Tuesday, February 13, 2007

शिक्षक पहावे होऊन ...

मी विद्यार्थी अवस्थेतुन शिक्षकावस्थेत कधी शिरकाव केला ते अजुनही नीट आठवते. M.Sc. ची २ वर्षे सोडली तर जवळपास १० वर्षे शिक्षकी केली. बीजगणित-भूमिती, चित्रकला, विणकाम, भरतकाम असले एकमेकांशी संदर्भ नसलेले विषय शिकवले. मम्मीच्या १ली ते ४थी च्या मुलांना मराठी, गणित, इतिहास, भूगोल पण शिकवले.

मला आठवते, मी पहीली दुसरीत असताना मम्मी आणि पप्पा मिळुन शिकवण्या घ्यायचे. त्या घरातुन मग दुसरीकडे रहायला गेल्यावर पप्पांनी ते सोडुन दिले पण मम्मीच्या पहिली ते सातवी शिकवण्या चालु होत्या. त्यातुन ती दुपारी शिवणकाम पण शिकवत असे. घरामधे सतत कोणी ना कोणी काहीतरी शिकत/शिकवत असेच. माझा आणि सुबोधचा अभ्यास पण त्या मुलांबरोबरच होत असे बरेचदा. हे सर्व पहाता पहाता मी स्वत: शिक्षीका केव्हा झाले ते मला समजले देखील नाही.

माझी पहीली विद्यार्थीनी म्हणजे सोनाली. ती शाळेत नेहमी व्यवस्थीत अभ्यास करणार, पहील्या पाच नंबरमधे येणारी ही मुलगी आठवीमधे गणितात कशीबशी पास झाली आणि तिच्या आईला एकदम टेंशन चढले! मग क्लासेसची चौकशी सुरु झाली. काही कारणांमुळे बाहेर कुणाकडे क्लास लावता येणे शक्य नव्हते. असेच बोलता बोलता मला समजले आणि मी तिला सांगितले की, जी गणिते आडतील ती विचारयाला येत जा! अशी अडलेली गणिते सोडवताना तिला वाटले की आपण इथेच रोजची शिकवणी लावाली तर! पण मला जबाबदारी घ्यायची नव्हती कारण माझी practicles, journals, college ह्यातुन मला कितपत जमेल असे वाटत होते. पण खुप आग्रह झाला आणि मग ती जबाबदारी घेतलीच शेवटी. ती रोज येते हे कळल्यावर मग जवळच्या एका शेतकर्यांची मुलगी पण म्हणाली मी पण येणार! झाले मग ह्या दोन पोरी आणि मी आमची सकाळी ८ वाजल्यापासुन गणिताशी झटापट सुरु व्हायची ती मी कॉलेजला किंवा त्या शाळेत जाईपर्यंत!! आणि ह्या शिकवणीचे निकाल, निक्काल प्रकारात न लागता एकदम चांगले लागले. सोनाली १५० पैकी १३२ गुण मिळवुन पहिल्या १५ मधे तरी परत आली आणि ज्योती आठवीला पुढे ढकलली गेलेली तिला १५० पैकी ९० गुण मिळाले. आणि ह्या सर्व गोष्टींचा माझ्या आभ्यासावर काहीही परिणाम (म्हणजे वाईट हो!!) झाला नाही.

पुढे १ली ते ७ वी पर्यंत जे कोणी येईल त्यांना जो लागेल तो विषय शिकवला. बर्याच मुलाना अभ्यासाचे महत्व पटले, गोडी लागली हे त्यांचे आणि माझे दोघांचेही नशिबच म्हणा ना!

M.Sc. करुन परत आल्यावर काय करायचे असा विचार चाललेला होताच. तेव्हा कॉम्प्युटरचा एखादा डिप्लोमा करावा म्हणुन पराडकर क्लासेसला गेले. पराडकरसरांनी सगळी चौकशी करुन मला विद्यार्थी + शिक्षीका असा दुहेरी मुकुट घातला. सकाळी ७.३० ते १२.३० शिक्षक आणि दुपारी २ ते ३ विद्यार्थी असा दिवस विभागला जायला लागला. त्यावेळचे विद्यार्थी म्हणजे अजय शहा वगैरे. अतिशय सज्जन मुले. आयुष्यात काहीतरी करुन दाखवायचे ही जिद्द असलेली. त्यामुळे सतत नवीन शिकण्याच्या मागे. ह्या मुलांना मी त्यावेळी MS Windows, Word, Lotus वगैरे fundamentals शिकवायचे. आजच्या technology च्या मानाने हे फ़ारच जुनेपुराणे वाटते पण त्यावेळी खरोखर ते शिकवण्यासाठी क्लासेस होते.

