Sunday, October 02, 2011

आठवणींचे नवरात्र
आम्ही लहान असताना नवरात्र म्हणजे दांडिया हे समीकरण नव्हते. नवरात्र म्हणजे भोंडला, खिरापत, शारदोत्सव हेच आम्हाला माहिती होते. थंडी नुकतीच सुरु झालेली असायची त्यामुळे दिवस लहान झाल्यामुळे संध्याकाळी ६.३० लाच अंधार वाटायचा. शाळा सुटली की धावत पळत घरी यायचे कारण सगळ्यांच्या घरचे भोंडले असायचे. संपूर्ण कॉलनीमधे साधारण २०-२५ घरांमधे तरी जायचे असायचे त्यामुळे घरी आल्या आल्या दप्तरे टाकायची आणि भोंडल्याला पळायचे. सगळ्या मुली छान छान ड्रेस घालून येत. कुणाकडे पहिला भोंडला हे पण ठरलेले असायचे. आदल्या दिवशी पाटाच्या मागच्या बाजुला हत्तीचे चित्र काढून ठेवलेले असायचे. माझ्या मम्मीने काढलेला हत्ती फार मस्त असायचा त्यामुळे आमच्या आजुबाजुच्या काही घरांमधल्या पाटांवर मम्मीने काढलेलाच हत्ती असायचा. असे हत्ती काढलेले पाट अंगणात मधे मांडायचे. फुलं-पत्री वगैरे वाहून भोंडल्याला सुरुवात व्हायची. एकमेकींच्या हातात हात घालून पाटाभोवती फेर धरायच्या. संथ सुरात एका लयीत गाणी सुरु व्हायची -


ऐलमा पैलमा गणेशदेवा
माझा खेळ मांडून दे करी न तुझी सेवा ...


पहिल्या दिवशी एकच गाणे म्हणायचे ही आम्हाला शिक्षा वाटायची ... शुरु होतेही खतम हो गया? असे काहीसे. मग खिरापत ओळखण्याचा मज्जेचा कार्यक्रम! त्याची सुरुवात नेहेमी श्रीबालाजीचि सासू अशी होई.


श्री - श्रीखंड
बा - बासुंदी
ला - लाडू
जी - जीलेबी
चि - चिवडा
सा - साखर
सु - सुधारस


आता भोंडल्यासाठी सुधारस कोण कशाला करेल असली अक्कल कुणाला नव्हतीच मुळी! बरेचदा ५-६ प्रयत्नांमधे जे काही केलेले असेल ते ओळखले जाई. तर कधीतरी पोहे, उप्पिट वगैरे पासून सुरु झालेली गाडी पुर्‍या, केककडे पण वळायची. अजून बरीच घरं फिरायची असल्याने आम्ही हारलो अशी सपशेल कबूली देऊन आम्ही मिळालेला प्रसाद खात खात पुढल्या घरी रवाना होत असू. पाठीमागे सगळे आवरून ठेवायचे काम घरचेच कोणीतरी करत असे. सगळ्या घरचा भोंडला करून घरी येईतोवर शाळेचा अभ्यास वगैरे काही आठवतही नसे. काही वर्षी दुसरी घटक चाचणी त्याच दरम्यान असे, पण नेहेमी सहामाही परीक्षा तोंडावर आल्याने घरी येऊन पटापटा हातपाय धुवुन अभ्यासाला बसायची घाई असायची. खिरापती खाऊन पोटं भरलेली असत. अभ्यास खुप असेल तर मग घरचा ओरडा थोडाफार खावा लागत असेच.

शविवार-रविवारचे भोंडले खुपच रंगत असत. लवकर सुरुवात केली जाई.  सगळी गाणी सुरात काहीवेळेस तारस्वरात देखील म्हणली जात. भोंडला संपल्यावर मग आम्ही एखाद्या मैत्रिणीच्या दारात घोळका करून बसायचो. नविन वेगळी गाणी कोणाला माहिती आहेत का? याची थोडी चाचपणी होई. प्रत्येकीला आपल्या घरचा भोंडला सर्वात सुंदर व्हावा असे वाटे. प्रत्येकीलाच आपली खिरापत कुण्णाकुण्णाला ओळखू येऊ नये असे वाटे. आठव्या नवव्या दिवशी सगळ्या घरांमधे येवढी गाणी म्हणून यायला उशीर होणारच हे माहिती असेल तर आम्ही काहीजणी ४-५ भोंडले झाले की परत जायचो. मग दुसरे दिवशी खिरापतीत काय काय होते यावर शेवटपर्यंत थांबलेल्या आणि न थांबलेल्या मुली यांच्यात एक मोठा परीसंवाद घडे. त्यातले फलित 'तुम्ही नव्हतात तिथे किती मस्त खिरापत होती आणि कित्तीतरी दिली' येवढाच असे! अशावेळी घरच्यांचा राग यायचा पण त्यांच्या मनाविरुद्ध काही करायची टाप नव्हती.


