Sunday, October 02, 2011

आठवणींचे नवरात्र




आम्ही लहान असताना नवरात्र म्हणजे दांडिया हे समीकरण नव्हते. नवरात्र म्हणजे भोंडला, खिरापत, शारदोत्सव हेच आम्हाला माहिती होते. थंडी नुकतीच सुरु झालेली असायची त्यामुळे दिवस लहान झाल्यामुळे संध्याकाळी ६.३० लाच अंधार वाटायचा. शाळा सुटली की धावत पळत घरी यायचे कारण सगळ्यांच्या घरचे भोंडले असायचे. संपूर्ण कॉलनीमधे साधारण २०-२५ घरांमधे तरी जायचे असायचे त्यामुळे घरी आल्या आल्या दप्तरे टाकायची आणि भोंडल्याला पळायचे. सगळ्या मुली छान छान ड्रेस घालून येत. कुणाकडे पहिला भोंडला हे पण ठरलेले असायचे. आदल्या दिवशी पाटाच्या मागच्या बाजुला हत्तीचे चित्र काढून ठेवलेले असायचे. माझ्या मम्मीने काढलेला हत्ती फार मस्त असायचा त्यामुळे आमच्या आजुबाजुच्या काही घरांमधल्या पाटांवर मम्मीने काढलेलाच हत्ती असायचा. असे हत्ती काढलेले पाट अंगणात मधे मांडायचे. फुलं-पत्री वगैरे वाहून भोंडल्याला सुरुवात व्हायची. एकमेकींच्या हातात हात घालून पाटाभोवती फेर धरायच्या. संथ सुरात एका लयीत गाणी सुरु व्हायची -


ऐलमा पैलमा गणेशदेवा
माझा खेळ मांडून दे करी न तुझी सेवा ...


पहिल्या दिवशी एकच गाणे म्हणायचे ही आम्हाला शिक्षा वाटायची ... शुरु होतेही खतम हो गया? असे काहीसे. मग खिरापत ओळखण्याचा मज्जेचा कार्यक्रम! त्याची सुरुवात नेहेमी श्रीबालाजीचि सासू अशी होई.


श्री - श्रीखंड
बा - बासुंदी
ला - लाडू
जी - जीलेबी
चि - चिवडा
सा - साखर
सु - सुधारस


आता भोंडल्यासाठी सुधारस कोण कशाला करेल असली अक्कल कुणाला नव्हतीच मुळी! बरेचदा ५-६ प्रयत्नांमधे जे काही केलेले असेल ते ओळखले जाई. तर कधीतरी पोहे, उप्पिट वगैरे पासून सुरु झालेली गाडी पुर्‍या, केककडे पण वळायची. अजून बरीच घरं फिरायची असल्याने आम्ही हारलो अशी सपशेल कबूली देऊन आम्ही मिळालेला प्रसाद खात खात पुढल्या घरी रवाना होत असू. पाठीमागे सगळे आवरून ठेवायचे काम घरचेच कोणीतरी करत असे. सगळ्या घरचा भोंडला करून घरी येईतोवर शाळेचा अभ्यास वगैरे काही आठवतही नसे. काही वर्षी दुसरी घटक चाचणी त्याच दरम्यान असे, पण नेहेमी सहामाही परीक्षा तोंडावर आल्याने घरी येऊन पटापटा हातपाय धुवुन अभ्यासाला बसायची घाई असायची. खिरापती खाऊन पोटं भरलेली असत. अभ्यास खुप असेल तर मग घरचा ओरडा थोडाफार खावा लागत असेच.