पुढे पराडकरसरांना १०वी च्या summer vacation साठी teaching assistant हवा होता. मग ते पण माझ्याच गळ्यात आले. १० वीची डामरट पोरे ती पण उन्हाळ्याच्या सुट्टीत अभ्यासाला बसवायची यासारखे कौशल्याचे काम इतर कोणतेही नाही! काय त्या खोड्या, काय ते अभ्यास न करण्याचे बहाणे अहाहा!! पण वर्गात एकदम धमाल असायची. मुलींतर नेहेमी मागे मागे असायच्या. तिथे रोज साड्या नेसुन जायची सवय झाली. मग पोरींच्या साड्याबद्दल कॉमेंटस आणि कॉम्प्लिमेंट्स, आवर्जुन फुले आणुन देणे वगैरे नेहेमीचे झाले. तेव्हाच मी रोज सातारला पण जायचे शिकवायला. तेव्हाच कम्युटींगचा पहीला अनुभव पदरात पाडुन घेतला. कराडमधे विद्यार्थी गावात कुठेही भेटायचे, बसमधे, रिक्षात, घाटावर, मंडईत. काहीजण मुद्दम ओळख दाखवुन बोलायचे तर काही आपले लक्ष नव्हते असे दाखवायचे! एकुण मजा यायची.
ह्या मुलांपैकी काहीजण आता US मधे नोकरी, उच्चशिक्षणासाठी आलेत. ऑर्कुटवर भेटतात. मजा वाटते.

त्याचदरम्यान कराड इंजिनीअरींग कॉलेजमधे प्रॅक्टीकल घेण्यासाठी कोणितरी हवे आहे असे कळले. सहज जाउन मी तिथे प्रिन्सिपलना भेटले तर त्यांनी ताबडतोब काम सुरु करायला सांगीतले. डिपार्टमेंट हेडना जेव्हा कळले की मी Statistics मधे M.Sc. केलेय तेव्हा त्यांनी लगेचच मला probability चे एक लेक्चर घ्यायला सांगितले. ते स्वत: मागे येउन बसले. माझे शिकवणे त्यांना बरे(!) वाटले असावे, पुढे आठवड्यातुन २ तास घेण्यास सांगितले. दुस~या सेमीस्टर ला मग Numerical Mathematics शिकवला. Practicles करताना लक्ष ठेवणे वगैरे चललेलेच होते. इथले माझे विद्यार्थी माझ्याहुन कसेबसे १ ते २ वर्षाने लहान होते. पण उच्चशिक्षणासाठी आल्याने व्यवस्थित अभ्यास वगैरे करायचे. अर्थात टवाळक्या वगैरे पण व्हायच्याच. काही मित्रासारखे मदतीला आले. तिथे मी अडिच वर्षे शिकवले. २ बॅचेसना शिकवले, ज्योतीसारखी जिवाभावाची मैत्रीण मिळाली. खुप चांगले, थोडे वाईट अनुभव गाठीशी बांधले.

ह्या काही वर्षांच्या ब~या-वाईट अनुभवांची शिदोरी आता जन्मभर पुरणारी आहे. सगळ्यात जास्ती कसोटी लागली ती एका गुणाची - patience!!!

4 comments:

Yogesh said...

याच्या पुढचा भागही लिहा :)

प्रिया said...

hmm... maajhi paN aai shikShikaa aahe. purvee gharee shikavNyaa ghyaaychee.. maajhaa, maajhyaa bahiNeechaa, shejaarchyaa mulaa-mulinchaa, javaLach raahaNaaryaa aate-bahiNinchaa ... sagaLyaanchaach abhyaas tichyaa classmadhye jhaalaa! aai+shikShikaa ashee tichee duheree bhumeekaa phaar bheeShaN vaaTaayachee malaa! :D

malaa maatra kadhi kaahi shikvaaychee weL aalee naahee, aaNi yeuhee naye. yaa saaTheechaa sagaLyaat mahattvaachaa guN - patience - aajibaat naahiye majhyaakaDe! :) ithe paN malaa TA pekShaa RA chaach job miLaavaa asa vaaTat hota, aaNi sudaivaane to miLaalaa!

tujhe anubhav vaachUn majaa aalee... aaNakhi kaahi specific gamatee-jamatee aaThawat asateel tar lihee naa tyaa divsaatlyaa....

Unknown said...

hey mints, thx for ur comment on my blog..
बाकी तुझाही ब्लॉग मस्त आहे, मला माहीतीच नव्हता.. आता वाचून काढतीय..

Anonymous said...

damarat ki dambrat. mala vatla dambis varun dambrat shabd aala asava. neways, aapan changla lihita :-)