हे १० दिवस म्हणजे शारदीय नवरात्राचे. आमची मुलींची शाळा असल्याने हे नवरात्र आमच्या शाळेत दरवर्षी साजरे होई. आधी आठ दिवस वर्गात कृष्णा, नाना वगैरे शिपाई सूचना वही घेऊन येई. मग कोणत्या दिवशी शारदोत्सव असणार, कोणकोणते कार्यक्रम होणार याची रुपरेषा वर्गातल्या बाई सांगत. शाळेला सुट्टी असली तरी समुहगीत, भाषण, निबंध, हस्ताक्षर इत्यादी स्पर्धा असत. तसेच एखादे दिवशी लिंबू-चमचा, तीन पायांची शर्यत, पोत्यात पाय घालून पळणे, स्लो सायकलींग अशा पण स्पर्धा असत. एके वर्षीतर पुष्परचना स्पर्धा अर्थात फ्लॉवर अ‍ॅरेंजमेंट स्पर्धा पण ठेवल्या होत्या! तिथे मुलींनी ओळखीच्या कुणाकडूनतरी रचना करून आणून नंबर मिळवलेले लक्षात आल्याने ही स्पर्धा बंद केली. शाळेतला हा उत्सव ३ दिवसांचाच असे. आमच्या शाळेत पहिल्या मजल्यावर फक्त ४ वर्ग, शिवणहॉल आणि ऑफिसेस येवढेच होते. त्यामुळे ५वी ब च्या वर्गातले बाक दुसरीकडे हलवून तिथे शारदेची मोठी मुर्ती बसवली जाई. पांढर्‍या रंगाची साडी नेसलेली शारदा, गळ्यात फुलांचा हार, कडेला तेवत असलेल्या समया, अगदी मोजकीच पण एकदम साधीशी आरास असे. आमच्या चित्रकलेच्या बाई आणि सर मिळून समोर सुंदर रांगोळी काढत. त्या वर्गात जायला मुलींना परवानगी नसे. बहेरूनच दर्शन घ्यायचे असा नियम होता. तीनही दिवसाचे वेळापत्रक आधी कळलेले असे. सुट्टी असली तरी शाळेत हजेरी घेतली जाई. त्यामुळ शाळा बुडवलेली चालायची नाही. इतरवेळी शाळेत जायला कुरकुरणार्‍या आम्ही शारदोत्सवात मात्र हसत हसत जायचो. अगदी आजारपणदेखील या ३-४ दिवसांमधे येऊ नये असंच वाटायचं. साधारण सकाळी ८ ते १२ कार्यक्रम झाले की दिवसभर सुट्टीच! मोठ्या वर्गांमधे मात्र शिक्षक-शिक्षिका भरभरून अभ्यास देत तेव्हा मात्र राग यायचा. 
तिसर्‍या दिवशी शारदोत्सवाच्या हळदी कुंकवाचे सगळ्यांना निमंत्रण असे. प्रत्येकजण तयार होऊन, ठेवणीतले कपडे घालून आईबरोबर शाळेत जायचो. दारात आमचे मुख्याध्यापक सगळ्यांचे स्वागत करायला उभे असत. सगळे शिक्षक कडेला गप्पा मारत बसलेले असयाचे कारण त्याव्यतिरिक्त त्यांना करण्यासारखे काहीही नसे. आत गेल्यावर एकदम नटून थटून आलेल्या शाळेच्या शिक्षिका दिसत. मस्त भरजरी साड्या नेसलेल्या, काही नथ, तन्मणी वगैरे घातलेल्या, काही मोजकेच सोन्याचे दागिने घातलेल्या बाई काही वेगळ्याच दिसत. आमच्या शाळेला मोठा एक हॉल होता तिथे हे हळदीकुंकु असायचे. सतरंजी अंथरलेली असायची त्यावर जाऊन बसले की एखाद्या बाई येऊन हळदी-कुंकु, अत्तर, गुलाबपाणी, पान सुपारी आणि एखादी बर्फी असे द्यायच्या. माझी मम्मी त्याच शाळेत शिकलेली होती त्यामुळे तिच्यापण काही शिक्षिका मला होत्या. तिच्या एक-दोन वर्गमैत्रिणी पुढे आमच्याच शाळेत शिक्षिका म्हणून लागल्या होत्या. मम्मीला त्यातले कोणीही भेटू नये असे मला अगदी मनापासून वाटे. 'अगं तू इतकी शांत होतीस, तुझी मुलगी किती बोलते!', 'अगं तिला येतं ग सगळं पण खूप आळशीपणा करते!' किंवा 'तिच्याकडून जरा स्पेलिंग वगैरे नीट पाठ करून घे गं!' अशा काय काय तक्रारी केल्या जायच्या. घरी येईपर्यंत मम्मीची बोलणी खायला लागायची. याला अपवाद एखादाच! ९-१०वी मधे गेल्यावर आम्हा सगळ्या मुलींना 'टिनेजरी' शिंगं फुटायची. मग मुद्दाम एकदम टुकार कपडे घालून कार्यक्रमांना जाणे, कोणत्याही स्पर्धांमधे भाग न घेणे, जितका म्हणून स्नॉबिशपणा करता येईल तेवढा करत असू. ११वीत मात्र आम्ही शाळेतला शारदोत्सव नाही हे जाणवून किती चुकल्यासारखं वाटलं होतं! 

