेतलेली पुस्तके! ह्या सगळ्याचा परीणाम म्हणा किंवा जन्मजात आवड म्हणा - पुस्तके हा एक माझा weakpoint. त्यातुनच झालेला हा एक प्रकार माझी पुस्तकांची आवड. पप्पा लायब्ररीअन होते आणि घरी पण प्रचंड पुस्तके विकत घ्यायचे. तीच आवड माझ्यात पण उतरली. आज माझे पुस्तकाचे मोठे कपाट वेगवेगळ्या प्रकारच्या पुस्तकाने भरलेले आहे. आजून बरीच पुस्तके विकत घ्यायची आहेत. बाहेर पाउस पडत आहे आणि हातात एक पुस्तक घेउन पायावर शाल टाकुन मी झोपुन पुस्तक वाचतेय - ही माझ्या आनंदाची परिसीमा आहे.

१)नुकतच वाचलेले / वा विकत घेतलेले पुस्तक:
भारतातुन येताना नेहेमी ४-५ तरी पुस्तके घेउन येतेच ह्यावर्षी आणलेल्यातले एक सुन्दर पुतक म्हणजे मिलींद बोकील यांचे शाळा.

२) वाचले असल्यास त्यावर थोडक्यात माहिती:
नववी इयत्तेतल्या मुलाचे विश्व.
शाळेतले मित्र, त्यांची एक विशिष्ट भाषा. मुलींबद्दल आकर्षण. शाळेतल्या इतर गोष्टी. शिक्षक आणि शिक्षीका ना टोपणनावाने हाक मारणे वगैरे एकदम आपल्या शाळेतल्या आठवणी जाग्या करतात.

एक परत वाचलेले पुस्तक म्हणजे - माधवी देसाई यांचे नाच ग घुमा.
माधवी देसाईंची झालेली फरफट वाचताना कधी कधी असह्य होते. एका नामवंत माणसाची मुलगी, साध्या माणसाची पत्नी, एक विधवा, एका नामवंत माणसाची पत्नी, एक घटस्फोटीता त्यावर एक आई. पण त्यानी कुठेही कटुता आणलेली नाही. पहिल्यांदा वाचले तेव्हा काही आशय समजला नव्हता तो आता समजला.
अजुन वाचलेली पुस्तके म्हणजे - नातीचरामी, माणसांच्या गोष्टी, स्वत:विषयी, आप्त, शारदासंगीत,

३) अतिशय आवडणारी / प्रभाव पाडणारी पाच पुस्तके:
हे लिहिणे फारच अवघड आहे. हा blog मराठी म्हणुन मग फक्त मराठी पुस्तकांची नावे देतेय. खाली दिलेली पुस्तकांची नावे देताना हे लिहू की ते लिहू असे झालेले. मला स्वत:ला चरित्र, आत्मचरित्र हे प्रकार वाचायला फ़ार आवडतात. तरी खाली वेगवेगळ्या गटातील पुस्तके द्यायचा प्रयत्न करते.

१. आहे मनोहर तरी - सुनीता देशपांडे
२. शारदासंगीत - प्रकाश संत
३. व्यक्ती आणि वल्ली - पु. ल. देशपांडे
४. स्थलांतर - सानिया
५. बापलेकी - पद्मजा फाटक, दीपा गोवारीकर

नेहेमी वाचनात असणारी पुस्तके म्हणजे - गौरी देशपांडेंची विंचुर्णीचे धडे, मुक्काम, सगळीच म्हणायला हरकत नाही. अनिल अवचटांचे स्वत:विषयी तर एकदम साधेसुधे - त्यांच्यासारखेच कुठेही मुखवटा नसलेले. प्रकाश संत यांची चारही पुस्तके.

४) अजुन वाचायची आहेत अशी पाच पुस्तके:
१. आम्ही आणि आमचा बाप
२. संभाजी
३. माझा साक्षात्कारी हृदयरोग
४. मृद्गंध
५. नेताजी
ही पण यादी न संपणारी आहे. ह्यातली बरीचशी पुस्तके येताना आणलेली आहेत पण वाचन करणे बाकी आहे.

५) एका प्रिय पुस्तकाविशयी थोडेसे:
मला सुनीताबाईंचे आहे मनोहर तरी फार आवडणारे पुस्तक. पुलंच्या व्यक्तीमत्वाखली त्या दडून गेल्या नाहीत. पैसे टाकून करता येण्याजोगी कामे स्वत: केली, ४२ च्या चळवळीत कामे केली पण त्यात वाहुन नाही गेल्या. एखाद्या गोष्टीत तन-मन-धन अर्पून अलिप्त रहाणे अतिशय अवघड - ते त्यांना जमले.