शविवार-रविवारचे भोंडले खुपच रंगत असत. लवकर सुरुवात केली जाई.  सगळी गाणी सुरात काहीवेळेस तारस्वरात देखील म्हणली जात. भोंडला संपल्यावर मग आम्ही एखाद्या मैत्रिणीच्या दारात घोळका करून बसायचो. नविन वेगळी गाणी कोणाला माहिती आहेत का? याची थोडी चाचपणी होई. प्रत्येकीला आपल्या घरचा भोंडला सर्वात सुंदर व्हावा असे वाटे. प्रत्येकीलाच आपली खिरापत कुण्णाकुण्णाला ओळखू येऊ नये असे वाटे. आठव्या नवव्या दिवशी सगळ्या घरांमधे येवढी गाणी म्हणून यायला उशीर होणारच हे माहिती असेल तर आम्ही काहीजणी ४-५ भोंडले झाले की परत जायचो. मग दुसरे दिवशी खिरापतीत काय काय होते यावर शेवटपर्यंत थांबलेल्या आणि न थांबलेल्या मुली यांच्यात एक मोठा परीसंवाद घडे. त्यातले फलित 'तुम्ही नव्हतात तिथे किती मस्त खिरापत होती आणि कित्तीतरी दिली' येवढाच असे! अशावेळी घरच्यांचा राग यायचा पण त्यांच्या मनाविरुद्ध काही करायची टाप नव्हती.


हे १० दिवस म्हणजे शारदीय नवरात्राचे. आमची मुलींची शाळा असल्याने हे नवरात्र आमच्या शाळेत दरवर्षी साजरे होई. आधी आठ दिवस वर्गात कृष्णा, नाना वगैरे शिपाई सूचना वही घेऊन येई. मग कोणत्या दिवशी शारदोत्सव असणार, कोणकोणते कार्यक्रम होणार याची रुपरेषा वर्गातल्या बाई सांगत. शाळेला सुट्टी असली तरी समुहगीत, भाषण, निबंध, हस्ताक्षर इत्यादी स्पर्धा असत. तसेच एखादे दिवशी लिंबू-चमचा, तीन पायांची शर्यत, पोत्यात पाय घालून पळणे, स्लो सायकलींग अशा पण स्पर्धा असत. एके वर्षीतर पुष्परचना स्पर्धा अर्थात फ्लॉवर अ‍ॅरेंजमेंट स्पर्धा पण ठेवल्या होत्या! तिथे मुलींनी ओळखीच्या कुणाकडूनतरी रचना करून आणून नंबर मिळवलेले लक्षात आल्याने ही स्पर्धा बंद केली. शाळेतला हा उत्सव ३ दिवसांचाच असे. आमच्या शाळेत पहिल्या मजल्यावर फक्त ४ वर्ग, शिवणहॉल आणि ऑफिसेस येवढेच होते. त्यामुळे ५वी ब च्या वर्गातले बाक दुसरीकडे हलवून तिथे शारदेची मोठी मुर्ती बसवली जाई. पांढर्‍या रंगाची साडी नेसलेली शारदा, गळ्यात फुलांचा हार, कडेला तेवत असलेल्या समया, अगदी मोजकीच पण एकदम साधीशी आरास असे. आमच्या चित्रकलेच्या बाई आणि सर मिळून समोर सुंदर रांगोळी काढत. त्या वर्गात जायला मुलींना परवानगी नसे. बहेरूनच दर्शन घ्यायचे असा नियम होता. तीनही दिवसाचे वेळापत्रक आधी कळलेले असे. सुट्टी असली तरी शाळेत हजेरी घेतली जाई. त्यामुळ शाळा बुडवलेली चालायची नाही. इतरवेळी शाळेत जायला कुरकुरणार्‍या आम्ही शारदोत्सवात मात्र हसत हसत जायचो. अगदी आजारपणदेखील या ३-४ दिवसांमधे येऊ नये असंच वाटायचं. साधारण सकाळी ८ ते १२ कार्यक्रम झाले की दिवसभर सुट्टीच! मोठ्या वर्गांमधे मात्र शिक्षक-शिक्षिका भरभरून अभ्यास देत तेव्हा मात्र राग यायचा. 
तिसर्‍या दिवशी शारदोत्सवाच्या हळदी कुंकवाचे सगळ्यांना निमंत्रण असे. प्रत्येकजण तयार होऊन, ठेवणीतले कपडे घालून आईबरोबर शाळेत जायचो. दारात आमचे मुख्याध्यापक सगळ्यांचे स्वागत करायला उभे असत. सगळे शिक्षक कडेला गप्पा मारत बसलेले असयाचे कारण त्याव्यतिरिक्त त्यांना करण्यासारखे काहीही नसे. आत गेल्यावर एकदम नटून थटून आलेल्या शाळेच्या शिक्षिका दिसत. मस्त भरजरी साड्या नेसलेल्या, काही नथ, तन्मणी वगैरे घातलेल्या, काही मोजकेच सोन्याचे दागिने घातलेल्या बाई काही वेगळ्याच दिसत. आमच्या शाळेला मोठा एक हॉल होता तिथे हे हळदीकुंकु असायचे. सतरंजी अंथरलेली असायची त्यावर जाऊन बसले की एखाद्या बाई येऊन हळदी-कुंकु, अत्तर, गुलाबपाणी, पान सुपारी आणि एखादी बर्फी असे द्यायच्या. माझी मम्मी त्याच शाळेत शिकलेली होती त्यामुळे तिच्यापण काही शिक्षिका मला होत्या. तिच्या एक-दोन वर्गमैत्रिणी पुढे आमच्याच शाळेत शिक्षिका म्हणून लागल्या होत्या. मम्मीला त्यातले कोणीही भेटू नये असे मला अगदी मनापासून वाटे. 'अगं तू इतकी शांत होतीस, तुझी मुलगी किती बोलते!', 'अगं तिला येतं ग सगळं पण खूप आळशीपणा करते!' किंवा 'तिच्याकडून जरा स्पेलिंग वगैरे नीट पाठ करून घे गं!' अशा काय काय तक्रारी केल्या जायच्या. घरी येईपर्यंत मम्मीची बोलणी खायला लागायची. याला अपवाद एखादाच! ९-१०वी मधे गेल्यावर आम्हा सगळ्या मुलींना 'टिनेजरी' शिंगं फुटायची. मग मुद्दाम एकदम टुकार कपडे घालून कार्यक्रमांना जाणे, कोणत्याही स्पर्धांमधे भाग न घेणे, जितका म्हणून स्नॉबिशपणा करता येईल तेवढा करत असू. ११वीत मात्र आम्ही शाळेतला शारदोत्सव नाही हे जाणवून किती चुकल्यासारखं वाटलं होतं! 