शाळा-कॉलेजच्या संपूर्ण आयुष्यात मी फक्त एकदा गरब्यासाठी गेले होते ते देखील माझ्या एका गुजराती वर्गमैत्रिणीमुळे तिच्या घरच्यांच्या बरोबर. आमच्या गावात गुजराती-मारवाडी समाज भरपूर. ते लोक एखादे मंगल कार्यालय भाड्याने घेऊन तिथे गरबा खेळत. दांडीया होता की नव्हता ते देखील आता मला आठवत नाही. तिथे २-३ तास नाचून रात्री ११ वाजता घरी येताना दुखलेले पाय याव्यतिरिक्त मला त्यातले काहीही आठवत नाही.


याच नऊ दिवसांमधे आम्ही कोयनेकाठच्या दैत्यनिवारीणी देवीच्या दर्शनाला जायचो. तिथे भली मोठी रांग असायची. खेळणी-फुगे-गाड्या वगैरेंचे स्टॉल, भेळेच्या गाड्या वगैरे असायचे. अगदी जत्राच दुसरी! मंदिराच्या कडेने कोयना नदीकडे जायला पायर्‍या होत्या. तो रस्ता बरेचदा बंदच केलेला असे. सगळ्याजणींनी एकत्र घोळक्याने जाऊन घोळक्याने येणे आणि सोबतीला गप्पा! आजुबाजुच्या बायका एकमेकींच्या सोबतीने जात कारण ५-६ किलोमिटर अंतर चालून जायचे असे. टांगे, रिक्षा असल्यातरी सगळ्यांना परवडण्यासारख्या नसत आणि त्या भागात बसची सोय नव्हतीच. आजीकडे घट बसवलेला असे. ज्या दिवशी दैत्यनिवारिणीला जाऊ त्याच दिवशी आज्जीकडे जाऊन यायचो. परात, त्यातला नारळ आणि कडेच्या मातीत उगवलेले धान्य, घटाला चढत्या क्रमाने वाहिलेले कारळ्याच्या फुलांचे हार आणि सोबत असलेला नंदादीप यामुळे आज्जीचे देवघर खुप प्रसन्न दिसे. गव्हाच्या लोंब्या वगैरे वर टांगलेल्या असत. आज्जी आठव्या दिवशी कडाकण्या करायची. गोल, चक्र, वेणी, फणी असे बरेच तळलेले प्रकार करून ते घटावर बांधायचे. दसरा झाला की ते खायला मिळत काही काही गोष्टी घटाबरोबर विसर्जन होत असत.


खंडेनवमीला शस्त्रास्त्रे, पुस्तके, वगैरेंची पूजा जवळपास प्रत्येक घरी सारखीच. एखादे शस्त्र कमी-अधिक येवढेच. पहिली ते चौथीत असताना दसर्‍यादिवशी शाळेत पाटीपूजन असायचे. पाटीवर १ आकड्याची सरस्वती, ती पण कडेने मस्त नक्षी वगैरे काढून ती आम्ही रंगवायचो. सकाळी फुलं, गुळखोबरे, पाटी आणि एक पुस्तक घेऊन शालेत जायचे. तिथे वर्गात बसून प्रार्थना म्हणायची. ते झाल्यावर 'या कुन्देन्दु तुषार हार धवला...' ही प्रार्थना म्हणायची. गुळखोबरे खाऊन घरी यायचे. सायकली-गाड्यां धुवून पुसून एकदम लक्ख करायच्या. त्यांची पूजा करून हार घालायचे. घराला तोरण, दारात मोठी रंगीत रांगोळी असा थाट असे. गोडाधोडाचे जेवण झाले की संध्याकाळच्या सोनं लुटायला जाण्याचे वेध लागत. आम्ही मैत्रिणी अगदी दूरदूरपर्यंत शाळेतल्या बाईंना वगैरे जाऊन सोने देऊन त्यांचा अशिर्वाद घेऊन यायचो. घरात-दारात-रस्त्यात पडलेल्या सुकलेल्या आपट्यांच्या पानांचा सडा संपलेले नवरात्र अधोरेखित करायचा.