मी ज्यांचे blogs नेहेमी वाचते अश्यानी आधीच लिहुन झालेय तरी पण दोघाना Tag करतेच -
यतीन
अतुल

Thursday, May 11, 2006

जेव्हा तिची नी माझी रानात भेट झाली ...

१० वी ची पूर्व परीक्षा चालु होती. दुसरा दिवस - इंग्लिश आणि जीवशास्त्र असे २ पेपर होते. मी आणि अंजु नेहेमीप्रमाणे अगदी १२ वाजायला शाळा भरायची तर ११.४५ ला घरातुन निघालेलो. पेपरची धाकधुक होतीच. त्यातुन पाणंदीतुन जाणारा म्हशींचा कळप दिसला. मी थांबले आणि अंजुला म्हणाले आता आपल्याला पोचायला नक्कीच उशीर होणार. ती म्हणाली काही नाही होत उशीर. आणि तिने स्वत:ची सायकल तशीच त्या म्हशींच्यामधुन दामटवली. आणि ती त्या कळपाच्या दुसर्या टोकाला जावुन माझी वाट पहात उभी राहीली. मी घाबरत घाबरत माझी सायकल म्हशींच्या घोळक्यात घातली आणि दोन म्हशींचे जे काय भांडण लागले म्हणता!! नळावर कशा बायका एकमेकींच्या अंगावर धावुन जातात अगदी तस्सेच एक म्हैस दुसरीच्या अंगावर गेली की धावुन. तिला बापडीला काय पडलेले की मनुष्य नामक एका प्राण्याचे एक छोटे पिल्लु सायकल नामक वहानावर बसुन तिथुन जातय. तिने जी ढुशी मारली म्हणता!! मला हलकासा (??)धक्का देउन तिने तिच्या मैत्रिणीवर हल्ला केला. दुसरी बाई थोडीच गप्प बसणार आहे? तिने लगेच उलट धक्का मारला. ह्या सगळ्या हलक्या धक्क्यांचा परीणाम म्हणून मी एकदम पाणंदीच्या कडेला झाडात जाउन पडलेले. त्या नादात माझा चष्मा सुरक्षीत ठेवु शकले. तोपर्यंत म्हशीवाले काका आले ते सोडवायला. अंजु आली माझी सायकल दोघानी मिळुन उचलली. अंगाला असह्य वेदना होत होत्या. शाळेचा ड्रेस चिखलाने भरलेला. सायकलचे चाक वाकडे झालेले. घर ३ मिनिटावर होते पण ह्या प्रकारात आधीच ७ मिनिटे वाया गेलेली. परीक्षेची जाणीव झाली आणि मग तसाच आमचा मोर्चा शाळेकडे वळवला. १० मिनिटे उशिर झाला, नुकतीच प्रार्थना संपलेली पण पेपर सुरु नव्हता झालेला. मुख्याध्यापकाना सगळे सांगितले आणि पेपर ला गेले. दुपारच्या सुट्टीत उजळणी करण्याऐवजी माझ्यावर उद्भवलेल्या प्रसंगाची उजळणी, शहानीशा आणि उहापोह वगैरे झाला. टिंगल टवाळी न करतील त्या कन्याशाळेतल्या १०वी अ च्या विद्यार्थीनी कसल्या ....

अशी झालेली ती अविस्मरणीय भेट आज तुमच्या भेटिला आणलीय.

Wednesday, May 10, 2006

भाकरीचा चंद्र

मी ५ वी किंवा ६ वी मधे असतानाची गोष्ट. मम्मी पुण्याला काकुकडे गेलेली १ महिना कारण तिला बरे नव्हते. आमच्यासाठी डबा गावात रहाणारी मामी पाठवेल असे ठरलेले. पण मामीला काही ना काही कारणाने डबा पाठवायला नेहेमी उशीर. मग पप्पांचे भातचे प्रयोग चालायचे. नाहीतर मग शेजारी रहाणारी मम्मीची मैत्रीण काहितरी पाठवुन द्यायची.
मम्मी परत आल्यावर तिला हे समजल्यावर मग काय तिने मला स्वयंपाक शिकवायचे जे काय मनात घेतले कि बासच. भाजीसाठी कांदा चिरुन देणे, भाजी निवडुन/चिरुन देणे ह्या गोष्टी आठवड्यातुन २-३ वेळा तरी कराव्याच लागायच्या. मग ते नीट जमायला लागले, आणि मग भाज्या फोडणी पण द्यायला यायला लागल्या. तोपर्यन्त आली उन्हाळ्याची सुट्टी.