शाळा-कॉलेजच्या संपूर्ण आयुष्यात मी फक्त एकदा गरब्यासाठी गेले होते ते देखील माझ्या एका गुजराती वर्गमैत्रिणीमुळे तिच्या घरच्यांच्या बरोबर. आमच्या गावात गुजराती-मारवाडी समाज भरपूर. ते लोक एखादे मंगल कार्यालय भाड्याने घेऊन तिथे गरबा खेळत. दांडीया होता की नव्हता ते देखील आता मला आठवत नाही. तिथे २-३ तास नाचून रात्री ११ वाजता घरी येताना दुखलेले पाय याव्यतिरिक्त मला त्यातले काहीही आठवत नाही.


याच नऊ दिवसांमधे आम्ही कोयनेकाठच्या दैत्यनिवारीणी देवीच्या दर्शनाला जायचो. तिथे भली मोठी रांग असायची. खेळणी-फुगे-गाड्या वगैरेंचे स्टॉल, भेळेच्या गाड्या वगैरे असायचे. अगदी जत्राच दुसरी! मंदिराच्या कडेने कोयना नदीकडे जायला पायर्‍या होत्या. तो रस्ता बरेचदा बंदच केलेला असे. सगळ्याजणींनी एकत्र घोळक्याने जाऊन घोळक्याने येणे आणि सोबतीला गप्पा! आजुबाजुच्या बायका एकमेकींच्या सोबतीने जात कारण ५-६ किलोमिटर अंतर चालून जायचे असे. टांगे, रिक्षा असल्यातरी सगळ्यांना परवडण्यासारख्या नसत आणि त्या भागात बसची सोय नव्हतीच. आजीकडे घट बसवलेला असे. ज्या दिवशी दैत्यनिवारिणीला जाऊ त्याच दिवशी आज्जीकडे जाऊन यायचो. परात, त्यातला नारळ आणि कडेच्या मातीत उगवलेले धान्य, घटाला चढत्या क्रमाने वाहिलेले कारळ्याच्या फुलांचे हार आणि सोबत असलेला नंदादीप यामुळे आज्जीचे देवघर खुप प्रसन्न दिसे. गव्हाच्या लोंब्या वगैरे वर टांगलेल्या असत. आज्जी आठव्या दिवशी कडाकण्या करायची. गोल, चक्र, वेणी, फणी असे बरेच तळलेले प्रकार करून ते घटावर बांधायचे. दसरा झाला की ते खायला मिळत काही काही गोष्टी घटाबरोबर विसर्जन होत असत.


