आम्ही नवीन घरी रहायला गेलो तेव्हा भर उन्हाळ्याचे दिवस असल्याने आजुबाजुच्या शेतात काहीही पिके नव्हती. अगदी आजुबाजुच्या कुठल्याही शेतातुन आमचे घर स्पष्ट दिसत असे. आमची सरस्वती सोसायटी पण एका शेतक~याची जमीन बिगरशेती करुन घेतली होती. ह्या शेताच्या तुकड्याशेजारचा तुकडा माळी आज्जीचा. भर उन्हाळ्यात आज्जी तिच्या शेतातल्या खोपटामधे रहायची. कधी कधी बाहेर दिसायची. कुठली कुठली मुले बोरे काढायला शेतात घुसायची त्यांच्यावर ओरडायची. दिसायला अतीशय कृश पण आवाज मात्र अतीशय खणखणित होता. कधी पाण्याची चरवी कुठुन तरी घेउन येताना पण दिसायची. ओळख नव्हती त्यामुळे आज्जी कधीतरी आमच्याकडे पहायची पण शक्यतोवर नाहीच. एकेदिवशी एक बाई पाणी देता का प्यायला? असे विचारत आल्या. पुढे म्हणाल्या, "एरीगेशनला पण पाणी नाही. आणि इथे असेल म्हणुन मग घरुन कशाला ओझे आणायचे असे वाटल्यामुळे आणले नाही." त्यांनी आपले नाव सांगितले. शेतात आलोय म्हणाल्या. त्या आज्जींच्या सुनबाई! पुढे बोलता बोलता त्या मम्मीला म्हणाल्या, "आमची सासु भांडुन गावातल्या घरातुन इकडे शेतात रहायला आलीय जरा लक्ष ठेवा. म्हातारं माणुस आहे. मी डबा देते घरुन पण म्हातारी खाते की नाही माहीत नाही." मम्मीला वाटले, असेल सासु-सुनेचे भांडण म्हणुन तिने पुढे काही विचारले नाही. असेच मधे ३-४ दिवस गेले. आणि मग आज्जी दिसली नाही बाहेर. मम्मीला वाटले भांडण मिटले असेल गेली असेल घरी. पप्पांना सांगीतल्यावर ते म्हणाले, "हिंदुराव माळ्यांची आई आहे ती, बघुन ये आहे का खोपटात."
मम्मी आणि तिच्या मागे सुबोध गेले शेत तुडवत खोपटात. दोघे साधारण १५-२० मिनिटानी परत आले ते ’माळी आज्जीला बरे नाही. dehydration सारखे झालेय. मग मम्मीने खसखषीची का आल्याची कसलीतरी खीर करुन नेउन दिली. दुसरेदिवशी सकाळी मला आणि सुबोधला परत चहा घेउन तिच्याकडे पिटाळले. आणि अशी अमची आणि माळीआज्जीची ओळख झाली.
तिला भेटल्यावर प्रकर्षाने जाणवलेल्या दोन गोष्टी म्हणजे आज्जीला ऐकु कमी येते आणि आज्जी अतिशय बारीक आहे.
हळुहळु ओळख वाढल्यावर कळले की आज्जीबाई सुनेशी नाही तर मुलाशी भांडुन वेगळ्या राहील्यात. सुनेची अतिशय तारीफ़ करत असत. लेकीसारखी सांभाळते वगैरे वगैरे! त्याकाळात ते ऐकायला पण वेगळे वाटायचे. आज्जीची सांपत्तिकस्तीथी फारशी चांगली नव्हती. नातु कमवत होता ते पण कॉलेज बांधताना या लोकांच्या जमिनी घेउन घरटी एक माणुस नोकरीवर घ्यायची संस्थेने कबुल केल्यामुळे लागलेली ति नोकरी होती. स्वत:च्या शिल्लक राहीलेल्या जमीनी पिकवायची घरात कुणाला इच्छा नव्हती.
पुढे पाउस सुरु झाल्यावर आज्जीने निशिगंध आणि गलांड्याच्या फुलांची झाडे लावली. फुले यायला लागल्यावर आज्जी मग सतत शेतात दिसायला लागली कारण कॉलेजच्या पोरी जाता येता फुले तोडुन न्यायच्या. मग प्यायला पाणी मागायच्या निमित्तने म्हणा किंवा मम्मीने चहा घ्या म्हणल्याने म्हणा आज्जीचे आमच्याकडे जाणे-येणे वाढले. तिचा मम्मीवरचा विश्वास पन वाढत गेला. मग फ़ुले विकुन आलेले पैसे ती आमच्याकडे ठेवु लागली. पुढे एकेदिवशी बाजारातुन येताना १ किलो मटकी घेऊन आली आणि मम्मीला म्हणाली मला जरा एक मोठे पातेले दे. मग निवडुन ती मट्की धुवुन भिजवुन ठेवली. दुसरेदिवशी एक स्वच्छ पोते आणि साडीचा तुकडा घेउन मटकी बांधायला. आणि मग २ दिवसानी सकाळी सकाळी ६ वाजता ती मोडाची पाटी घेउन आज्जीबाई तुरुतुरु कराड्च्या मंडईत विकण्यासाठी गेल्या! दुपारी १२-१ वाजता घामाघुम होऊन घरी! सगळी मटकी विकुन आलेले पैसे मोजुन घेउन परत पुढची मटकी आणलेली.