देशाबाहेर आले, गणपती-दिवाळी हे सण अगदी आवर्जून साजरे होतात. नववर्ष म्हणून गुढीपाडवा देखील साजरा होतो. पण दसर्‍याच्या दहा दिवसांचा तो सोहळा मात्र आता नाही. खंडेनवमीला लक्षात आले तर पुस्तक-शस्त्र पूजा आणि दसर्‍यादिवशी लक्षात असेल तर गाड्यांची पूजा यात नवरात्र 'साजरं' होतं. पूर्वीच्या आठवणी मनात फेर धरतात आणि भोंडला सुरु होतो -


अक्कणमाती चिक्कणमाती,
अश्शी माती सुरेख बाई खड्डा तो खणावा
अस्सा खड्डा सुरेख बाई जातं ते रोवावं
अस्सं जातं सुरेख बाई पिठी ती दळावी
अश्शी पिठी सुरेख बाई करंज्या कराव्या
अश्श्या करंज्या सुरेख बाई तबकी ठेवाव्यात
अस्सं तबक सुरेख बाई शेल्याने झाकावं
अस्सा शेला सुरेख बाई पालखी ठेवावा
अश्शी पालखी सुरेख बाई माहेरी धाडावी
अस्सं माहेर सुरेख बाई खायाला मिळतं
अस्सं सासर द्वाड बाई कोंडोनी मारतं
अस्सं आजोळ गोड बाई खेळाया मिळतं ...

Thursday, September 08, 2011

किंचीत चाकोरीबाहेरचे ...
साधारण वर्षभरापूर्वीची गोष्ट आहे. रश्मी नुकतीच भारतात रेणूताईंना भेटून आलेली होती. एखाद्याच्या कर्तुत्वाने भारावून जाणे म्हणजे काय असते त्याची प्रचिती मला तिच्या बोलण्यातून येत होती. साधारण त्याच दरम्यान आमचे अजून एका मैत्रिणीशी लहान मुलांच्या एखाद्या संस्थेला आपण मदत करू शकतो का यासंदर्भात चर्चा चालू होती. त्या मैत्रिणीशी बोलताना ती स्वत: कोणकोणत्या पद्धतीने चॅरिटीना मदत करते ते ऐकुन आपणही काहीतरी करू शकतो हे जाणवले. ती जेव्हा जमेल तेव्हा छोटा-मोठा फूड स्टॉल ठरवून, तिथे पदार्थ विकून  आलेले पैसे एखाद्या चॅरिटीला देते. आम्हाला दोघींनाही ही पद्धत आवडली. पण फूडस्टॉल ठेवायचा तर कुठे, कसा याचा विचार चालू असतानाच आमच्या घरी महाराष्ट्र मंडाळाच्या गणपतीच्या संदर्भात चर्चा चालू झालेल्या होत्या. त्यामुळे अनायसे त्यांनाच पहिले विचारू असे आम्ही ठरवले. महाराष्ट्र मंडळाने आमच्या अपेक्षेपेक्षा लवकर होकारार्थी प्रतिसाद दिला. आता मोठी परीक्षा होती कारण पदार्थ कोणते ठेवायचे, किती ठेवायचे यावर चर्चा करणे यासाठी खूप वेळ उरला नव्हता. पण एकदा फोनवर बोलून आणि एकदा भेटून सगळे ठरवले. अजून - मैत्रिणींना मदतीला यायला आवडेल का विचारले. त्यांची इच्छा असूनही त्यांना मदत करणे शक्य  नव्हते कारण आमची चूक होती, आम्ही अगदी शेवटच्या क्षणाला त्यांना विचारले होते. पण पुढीलवर्षी नक्की मदत करू असे मात्र खात्रीने त्यांनी आम्हाला  सांगितले. तरीही मैत्रिणी अगदी त्यादिवशी मदत करायला येणार का विचारल्याबरोबर हजर झाले होतेआम्ही दाबेली, कटलेट्स आणि चॉकलेट कपकेक्स बनवले होते. सकाळी पासून रात्री पर्यंत आम्ही दाबेली बनवत होतो. संपूर्ण दिवस उभे राहून थकलो तरी आपण काहीतरी वेगळे केले याचे समाधान मिळाले

