Sunday, September 09, 2007

आई मला शाळेत जाऊ दे ...

सध्या इथे नुकतेच शाळा/कॉलेजेस सुरु झाली आहेत किंवा होत आहेत. सगळ्या दुकानांमधुन Back To School सेल चालु आहेत. निरनिराळ्या प्रकारचे पेन, रंग, वह्या, दप्तरे पाहिले की मला माझी शाळा सुरु होतानाची लगबग आठवते. सगळ्यांनाच होत असेल.
मी जवळपास तीन वर्षांची असल्यापासुन बालवाडीत जात होते कारण आजुबाजुची मुले शाळेत जातात तर मग मी का घरी बसायचे हा हट्ट. मग पप्पा शाळेत जाताना एका लहान बालवाडीत मला सोडुन पुढे कॉलेजला जायचे. ४ वर्षांची असताना बाराखडी, अंक वगैरे सगळे नीट येत होते म्हणुन मग मम्मी पप्पांना वाटले की मी पहील्या इयत्तेसाठी तयार आहे म्हणुन मग मला शाळेत घेऊन गेले. पण वय कमी असल्याने मुख्याध्यापकांनी मला शाळेत दाखल करुन घ्यायला नकार दिला. त्यावेळी मला त्या शाळेत घेत नाहीत म्हणुन पसरलेले भोकाड मला अजुनही आठवते आणि आजुबाजुची जनता अवाक! कारण शाळेत जाताना रडलेली जनता खुप असते आणि शाळेत घेत नाहीत म्हणुन रडणारे आमच्यासारखे शुरवीर खुपच कमी.

शाळेसाठीची खरेदी हा एक त्याकाळी सोहळाच असे कारण सगळ्या गोष्टी अगदी नेहेमीच मिळायच्या असे नाही दप्तरे फ़क्त मे, जुन, जुलै महीन्यातच मिळायची मधे अधे कधी दप्तर फ़ाटले तर तेच दुरुस्त करुन वापरण्याशिवाय गत्यंतर नसायचे. शाळेसाठी नवीन पाटी मिळणार का? ह्यावर्षी तरी मी मम्मीला मोठी झालीय असे वाटुन पेन्सिलच्या ऐवजी पेन मिळणार का? आणि पेन शाईचे न मिळता बॉलपेन मिळेल का असले बालसुलभ प्रश्न कायम खरेदीच्यावेळी डोक्यात. कारण घरात कितीही ’तु म्हणशील ते घेऊ’ असे म्हणलेले मम्मी पप्पा पाटील आणि कंपनी किंवा भालचंद्र स्टोअर्स किंवा रमेश स्टोअर्स मधे गेले की त्यांना जे आवश्यक वाटेल तेच घेउन यायचे आणि मग घरी आल्यावरचे मुसमुसणे, चिडचिड मग त्यावरचे रागावणे अगदी ठरलेले!
अशातच मग तिसरीच्या खरेदीच्या वेळी न मागता मिळालेला चांदीच्या रंगिबेरंगी कागदात गुंडाळलेल्या पाटीवरच्या पेन्सिलीचा अक्खा पुडा किंवा चौथीच्या खरेदीच्या वेळी न मागता मिळालेला कॅमलीनचा संपुर्ण कंपास असे मस्त धक्केही मिळायचे. असे मिळालेले धक्के ही अगदी मग न चुकता दरवर्षी मिळत गेले. कधी मस्त कार्टून्स असलेली ६ इंची पट्टी असेल किंवा मग ०.५ ची मेकॅनिकल पेन्सील असेल किंवा मग १२ रंगांच्या ट्युबचा सेट असेल. पण ते त्यावेळी कधी जाणवायचे नाहीच. आता आठवत रहाते की त्यावेळी शाळेसाठी उपयोगाचे पण जरा महागाचे, सर्वांकडे सहजी नसेल असे काहीतरी नक्की घेतले जायचे.