मग मातोश्रीनी आम्हाला भाकरी शिकवायचे मनावर घेतले. आधी स्वत: भाकरी करत असताना त्यातला शेवटचा गोळा मला ठेवुन त्याच्यावर प्रयोग. मातोश्री एक्दम कडक शिस्तिच्या आणि घरात भाकरी अगदी पातळ पातळ करायची सवय असल्याने प्रचंड शाब्दिक मारामारी व्हायची. मग गंगा, यमुना सरस्वती यांचा संगम अस्मादिकांच्या चेहेर्यावर व्हायचा. असे करत करत १०-१२ दिवसानी एकदा कधीतरी भाकरी बरी थापली गेली - आकार होता कसा बसा ४-५ इंच व्यासाइतका. एकदम आनंदाचे उधाण वगैरे जे काही असेल ते आले. मग मातोश्रींच्या कडक शिस्तीखाली तो रोट (हो रोटच होता तो) भाजायचा प्रयोग झाला. हे करता करता काही दिवसात बर्यापैकी पातळ आणि कशाबशा फ़ुगणार्या भाकऱ्या तयार व्हायला लागल्या.
तष्यात कधितरी मग मम्मीला बाहेर कुठेतरी अचानक जावे लागले आणि मग अस्मादिकान्ची नेमणुक झाली भाकरी करण्याच्या कमगिरीवर. मग बाहेर जाताना मम्मीने मग १७६० सुचना दिल्या आणि ती गेली बाहेर. मग काय भावाबरोबर मस्ती झाली, भांडण झाले बराच काय काय उद्योग करुन झाला आणि मग लक्शात आले की भाकर्या राहिल्याच की करायच्या !! मग काय पटापट तयारी केली आणि बसले भाकर्या करायला. पहीली भाकरी थापुन तव्यावर टाकली पाणी लावले आणि दुसरी करायला घेतली. ती करुन तव्याकडे बघते तर तव्यातल्या भाकरीला असंख्य भेगा पडलेल्या. तरी दामटुन ती उलटली आणि थोडावेळ भाजुन मग तवा काढुन आचेवर भाकरी टाकली आणि आता फ़ुगेल मग फ़ुगेल असे वाटले. थोड्यावेळात त्याअतुन धुर यायला लागला. मग तई कोळसा झालेली, भेगा पडलेली भाकरी काढुन बाजुला ठेवली आणि परातीतली भाकरी तव्यात टाकली. मग ठरवले की ही भाकरी पूर्ण झाल्याशिवाय पुढची करायचीच नाही. मग ती भाकरी उलटताना मधेच तुटली - ती कशीबशी सांधवली. त्या भाकरीचे पण फुगायचे काही लक्शण दिसेना मग ती पण ठेवली टोपलीत काढुन. मग पुढची थापायला घेतली तर थापयलच जमेना. मग मोडुन परत करुन तिला तव्यावर टाकली तर तोपर्यन्त तवा इतका तापलेला की तिला अचानक फ़ुगे फ़ुगे आले. कशीबशी शेवटच्या टप्यापर्यंत नेली तिला पण तिनेही फ़ुगायचे नाकारले. मग परत गंगा यमुना सरस्वती आल्या धावुन संगमासाठी. पण कसचे काय त्या मदत थोड्याच करणार होत्या मला. फ़क्त साथ देणार होत्या. तेवढ्यात डोक्यात आयडीयेची कल्पना आली - सगळ्या भाकर्या उचलल्या आणि घरामागे असलेल्या उसाच्या शेतात टाकुन पटकन पुढची भाकरी करायला घेतली. ती जरा बरी झाली. तोपर्यंत लैलाच्या आई, ज्या अमच्याकडे भांडी धुणी करायच्या त्या आल्या. मग त्यांच्या देखरेखीखाली उरलेल्या भाकर्या बर्यापैकी झाल्या. त्यादिवशी ८-९ भाकरी करायला मला जवळपास २ तास लागले आणि त्यातल्या ३ तर शेताला दान गेल्या.
त्या आठवड्यात मम्मीला परत कामासाठी कुठेतरी जावे लागले त्यावेळी पण वरची जवळपास सगळ्या क़ृतीची उजळणी झाली. शेताला २ भाकर्या अर्पण करण्यात आल्या. असे करत करत शेतला एकुण ८-९ भाकर्यादन गेल्या त्या आठवड्यात!
हे सांगणे न लगे की मम्मीला त्या आठवड्यात २ दिवस लवकरच दळण करवे लागले...