खंडेनवमीला शस्त्रास्त्रे, पुस्तके, वगैरेंची पूजा जवळपास प्रत्येक घरी सारखीच. एखादे शस्त्र कमी-अधिक येवढेच. पहिली ते चौथीत असताना दसर्‍यादिवशी शाळेत पाटीपूजन असायचे. पाटीवर १ आकड्याची सरस्वती, ती पण कडेने मस्त नक्षी वगैरे काढून ती आम्ही रंगवायचो. सकाळी फुलं, गुळखोबरे, पाटी आणि एक पुस्तक घेऊन शालेत जायचे. तिथे वर्गात बसून प्रार्थना म्हणायची. ते झाल्यावर 'या कुन्देन्दु तुषार हार धवला...' ही प्रार्थना म्हणायची. गुळखोबरे खाऊन घरी यायचे. सायकली-गाड्यां धुवून पुसून एकदम लक्ख करायच्या. त्यांची पूजा करून हार घालायचे. घराला तोरण, दारात मोठी रंगीत रांगोळी असा थाट असे. गोडाधोडाचे जेवण झाले की संध्याकाळच्या सोनं लुटायला जाण्याचे वेध लागत. आम्ही मैत्रिणी अगदी दूरदूरपर्यंत शाळेतल्या बाईंना वगैरे जाऊन सोने देऊन त्यांचा अशिर्वाद घेऊन यायचो. घरात-दारात-रस्त्यात पडलेल्या सुकलेल्या आपट्यांच्या पानांचा सडा संपलेले नवरात्र अधोरेखित करायचा.


देशाबाहेर आले, गणपती-दिवाळी हे सण अगदी आवर्जून साजरे होतात. नववर्ष म्हणून गुढीपाडवा देखील साजरा होतो. पण दसर्‍याच्या दहा दिवसांचा तो सोहळा मात्र आता नाही. खंडेनवमीला लक्षात आले तर पुस्तक-शस्त्र पूजा आणि दसर्‍यादिवशी लक्षात असेल तर गाड्यांची पूजा यात नवरात्र 'साजरं' होतं. पूर्वीच्या आठवणी मनात फेर धरतात आणि भोंडला सुरु होतो -


अक्कणमाती चिक्कणमाती,
अश्शी माती सुरेख बाई खड्डा तो खणावा
अस्सा खड्डा सुरेख बाई जातं ते रोवावं
अस्सं जातं सुरेख बाई पिठी ती दळावी
अश्शी पिठी सुरेख बाई करंज्या कराव्या
अश्श्या करंज्या सुरेख बाई तबकी ठेवाव्यात
अस्सं तबक सुरेख बाई शेल्याने झाकावं
अस्सा शेला सुरेख बाई पालखी ठेवावा
अश्शी पालखी सुरेख बाई माहेरी धाडावी
अस्सं माहेर सुरेख बाई खायाला मिळतं
अस्सं सासर द्वाड बाई कोंडोनी मारतं
अस्सं आजोळ गोड बाई खेळाया मिळतं ...

Thursday, September 08, 2011

किंचीत चाकोरीबाहेरचे ...