गेल्या वर्षीच्या स्टॉलला भरभरून प्रतिसाद मिळाल्यामुळे आम्ही यावर्षीपण स्टॉल ठेवायचा विचार केला. पण यावर्षी सगळ्या मैत्रिणींना आणि मित्रांना मदत करणार का म्हणून आधी विचारले. कारण गेल्या वर्षी नाही म्हणाले तरी आम्हा दोघींना खूप दगदग झालेली होतीच. त्यातून यावर्षी ऑफिसमधे कामाचा बोजा जास्त होता त्यामुळे अगदी त्या दिवसापर्यंत आपल्याला कितपत काय काय करायला जमेल याची खात्री वाटत नव्हती. सगळ्या मित्रमैत्रिणींनी अगदी आनंदाने सहभागी होऊ याची ग्वाही दिली. परत एकदा महाराष्ट्र मंडळाने सहकार्य करून आम्हाला यावर्षीच्या गणेशोत्सवात स्टॉल ठेवायला परवानगी दिली. आम्ही गेल्या वर्षीच्या अनुभवामुळे दाबेली आणि कपकेक्स करायचेच असे ठरवले होते. पण कटलेट्स करता अजून काय करता येईल असा विचार करताना साबुदाणा खिचडी यावर आम्हा सर्वांचे एकमत झाले. दोन दिवसांनी मंडळाकडे चौकशी केल्यावर दुसरा एक स्टॉलधारक साबुदाणा खिचडी करणार आहे असे कळल्याने आम्हाला तो विचार रद्द करून अगदी - दिवस आधी मेनूमधे बदल करावा लागला. सर्वानुमते पाणीपूरी करायची असे ठरले. कोणकोण काय काय करणार याचे वाटप झाले. कोण किती वाजता स्टॉलवर हजर रहाणार याचे गणित आखले. आणि आम्ही सगळेजण तयारीला लागलो. आधी दिवस सगळ्यांकडे गणपती असल्याने ऐनवेळी कोणाला काही मदत लागू शकते याची थोडी चाचपणी झाली. पण सगळे हे सर्व करायला उत्सुक होतेच त्यामुळे मी आले/आलो नाही तर माझ्याऐवजी कोण येऊ शकेल याची प्रत्येकाने मनाशीच तयारी केलेली होती. एका मित्राने चमचे, डिशेस, सुट्टे पैसे, टेबलक्लॉथ असे सगळे आणायची जबाबदारी घेतली. तसेच सकाळ्पासून शेवटपर्यंत स्टॉलवरच थांबेन अशी ग्वाही दिली. एका मैत्रिणीने पाणीपूरीच्या पुर्या एकेठिकाणी जाऊन आणायची जबाबदारी घेतली. त्यांना आम्ही कशासाठी स्टॉल करतोय हे सांगितल्याने मनापासून मागता संपूर्ण खरेदीमधे २०% सूट दिली. दोघी मैत्रिणींनी सगळ्या चटण्या, पाणीपूरीसाठी लागणारे मूग, रगडा इत्यादी करण्याची संपूर्ण जबाबदारी घेतली. दोघी जणींनी सगळे कपकेक्स केले. आम्ही दोघींनी दाबेलीचे सारण केले. एकीने कांदा, द्राक्षे, कोथिंबीर चिरणे, मसाला दाणे बनवणे ही जबाबदारी घेतली. आम्ही दाबेली सारण करणार्यांनीच ब्रेडची जबाबदारी घ्यायची होती ती देखील कपकेक्स करणार्या एका मैत्रिणीने घेतली. रात्री अगदी ठरवल्यासारखे सगळ्यांनी एकदम फेसबूकचे स्टॅटस बदलले. अशाप्रकारे ऐनवेळी कोणतीही फोनाफोनी होता आपापली तयारी करून आम्ही दुसर्या दिवशीची वाट पहात झोपून गेलो