नविन पुस्तके, वह्या हा तर नवीन शाळेचा अविभाज्य भाग. पप्पा मनापासुन सगळ्या पुस्तकांना कव्हर्स घालुन द्यायचे. पुढे त्यांनी मलाच शिकवल्याने मी पण त्यांच्याच तन्मयतेने ते काम करायचे. आजदेखील मी देशातुन येताना जी पुस्तके आणते त्यांना पप्पा कव्हर्स घालुन देतात! त्यानंतर त्यावर आपल्या ’सुवाच्य’ अक्षरात नाव घालायचे आणि मग शाळेत गेल्यावर सगळ्यांच्या वह्यांवर आई/बाबा/मामा/काका/मोठे बहीण/भाऊ यांनी घातलेली नावे पाहीली की झालेली चिडचीडही आठवते. मला वहीच्या पहील्या पानावर नावाव्यतीरीक्त काही लिहिलेले आवडायचे नाही. आणि शक्यतो शेवटच्या पानावरही गिरगिटु नये असेही वाटायचे. साधारण ९ वी किंवा १० वी मधे असताना माझ्या डोक्यात एक कल्पना आली ती म्हणजे नावाच्या पानावर एक चित्र काढुन ते रंगवायचे. ते पण काम मग मी शाळा सुरु होण्याआधी पूर्ण करत असे. दरवर्षी एक वेगळी थीम घेउन! शेवटच्या पानावरच्या गिरगटण्यावर उपाय नाही सापडला कधी ...

पावसाळी चप्पल आणि छत्री किंवा रेनकोट घेण ही पण एक शाळा सुरु होतानाचीच खरेदी. तसेच नवीन युनिफॉर्म्सची खरेदी पण हा एक आनंदसोहळाच! केस लहान असल्याने रिबीन्स वगैरे घेणे हा भाग नसे. तसेच नविन दप्तर हेही एक प्रकरण असे. मला आवडलेली कुठलीही चप्पल, छत्री किंवा दप्तर फक्त शोभेसाठीच आहे हे मम्मी मला पटवुन देउन ’उपयोगी’ आणि ’टिकावु’ वस्तु घेउन यायची. मग घरी आल्यावर धुसफ़ुस कारण शाळेतल्या ’चांगल्या’ मुली मला नावे ठेवतील ही चिंता!

आता शाळा/कॉलेज संपले. आता ह्या ’Back To School' मधे जाउन मी एखादे नवीन प्रकारचे पेन मिळतेय का पहाते . किंवा Back To School Drive साठी जाऊन एखाद्या गरजु मुलीसाठी सगळी खरेदी अगदी मनसोक्त करुन येते. ती खरेदी अगदी माझ्याचसाठी आहे इतक्या तन्मयतेने फ़िरुन ती खरेदी करुन माझ्या शाळेच्या खरेदीची आठवण ताजी करुन येते.

4 comments:

Samved said...

डिट्टो...तरी यात नवनितची गाईड आणि विकासच्या व्यवसाय्माला राहिल्याच की.
कसली मजा होती नाही तेव्हा? आता न मागताच सगळं मिळत त्यामुळे पोरं या गंमतीना मुकताहेत

deepanjali said...

तुमचा हा ब्लोगही छान वाटला.
तुमचे बेळगावचे आणि शाळेचे अनुभव वाचुन.
मलाही नव्याने सारं आठवलं अनेक आठवणी जाग्या झाल्या.
तुम्ही तुमचा हा ब्लोग ही ब्लोग अड्डा मध्ये का नाही घालत.
जेणेकरुन जर नविन काही आपण लिहिलेत,
तर ते आम्हा छोट्या वाचंकापर्यतं लगेच पोहोचेल.
लिहीत रहा .
धन्यवाद !

Vaidehi Bhave said...

अगं खुप मस्त लिहिलयंस...अगदी शाळेतले दिवस आठवले :)

प्रिया said...

:) kittee aaThavaNee jaagyaa kelyaas! weL chhaan satkaaraNee laavtiyes tar! Get well soon...