साधारण वर्षभरापूर्वीची गोष्ट आहे. रश्मी नुकतीच भारतात रेणूताईंना भेटून आलेली होती. एखाद्याच्या कर्तुत्वाने भारावून जाणे म्हणजे काय असते त्याची प्रचिती मला तिच्या बोलण्यातून येत होती. साधारण त्याच दरम्यान आमचे अजून एका मैत्रिणीशी लहान मुलांच्या एखाद्या संस्थेला आपण मदत करू शकतो का यासंदर्भात चर्चा चालू होती. त्या मैत्रिणीशी बोलताना ती स्वत: कोणकोणत्या पद्धतीने चॅरिटीना मदत करते ते ऐकुन आपणही काहीतरी करू शकतो हे जाणवले. ती जेव्हा जमेल तेव्हा छोटा-मोठा फूड स्टॉल ठरवून, तिथे पदार्थ विकून  आलेले पैसे एखाद्या चॅरिटीला देते. आम्हाला दोघींनाही ही पद्धत आवडली. पण फूडस्टॉल ठेवायचा तर कुठे, कसा याचा विचार चालू असतानाच आमच्या घरी महाराष्ट्र मंडाळाच्या गणपतीच्या संदर्भात चर्चा चालू झालेल्या होत्या. त्यामुळे अनायसे त्यांनाच पहिले विचारू असे आम्ही ठरवले. महाराष्ट्र मंडळाने आमच्या अपेक्षेपेक्षा लवकर होकारार्थी प्रतिसाद दिला. आता मोठी परीक्षा होती कारण पदार्थ कोणते ठेवायचे, किती ठेवायचे यावर चर्चा करणे यासाठी खूप वेळ उरला नव्हता. पण एकदा फोनवर बोलून आणि एकदा भेटून सगळे ठरवले. अजून २-३ मैत्रिणींना मदतीला यायला आवडेल का विचारले. त्यांची इच्छा असूनही त्यांना मदत करणे शक्य  नव्हते कारण आमची चूक होती, आम्ही अगदी शेवटच्या क्षणाला त्यांना विचारले होते. पण पुढीलवर्षी नक्की मदत करू असे मात्र खात्रीने त्यांनी आम्हाला  सांगितले. तरीही मैत्रिणी अगदी त्यादिवशी मदत करायला येणार का विचारल्याबरोबर हजर झाले होते.  आम्ही दाबेली, कटलेट्स आणि चॉकलेट कपकेक्स बनवले होते. सकाळी ८ पासून रात्री ८ पर्यंत आम्ही दाबेली बनवत होतो. संपूर्ण दिवस उभे राहून थकलो तरी आपण काहीतरी वेगळे केले याचे समाधान मिळाले. 