सकाळी ला स्टॉलवर हजर रहायचे होते. आम्ही इतर सगळी तयारी केली तरी स्टॉलवर लावायला दरपत्रक वगैरे माहिती काहीही प्रिंट केली नव्हती. सकाळी एकीने रंगित मार्कर्स पाठवले आणि एकजण कागद घेऊन आली. एका मित्राने स्टॉल सेट झाल्याझाल्या लगेचच सुंदर हस्ताक्षरात सगळे दरपत्रक लिहीले. आम्ही स्टॉल का करतोय ते लिहुन भिंतीवर लावले. आता आम्ही पहिल्या गिरहाईकाची वाट पहात सज्ज होतो. आम्ही स्टॉल लावत होतो तेव्हा मंडळाच्या गणपतीची पूजा चालू होती. अथर्वशिर्षाचे पारायण संपले आणि आम्ही पहिल्या गिर्हाईकासाठी दाबेली करायला सज्ज झालो. आमचेच एक मित्र एक दाबेली, कपकेक्स घेऊन, एक पाणीपूरी खाऊन आम्हाला काळजी करू नका, सगळे एकदम झक्कास होईल असे सांगून गेले. सकाळी सकाळी लहान मुलांना पाणीपूरी खायची होती आणि आईबाबा नको म्हणताहेत असे एक गंमतशीर दृश्य आम्ही वारंबार पाहिले.. पण 'दुपारी नक्की देतो' हे आश्वासन मिळाल्याशवाय - लहान मुले जागेवरून हलली नाहीत. सकाळी शंभरएक गिर्हाईके येऊन गेल्यावर सकाळची फळी विश्रांतीसाठी घरी गेली आणि दुसरी ताज्या दमाची फळी स्टॉलवर येऊन हजर झाली. अधुन मधुन स्टॉलवर नक्की काय चाल्लय ते फेसबुकावर अपडेट टाकणे चाललेच होते. मला सर्व एकदम रात्री घरी गेल्यावरच पहायला मिळाले. दुपारी थोडे शांत झाल्यावर पसारा थोडा आवरला, स्वत:च्या जेवणाची सोय केली. मग सगळे गप्पा मारत गिर्हाईकांच्या पुढच्या लाटेची वाट पहात बसून राहीलो. दुपारी परत १०० एक दाबेल्या १०० पाणीपूरी प्लेट्स असा व्यवस्थित खप झाल्यावर आम्ही साधारण रात्री .३० ला आता संपले असे सगळे सांगून थोडावेळ थांबलो. सगळे सामान नीट गोळा केले. सगळ्यांचे सामान नीट आले का पाहिले. आणि रात्री .३० ला आम्ही सगळ्यांनी एकमेकांचा निरोप घेतला. सगळ्यांनी जाताना एकदम सुखद अनुभव आला हे आवर्जून सांगितले. दोन दिवस कोणाचे फोन, इमेल काही आले नाही. पण सगळ्यानी फेसबूक स्टॅटस अपडेट केले. मंगळवारी सगळ्यांच्या इमेल्स आल्या आणि प्रत्येकाने 'पुढच्या वेळी आपण हे असे करू ...' अशा स्टाईलची वाक्ये टाकली होती. यावर्षीचा अनुभवही आम्हाला अत्यंत आनंद देऊन गेला.

आपण आपल्या आनंदासाठी खूपच गोष्टी करतो पण आपल्या आनंदातून अजूनही कोणाला तरी आनंद मिळवून देऊ शकतो हे आम्हाला आता पुरेपूर पटले आहे. पुढच्यावर्षी ही परंपरा कायम ठेवण्याची सुबुद्धी गणपती बाप्पा आम्हां सर्वांना देवो हीच त्या श्रीचरणी प्रार्थना! सगळ्यांच्या घरच्यांनी आम्हां ला संपूर्णपणे पाठिंबा दिला, आमचे धैर्य वाढवले. त्यांच्या मदतीशिवाय आम्ही हे सर्व तडीस नेऊ शकलो नसतोआम्हांला प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे मदत करणार्या सगळ्या हितचिंतकांचे आभार, तुमच्या सहकार्याशिवाय आम्ही हे यशस्वीपणे पार पडणे कठीण होते. तुम्हां सर्वांना आमच्या  संपूर्ण टीमकडून धन्यवाद.
|| मंगलमूर्ती मोरया || 
|| गणपती बाप्पा मोरया || 

(गणपती बाप्पांचा एवढा सुंदर फोटो वापरायला परवानगी दिल्याबद्दल अभिजीत धर्माधिकारी यांचे आभार.)

Wednesday, April 28, 2010

नाटक करायचे नाटक ...

आज बर्‍याच दिवसानी मराठीमधे काहीतरी लिहायचा योग आला. ते लिखाण इथे आहे -

Monday, February 23, 2009

सिंधुताई सपकाळ अर्थात माईंशी अनौपचारिक गप्पा

सिंधुताई सपकाळ यांच्याबरोबर अनौपचारीक गप्पा मारण्याची संधी गेल्या आठवड्यात मिळाली त्यातील काही भाग मयबोलीवर लिहिला आहे -

