Friday, March 24, 2006

अरुंधती -- एक मैत्रीण

मी २ री किंवा ३ री मधे असतानाची गोष्ट. शाळेमधे माझी आवडती मैत्रीण हा निबंध लिहुन आणायला सांगितला होता. त्यावेळी आवडती मैत्रीण म्हणजे शेजारी बसणारी मुलगी हे समिकरण होते. म्हणुन मग मी माझ्या वैशाली नावाच्या मैत्रीणीवर निबंध लिहायला सुरुवात केली. पण तिचे केस मोठे आहेत, ती मला खुप आवडते आणि अशीच २ - ३ वाक्ये लिहीली आणि मी मम्मीकडे गेले - मला आता पुढे काहीतरी सांग म्हणत. ती म्हणाली, मला तुझी वैशाली कोण ते कुठे माहीती आहे. मग थोदी चिडचिड झाली आणि मी रुसुन दुसरा अभ्यास सुरु केला. सकाळी शाळेत जाण्याअगोदर परत आठवण झाली कि निबंध लिहायचा आहे. परत मम्मीच्या मागे लकडा. मग मम्मी म्हणाली, मी सांगते ते लिहिणार असशील न रडता तर सांगते. तिने सांगायला सुरुवात केली - माझ्या आवडत्या मैत्रीणीचे नाव अरुंधती पुढे असेच काही काही. शाळेतल्या निबंधाचे काम झाले म्हणुन मी खुष होण्याचे सोडुन हे केवढे मोठे नाव, मला ह्या नावाची मुलगी पण माहीती नाही हेच विचार डोक्यात. पण का कुणास ठावुक ते नाव मात्र माझ्या डोक्यात बसले.

पुढे मी अमेरीकेमधे M. S. करताना मला एक मैत्रीण मिळाली - अरुंधती !! पण तोपर्यंत हा प्रसंग माझ्या पूर्ण विस्मरणात गेला होता. आता ती आणि मी खुप चांगल्या मैत्रीणी आहोत. परवा घरुन office ला येता येता मला वरचा प्रसंग आठवला. काही काही प्रसंग भविष्याची नांदी असतात का?

1 comment:

Sumedha said...

बरोबर बोललीस. असं जुनं काही आठवून कधीकधी मलाही असंच वाटतं, आणि मग असंही वाटतं की हे उगीच आपल्या मनाचे खेळ आहेत!! तुझी "सूरपूजा" पण आवडली!