गेल्या वर्षीच्या स्टॉलला भरभरून प्रतिसाद मिळाल्यामुळे आम्ही यावर्षीपण स्टॉल ठेवायचा विचार केला. पण यावर्षी सगळ्या मैत्रिणींना आणि मित्रांना मदत करणार का म्हणून आधी विचारले. कारण गेल्या वर्षी नाही म्हणाले तरी आम्हा दोघींना खूप दगदग झालेली होतीच. त्यातून यावर्षी ऑफिसमधे कामाचा बोजा जास्त होता त्यामुळे अगदी त्या दिवसापर्यंत आपल्याला कितपत काय काय करायला जमेल याची खात्री वाटत नव्हती. सगळ्या मित्रमैत्रिणींनी अगदी आनंदाने सहभागी होऊ याची ग्वाही दिली. परत एकदा महाराष्ट्र मंडळाने सहकार्य करून आम्हाला यावर्षीच्या गणेशोत्सवात स्टॉल ठेवायला परवानगी दिली. आम्ही गेल्या वर्षीच्या अनुभवामुळे दाबेली आणि कपकेक्स करायचेच असे ठरवले होते. पण कटलेट्स न करता अजून काय करता येईल असा विचार करताना साबुदाणा खिचडी यावर आम्हा सर्वांचे एकमत झाले. दोन दिवसांनी मंडळाकडे चौकशी केल्यावर दुसरा एक स्टॉलधारक साबुदाणा खिचडी करणार आहे असे कळल्याने आम्हाला तो विचार रद्द करून अगदी २-३ दिवस आधी मेनूमधे बदल करावा लागला. सर्वानुमते पाणीपूरी करायची असे ठरले. कोणकोण काय काय करणार याचे वाटप झाले. कोण किती वाजता स्टॉलवर हजर रहाणार याचे गणित आखले. आणि आम्ही सगळेजण तयारीला लागलो. आधी २ दिवस सगळ्यांकडे गणपती असल्याने ऐनवेळी कोणाला काही मदत लागू शकते याची थोडी चाचपणी झाली. पण सगळे हे सर्व करायला उत्सुक होतेच त्यामुळे मी आले/आलो नाही तर माझ्याऐवजी कोण येऊ शकेल याची प्रत्येकाने मनाशीच तयारी केलेली होती. एका मित्राने चमचे, डिशेस, सुट्टे पैसे, टेबलक्लॉथ असे सगळे आणायची जबाबदारी घेतली. तसेच सकाळ्पासून शेवटपर्यंत स्टॉलवरच थांबेन अशी ग्वाही दिली. एका मैत्रिणीने पाणीपूरीच्या पुर्‍या एकेठिकाणी जाऊन आणायची जबाबदारी घेतली. त्यांना आम्ही कशासाठी स्टॉल करतोय हे सांगितल्याने मनापासून न मागता संपूर्ण खरेदीमधे २०% सूट दिली. दोघी मैत्रिणींनी सगळ्या चटण्या, पाणीपूरीसाठी लागणारे मूग, रगडा इत्यादी करण्याची संपूर्ण जबाबदारी घेतली. दोघी जणींनी सगळे कपकेक्स केले. आम्ही दोघींनी दाबेलीचे सारण केले. एकीने कांदा, द्राक्षे, कोथिंबीर चिरणे, मसाला दाणे बनवणे ही जबाबदारी घेतली. आम्ही दाबेली सारण करणार्‍यांनीच ब्रेडची जबाबदारी घ्यायची होती ती देखील कपकेक्स करणार्‍या एका मैत्रिणीने घेतली. रात्री अगदी ठरवल्यासारखे सगळ्यांनी एकदम फेसबूकचे स्टॅटस बदलले. अशाप्रकारे ऐनवेळी कोणतीही फोनाफोनी न होता आपापली तयारी करून आम्ही दुसर्‍या दिवशीची वाट पहात झोपून गेलो. 

सकाळी ८ ला स्टॉलवर हजर रहायचे होते. आम्ही इतर सगळी तयारी केली तरी स्टॉलवर लावायला दरपत्रक वगैरे माहिती काहीही प्रिंट केली नव्हती. सकाळी एकीने रंगित मार्कर्स पाठवले आणि एकजण कागद घेऊन आली. एका मित्राने स्टॉल सेट झाल्याझाल्या लगेचच सुंदर हस्ताक्षरात सगळे दरपत्रक लिहीले. आम्ही स्टॉल का करतोय ते लिहुन भिंतीवर लावले. आता आम्ही पहिल्या गिरहाईकाची वाट पहात सज्ज होतो. आम्ही स्टॉल लावत होतो तेव्हा मंडळाच्या गणपतीची पूजा चालू होती. अथर्वशिर्षाचे पारायण संपले आणि आम्ही पहिल्या गिर्‍हाईकासाठी दाबेली करायला सज्ज झालो. आमचेच एक मित्र एक दाबेली, २ कपकेक्स घेऊन, एक पाणीपूरी खाऊन आम्हाला काळजी करू नका, सगळे एकदम झक्कास होईल असे सांगून गेले. सकाळी सकाळी लहान मुलांना पाणीपूरी खायची होती आणि आईबाबा नको म्हणताहेत असे एक गंमतशीर दृश्य आम्ही वारंबार पाहिले.. पण 'दुपारी नक्की देतो' हे आश्वासन मिळाल्याशवाय ३-४ लहान मुले जागेवरून हलली नाहीत. सकाळी शंभरएक गिर्हाईके येऊन गेल्यावर सकाळची फळी विश्रांतीसाठी घरी गेली आणि दुसरी ताज्या दमाची फळी स्टॉलवर येऊन हजर झाली. अधुन मधुन स्टॉलवर नक्की काय चाल्लय ते फेसबुकावर अपडेट टाकणे चाललेच होते. मला सर्व एकदम रात्री घरी गेल्यावरच पहायला मिळाले. दुपारी थोडे शांत झाल्यावर पसारा थोडा आवरला, स्वत:च्या जेवणाची सोय केली. मग सगळे गप्पा मारत गिर्‍हाईकांच्या पुढच्या लाटेची वाट पहात बसून राहीलो. दुपारी परत १०० एक दाबेल्या १०० पाणीपूरी प्लेट्स असा व्यवस्थित खप झाल्यावर आम्ही साधारण रात्री ८.३० ला आता संपले असे सगळे सांगून थोडावेळ थांबलो. सगळे सामान नीट गोळा केले. सगळ्यांचे सामान नीट आले का पाहिले. आणि रात्री ९.३० ला आम्ही सगळ्यांनी एकमेकांचा निरोप घेतला. सगळ्यांनी जाताना एकदम सुखद अनुभव आला हे आवर्जून सांगितले. दोन दिवस कोणाचे फोन, इमेल काही आले नाही. पण सगळ्यानी फेसबूक स्टॅटस अपडेट केले. मंगळवारी सगळ्यांच्या इमेल्स आल्या आणि प्रत्येकाने 'पुढच्या वेळी आपण हे असे करू ...' अशा स्टाईलची वाक्ये टाकली होती. यावर्षीचा अनुभवही आम्हाला अत्यंत आनंद देऊन गेला.