http://www.maayboli.com/node/5987

Sunday, February 22, 2009

केळीच्या बागा

Kelicha bag
पहिलीला असताना आम्हाला 'केळीच्या बागा मामाच्या' ही कविता होती. मस्त घड लगडलेल्या केळीच्या झाडाचे एक चित्र होते त्या कवितेशेजारी. ती कविता आणि ते चित्र माझ्या इतकी वर्षे झाली तरी मनात घर करुन राहिलेय. आमच्या मामांच्या परसात अगदी केळीच्या बागा म्हणण्या इतकी नसली तरी बरीच झाडे होती. आता केळीच्या झाडाला झाड म्हणायचे की नाही हा मुद्दा वेगळा! आज्जी, मामा आणि आम्ही एकाच गावात रहात असल्याने अजोळी जाउन रहायचे सुख खुप कमी. पण आज्जीकडे जाउन जेवणे वगैरे नेहेमीचेच त्यातल्या त्यात मी अगदी लहान असताना तरी जास्तीच. घरी खुप मामा शिकणारे, दुकान चालवणारे त्यामुळे भांडी पण खुप पडायची घासायला तशात भांडीवाली टिकणे मुश्किलिचे. या सगळ्यामुळे असेल मला आज्जीकडचे लहानपणी जेवलेले जे आठवतेय ते केळीच्या पानावरचेच. घरातलीच पाने असायची त्यामुळे कधीही काढली जायची. शक्यतो वार्याने वगैरे फाटलेली पाने पहिल्यांदा काढली जायची. केळीचे पान किंवा कोणताही भाग कापला की चिक गळतो आणि त्या चिकाचा डाग एकदा कपड्यांना लागला की कपडा फाटेल पण डाग जाणार नाही. त्यामुळे मामा लोकांना आज्जी सतत बजावुन सांगायची. केळीच्या झाडाचा परिचय हा असा. त्यामुळे केळीच्या पानात जेवणे म्हणजे आजोळची आठवण हे समिकरण बरेच दिवस होते. पुढे काही कारणांमुळे आजोळी जाणे एकदम बंदच झाले, केळीच्या पानांवर जेवणे फक्त मनातच राहिली.


माझा भाऊ लहानपणी बरेचदा अजारी असायचा. त्याच्या पथ्यासाठी आमच्याकडे केळी, पेरू, बोरे, चिंचा असले प्रकार कधी घरी आले नाहीत. मम्मी-पप्पांनी एक ठरवले होते की जे काही करु ते दोघांचे सारखेच. त्यामुळे त्याला चालत नाही म्हणुन मग मलादेखील नाही. मी कधीतरी हट्ट केलाच असेल तरीपण त्यांनी कधी मानले नाही आणि मला त्याचे पुढे काही वाटेनासे पण झाले. तया सगळ्यामुळे झाले काय तर लहान असताना शिकरण चपातीचे जेवण असल्याचे आठवतच नाही त्याऐवजी गुळ तूप पोळी, तूप साखर पोळी असे बरेचदा असे.दरम्यान आमचे स्वतःचे घर बांधुन झाले. मग घराभोवती कोणती झाडे लावायची असा विचार चालु असताना आमचा वॉचमन पलिकडच्या शेतातुन १-२ केळीचे अगदी बारके कोंब घेउन आला. ते जगतील अशी काही त्यांची परिस्थिती नव्हती पण असुदे लावुन पाहुयात असे ठरवुन जमिनीत रोवले. घरच्या धुण्या भांड्याचे पाणी, शेतातली काळी माती यामुळे असेल १५ दिवसात तेच कोंब मस्त तरारले आणि बघता बघता मोठे देखील झाले. केळीच्या झाडाचे एक असते की एक झाड नीट जगले की त्यालाच शेजारी शेजारी झाडे येत रहातात. त्यामुळे एकदा केळीचे एखादे रोप लावले आणि ते नीट वाढले तर शक्यतो घरातले केळिचे झाड हटत नाही. आमच्या केळीला पहिला घड धरला तेव्हाचा आनंद अजुन आठवतो. घड धरुन लहान लहान फण्या लागल्या. एकेदिवशी आम्ही शाळेला गेलो असताना मम्मीने लहान कोका काढुन आणला तेव्हा आम्ही केलेला गोंधळही आठवतोय. कशाला काढला, आपल्याला अजुन केळी मिळाली असती की वगैरे वगैरे. मम्मीने नीट कारणे सांगुन व्यवस्थित पटवुन दिले होते की हे करणे कसे चांगले आहे.