Sunday, March 26, 2006

माणसामाणसातला फरक

ही आठवण देखील मी कोल्हापुरला असतानाची ...
M. Sc. ला शिवाजी विद्यापिठात होते. तिथल्या मराठी विषयाच्या कुलकर्णी नावाच्या एका प्राध्यापकाना ज्ञानेश्वरीची सर्वात जुनी प्रत मिळालेली. त्याचे त्यांनी संपादन केले होते. त्या ज्ञानेश्वरीचा प्रकाशन समारंभ होता. त्या कार्यक्रमाला श्री. बाबामहाराज सातारकर आणि न्यायमुर्ती यशवंतराव चंद्रचुड हे आलेले. बाबामहाराजांचे ज्ञानेश्वरीतील एका ओवीवर किर्तन झाले. त्यानंतर न्यायमुर्तीनी पण ज्ञानेश्वरीवर थोडक्यात निरुपण केले. त्यादिवशी प्रथम मला कळले की त्यांचा पण ज्ञानेश्वरीचा किती अभ्यास आहे.

कार्यक्रम संपला आणि व्यासपिठावरुन सांगितले गेले की न्यायमुर्ती आणि बाबामहाराज आता लोकाना स्वाक्षरी देतील. त्यावेळी सुवर्ण ज्ञानेश्वरी वगैरे चाललेले. मला त्यावेळी जरा स्वाक्षर्या गोळा करायची सवय होती. माझा नंवर आल्यावर मी त्या खोलीत गेले. मी पहिल्यांदा बाबामहाराजांच्यासओर उभी राहीले. ते म्हणाले, 'माझी स्वाक्षरी हवी असेल तर माळ घालावी लागेल आणि सुवर्ण ज्ञानेश्वरीसाठी देणगी द्यावी लागेल.' मी त्यांना म्हणाले, 'मी मांसाहार आणि मद्यपान करत नाही तर मी माळ घातली आणि नाही घातली तरी काय फरक पडतो.' ते म्हणाले, 'माझा नियम आहे स्वाक्षरी हवी असेल तर हे करावेच लागेल!' मी तिथुन निघाले. न्यायमुर्ती मला म्हणाले, 'बाळ! इकडे ये.' मी त्यांच्याकडे गेले. ते म्हणाले, 'माझी चालेल का स्वाक्षरी चालेल का?' मला एकदम आनंद झाला आणि मी त्यांच्यापुढे माझी वही पुढे केली. त्यांनी मला माझे नाव विचारले, मी सांगितले. माझे नाव थोडे वेगळे असल्याने त्यांनी अर्थ विचारला, मी सांगितला. त्यांनी वहीवर माझे नाव लिहीले आणि खाली लिहिले 'मोठी हो.'

त्यांना नमस्कार करुन मी तिथुन निघाले. मला दोन माणसांनी दिलेल्या वागणुकीवरुन माणसामाणसातला फरक कळला.

Friday, March 24, 2006

अरुंधती -- एक मैत्रीण

मी २ री किंवा ३ री मधे असतानाची गोष्ट. शाळेमधे माझी आवडती मैत्रीण हा निबंध लिहुन आणायला सांगितला होता. त्यावेळी आवडती मैत्रीण म्हणजे शेजारी बसणारी मुलगी हे समिकरण होते. म्हणुन मग मी माझ्या वैशाली नावाच्या मैत्रीणीवर निबंध लिहायला सुरुवात केली. पण तिचे केस मोठे आहेत, ती मला खुप आवडते आणि अशीच २ - ३ वाक्ये लिहीली आणि मी मम्मीकडे गेले - मला आता पुढे काहीतरी सांग म्हणत. ती म्हणाली, मला तुझी वैशाली कोण ते कुठे माहीती आहे. मग थोदी चिडचिड झाली आणि मी रुसुन दुसरा अभ्यास सुरु केला. सकाळी शाळेत जाण्याअगोदर परत आठवण झाली कि निबंध लिहायचा आहे. परत मम्मीच्या मागे लकडा. मग मम्मी म्हणाली, मी सांगते ते लिहिणार असशील न रडता तर सांगते. तिने सांगायला सुरुवात केली - माझ्या आवडत्या मैत्रीणीचे नाव अरुंधती पुढे असेच काही काही. शाळेतल्या निबंधाचे काम झाले म्हणुन मी खुष होण्याचे सोडुन हे केवढे मोठे नाव, मला ह्या नावाची मुलगी पण माहीती नाही हेच विचार डोक्यात. पण का कुणास ठावुक ते नाव मात्र माझ्या डोक्यात बसले.

पुढे मी अमेरीकेमधे M. S. करताना मला एक मैत्रीण मिळाली - अरुंधती !! पण तोपर्यंत हा प्रसंग माझ्या पूर्ण विस्मरणात गेला होता. आता ती आणि मी खुप चांगल्या मैत्रीणी आहोत. परवा घरुन office ला येता येता मला वरचा प्रसंग आठवला. काही काही प्रसंग भविष्याची नांदी असतात का?