आज्जीला कष्टाची अतोनात सवय होती. सतत काही ना काही चालु असायचे. सगळीकडे चालत फ़िरायची कारण तिला बसमधुन वगैरे कोणीतरी पळवुन नेतील असे वाटायचे. स्त्रिशिक्षण वगैरे भानगडीमधे आज्जीबात रस नव्ह्ता. स्वत:च्या नातीला ७ वी झाल्यावर लांब शाळेत पाठवायचे नाही असे म्हणुन शाळा सोडायला लावलेली होती. आवाज अतिशय खणखणीत असल्याने तिने जाहीर केलेला निर्णय पण अख्ख्या गावाला कळलेला असला पाहीजे. आठवी-नववीत मी अजुन का शाळेला जाते ते तिला कळायचे नाही. सुट्टीच्यादिवशी कधी आज्जी शक्यतो घरी यायची नाही कारण पप्पा घरी असायचे. कधि चुकुन लक्षात न राहील्याने आलीच तर पप्पांना ’दादा काय चाल्लय? बाईने (म्हणजे मम्मीने) चा दिला का नाय?’ अशी चौकशी करुन मम्मीशी बोलुन पटकन जायची. मी सतत पुस्तक हातात धरुन असायचे त्याचा बरेचदा रागराग पण करायची. माझे ८-९ वी मधले वय असल्याने त्याचा बरेचदा राग पण यायचा. नंतर कधीतरी तिने मला भरतकाम करताना पाहीले आणि बरीच खुश झाली. ती नेहमी कुठल्या कुठल्या भाज्या आणुन द्यायची त्यात हरभ~याची भाजी, घाटे, चवळीच्या कोवळ्य़ा शेंगा, कांद्याची पात, लसणीची पात, श्रावण्घेवडा, काळ्या घेवड्याच्या शेंगा. तिच्यामुळे ह्या सगळ्या भाज्या अपसुक मिळायच्या. हे सगळे आणुन द्यायची त्याच्याबदल्यात १ कप चहाची पण तिची अपेक्षा नसे. कष्टाची अतोनात सवय होती त्यामुळे कुठले काम जड जायचे नाही. पण घरातल्या कुणाचीच साथ नसल्याने त्या कष्टाचे चिज कधी झालेच नाही. नातवंडांची लग्ने निघाली तेव्हा तिने साठवलेल्या पैशातुन नातीला साडी, नातसुनेला साडी घेतलेली आठवते. मग सुन करेल म्हणुन एक म्हैस घेउन दिली. सुनेला ते पण जमले नाही. म्हातारीने त्याचे सगळे कर्ज फ़ेडले बारीकसारीक कामे करुन पण ती म्हैस विकुन आलेले पैसे उडवायला घरच्यांना १ महीना पण लागला नाही!
माळीआजीमुळे अजुन एक गोष्ट कळली म्हणजे त्यांच्या गावात श्रावण महिन्यात ज्ञानेश्वरीचा सप्ताह होत असे. मी ९ वि मधे असताना प्रसाद घेउन मी आणि मम्मी गेलेलो. त्यावेळी ३ रा अध्याय पठण चालले होते. शाळेत तेव्हा आम्ही रोज ५ श्लोक अशी गीता म्हणायचो श्लोकाचे अर्थ अवघड वाटायचे. त्यादिवशी अर्धा एक तास जे काही तिथे वाचायला बसलेले तेव्हा एक-दोन श्लोकांचे अर्थ लागलेले पण आठवतात.
अशी ही माळी आज्जी आज अचानक आठवली. ती गेली तेव्हा माझी १२ वीची परिक्षा चालु होती. त्यामुळे तिचे शेवटचे दर्शन नाही मिळाले. पण तिची आठवण कित्येक दिवस मनात रेंगाळत होती. डिसेंबर मधे घरी गेले असताना मुलगा, नातु यांनी राहिलेल्या शेताचे विकुन खाल्याचे समजले आणि आजीने इतकी मेहेनतीने सांभळलेली जमीन घरच्यांनी अशी उडवलेली पाहुन अतोनात दु:ख झाले. ती बिचारी हे बघायला नव्हती तेच बरे झाले असे वाटुन गेले एकदम ...
1 comment:
changle lihile aahe....ekdam ajjibai dolyasamor ubhya rahilya
Post a Comment