Kelphul

केळ अशी परत आमच्या आयुष्यात आली. घरच्या केळफुलाची भाजी करताना मम्मीने मला केळफूल कसे सोलावे, कसे ताकाच्या पाण्यात घालुन त्याचा काळेपणा कसा घालवता येतो वगैरे वगैरे. त्यावेळी मम्मीचा खुप राग यायचा कशाला हे सगळे माहिती पाहिजे म्हणुन. पण त्यावेळी तिने ब-याच गोष्टी दाखवल्यामुळे, सांगितल्यामुळे आज कधी अडचण पडत नाही. पुढे घरच्या केळीचा घड काढताना केळ पण कापावी लागते हे कळले. तेव्हा अक्खे झाड काढायचे म्हणुन खुप वाईट वाटलेले. पण मामा, मम्मीचे म्हणणे की त्या केळीच्या झाडाला परत घड येत नाही यामुळे ते काढावेच लागते. तेव्हा पण वाईट वाटले होते. येवढे झाड वाया जाणार म्हणुन. पण तेव्हाच लक्षात आले केळीचे झाड अज्जिबात वाया जात नाही. पाने जेवायला वापरतात. बुंध्याचे सोप काढुन भाज्याच्या पेंड्या बांधायला वापरतात. काही काही बायका केळ पाडल्यावर त्यातुन जो पांढरा चिक गळतो तो पापडाचे पीठ भिजवायला वापरतात. उरलेले झाड गाई-म्हशी वगैरे जनावरे संपवुन टाकतात. घड काढुन आणल्यावर तो थोडावेळ बहेर ठेवायचा कारण त्याचा चिक पडुन फरश्या खराब होतील म्हणुन. पुढे केळी पिकुन पोटात जाईपर्यंत रोज तो घड एकदा सकाळी उठल्या उठल्या आणि शाळेतुन परत आल्यावर पहायचा. वेलची केळी असल्यामुळे रंग आणि चव दोन्ही अप्रतीम होती. एवढी झाडे असुनही केळीच्या पानावरील जेवणे मनातच राहिली. पुढे दर आठवड्याला एक घड या हिशोबाने केळी मिळत तरीदेखील कंटाळा आला नाही कधी. निम्मा घड कोणाकोणाला देण्यात तर निम्मा घड घरी अशी वाटणी असल्याने कधी कंटाळा आला नाही.

Pangat

अलिकडे भुसावळ-जळगावला जायचा योग आला. तेव्हा केळीच्या बागेचे फोटो काढायचे अगदी ठरवुन गेले होते. त्यामुळे तिथे गेल्या गेल्या सगळ्यांच्या मागे तीच भुणभुण लावली होती. आणि त्याचवेळी घरच्या भांडीवालीने दांडी दिल्यामुळे घरी केळीची पाने जेवायला आणली गेली. मग मला आवडते म्हणुन मग नाष्टा, जेवणे सगळेच केळीच्या पानावर मिळु लागले. अगदी पुरणपोळी, साबुदाणा खिचडी पासुन ते शेतात केलेल्या पिकनीकचे जेवण देखील केळीच्या पानावर जेवण. केळीच्या पानावर अगदी मनसोक्त जेवले ब-याच वर्षांनी. केळीच्या बागेचे, केळीच्या घडाचे, कोक्याचे(केळफुलाचे) फोटो काढले.येवढेच नव्हे तर कच्च्या केळ्याची भाजी, केळफुलाची भाजी, कच्च्या केळ्याचे वेफर्स, कच्च्या केळीच्या पिठाचे थालीपीठ असले सगळे प्रकार खायला देखील मिळाले.

Saturday, January 24, 2009

खानदेशातली पंगत

लग्नातल्या पंगती हा एक महाराष्ट्रातला अगदी नवलाचा प्रकार. पश्चिम महाराष्ट्रातल्या खेडेगावातली शाक-भाताची पंगत, जरा मोठ्या गावातली मसालेभात, मठ्ठा, जिलेबी किंवा लाडवाची पंगत, पुण्याकडची श्रिखंड, पुरी-बटाट्याच्या भाजीची पंगत अशा अनेक प्रकाराच्या पंगतीची वर्णने आपण ऐकतो. कधीकाळी आपल्यापैकी ब-याच लोकानी हा प्रकार पाहिलेला/अनुभवलेला देखील असेल. आपल्या बहिणाबाईंच्या खानदेशातली पंगत देखील अशीच एक साधी गावातली पंगत. त्या पंगतीचे हे वर्णन -(तळटीप - ही चित्रफीत एका छोट्या गेट-टुगेदर मधे बनवलेली आहे. त्यामुळे लहान मुलांचा दंगा वगैरे आहे)

Sunday, September 28, 2008

बागेतला फेरफटका

शनिवारी रविवारी कधी नव्हे ते थोडा वेळ मिळाला बागेत चक्कर टाकायला. आमच्या रोझमेरीला आलेली फुले त्यावरच्या मधमाश्या, तुळशीच्या झाडाला आलेल्या मंजि-या, लॅव्हेंडरची जांभळी फुले, टोमॅटोची वाढती झाडे, काकडीच्या वेलावरचे लेडी बग्ज, आळुच्या बारक्याश्या पानांवरचे दवबिंदु ही निसर्गचित्रे पहायला मिळाली. माझ्या तोकड्या फोटोग्राफीच्या बळावर काढलेले हे फोटो.