होळी आली की मला आठवतात त्या लहानपणी शिवाजी हौसिंग सोसायटी मधे केलेल्या २-३ होळ्या. मी दुसरीला वगैरे असेन तेव्हा. आमच्या घरी होळी असायची नाही म्हणुन मग शेजारच्या पाटलांच्या घरची होळी सकाळी सकाळी बघायला जायचे. मग सोसायटीच्या मोठ्या मुलांबरोबर लाकडे गोळा करत फ़िरायचे कारण सुट्टी असायची. शेखरदादा, शिवाकाका, दिलिप्या, राजा, हरीश, मुन्या, बकी, सविता बरीच पलटण असायची. मम्मीला बहुदा माहीत नसायचे कुठे जाणार ते. पण मुन्या आणि शिवाकाका लक्ष ठेवुन असायचे. कुठे काटे लागत नाहीत ना, कुठे तारेत कपडे अडकत नाहीत ना ते. कारण हे सगळे मम्मी पप्पांचे विद्यार्थी! त्यामुळे माझ्यापेक्षा तेच त्यादोघांना घाबरुन असत.
कुणाच्या शेणी चोर, कुणाला सांगुन मागुन आण, शेताच्या कडेला कुणी काढुन ठेवलेले जळणच उचल, शेतातल्या खोड्क्या वेच, आणि जर नुकताच बैल बाजार झालेला असेल तर मग तिथुन शेण्या गोळा करुन आण असले उद्योग चालायचे. आम्हा बरक्या पोरांचे काम फक्त मोठे कोणी बाजुने जात नाही ना ते पहायचे आणि मोठ्या पोराना सांगायचे. जेवायला घरी आले की मम्मीचा आणि पप्पांचा ओरडा खायचा कारण ऊन वाढलेले असायचे आणि परीक्षा जवळ आलेली असायची. जेवुन मग अभ्यासच करावा लागायचा कारण तेव्हा मम्मी पप्पा पण आपापल्या कामातुन मोकळे होउन आमच्यावर लक्ष ठेवायला रिकामे झालेले असायचे. मग एक डोळा बाहेर होळी रचणा~या मुलांवर ठेवुन कसाबसा अभ्यास संपवायचा. आणि ४-५ वाजता दुध पिउन मम्मीला लाडीगोडी लावुन बाहेर पळायचे. मधोमध एक एरंडाचे झाड असायचे आणि त्याभोवती होळी रचलेली असायची. रचलेली होळी ४-५ वेळा प्रदक्षिणा घालुन बघायची आणि आपण गोळा केलेल्या मालाचे ते नवे रुप बघुन आचंबीत व्हायचे!!
रात्री मग बरीच मोठी मुले, घरची मोठी माणसे होळीभोवती जमा व्हायची. कोणीतरी मोठे माणुस होळी पेटवायचे आणि मग होळीला पुरणपोळीचा नैवेद्य दाखवला जायचा. आणि तो नैवेद्य मग होळीत टाकुन पहीली बोंब ठोकली जायची! आणि मग काय ज्यानी पहीली बोंब ठोकली त्यांच्या नावाने जमलेली सगळी जनता बोंब मारायची. तिथुन जो दंगा सुरु व्हायचा की बास. सोसायटीमधल्या प्रत्येकाच्या नावाने पोरे शंख करायची!! पण आम्ही सगळे दारातुनच बघायचो. आम्हाला ओरडायची परवानगी नसे. पण तरी आम्ही ते ओरडणे enjoy करत असु.
रात्री केव्हातरी तो कार्यक्रम संपायचा त्याआधीच कधीतरी आम्ही थकुन झोपी गेलेलो असायचो!!
आणि आठवते ती एक दोन वेळा पाहीलेली आज्जीच्या घरची बारकीशी होळी. ५ गोव~यांची अप्पानी रचलेली. आज्जी त्याभोवती रांगोळी काढायची. मग अप्पा पुरणपोळीचा नैवेद्य दाखवायचे आणि मग एकटेच ४-५ वेळा बोंब ठोकायचे ती पण एकदम हळुच! सोसायटीच्या होळीचा हंगामा कधीच तिथे नसायचा :)
इथे होळी म्हणजे उत्तर भारतीय पद्धतीने रंगाची खेळतात. मला ते रंगात ओले होणे आणि खेळणे फ़ारसे आवडत नाही त्यामुळे त्या विकेंडला घरी पुरणपोळीचे जेवण करुन मस्त ताणुन द्यायचे अशीच होळी गेले कित्येक वर्षे साजरी करतेय :)
म्हणा होळी रे होळी .... पुरणाची पोळी!!
4 comments:
होळीला आम्ही इंजिनिअरींग कॉलेजच्या मालकीची झाडे (सुकलेली) पळवून आणायचो. इमानदारीत दोन-दोन शेण्या सगळ्या झोपडीवाल्यांकदून गोळा करायचो. नाही दिल्या की पळवल्याच म्हणून समजा. होळी भोवताली बोंब ठोकत चकरा काढणे हा सर्वात थ्रिलींग भाग. आणि '....च्या बैलाला" अशा आरोळ्या देत बोंब मारायचो. मजा यायची. आता कॉलनी सुनी झाली आहे. प्रथा-परंपरांना मरगळ आलिये. वाईट वाटतं.
सही लिहीलंयस! :) लहानपणीच्या खूप आठवणी जाग्या झाल्या...
बरं, पुरणपोळी खायला कधी येऊ? :D
मस्त लिहिलंय. होळीच्या दुसर्या दिवशी त्याच्यावर पाणी तापवून आंघोळ करायचो हेही आठवलं. होळीच्या आगीत भाजून काढलेले बटाटे तर भलतेच चविष्ट लागतात :p
अभिजीत,
गेले ते दिवस गेले रे. आम्हो नावाच्या पाट्या, लाकडी बाकडी, टेबले, काय काय पळवुन होळीत टाकत असु.
http://harekrishnaji.blogspot.com/2007/03/holi-re-holi-puranachi-poli.html
Post a Comment