आपण आपल्या आनंदासाठी खूपच गोष्टी करतो पण आपल्या आनंदातून अजूनही कोणाला तरी आनंद मिळवून देऊ शकतो हे आम्हाला आता पुरेपूर पटले आहे. पुढच्यावर्षी ही परंपरा कायम ठेवण्याची सुबुद्धी गणपती बाप्पा आम्हां सर्वांना देवो हीच त्या श्रीचरणी प्रार्थना! सगळ्यांच्या घरच्यांनी आम्हां ला संपूर्णपणे पाठिंबा दिला, आमचे धैर्य वाढवले. त्यांच्या मदतीशिवाय आम्ही हे सर्व तडीस नेऊ शकलो नसतो.  आम्हांला प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे मदत करणार्‍या सगळ्या हितचिंतकांचे आभार, तुमच्या सहकार्याशिवाय आम्ही हे यशस्वीपणे पार पडणे कठीण होते. तुम्हां सर्वांना आमच्या  संपूर्ण टीमकडून धन्यवाद.
|| मंगलमूर्ती मोरया || 
|| गणपती बाप्पा मोरया || 

(गणपती बाप्पांचा एवढा सुंदर फोटो वापरायला परवानगी दिल्याबद्दल अभिजीत धर्माधिकारी यांचे आभार.)

Wednesday, April 28, 2010

नाटक करायचे नाटक ...

आज बर्‍याच दिवसानी मराठीमधे काहीतरी लिहायचा योग आला. ते लिखाण इथे आहे -

Monday, February 23, 2009

सिंधुताई सपकाळ अर्थात माईंशी अनौपचारिक गप्पा

सिंधुताई सपकाळ यांच्याबरोबर अनौपचारीक गप्पा मारण्याची संधी गेल्या आठवड्यात मिळाली त्यातील काही भाग मयबोलीवर लिहिला आहे -

http://www.maayboli.com/node/5987

Sunday, February 22, 2009

केळीच्या बागा

Kelicha bag
पहिलीला असताना आम्हाला 'केळीच्या बागा मामाच्या' ही कविता होती. मस्त घड लगडलेल्या केळीच्या झाडाचे एक चित्र होते त्या कवितेशेजारी. ती कविता आणि ते चित्र माझ्या इतकी वर्षे झाली तरी मनात घर करुन राहिलेय. आमच्या मामांच्या परसात अगदी केळीच्या बागा म्हणण्या इतकी नसली तरी बरीच झाडे होती. आता केळीच्या झाडाला झाड म्हणायचे की नाही हा मुद्दा वेगळा! आज्जी, मामा आणि आम्ही एकाच गावात रहात असल्याने अजोळी जाउन रहायचे सुख खुप कमी. पण आज्जीकडे जाउन जेवणे वगैरे नेहेमीचेच त्यातल्या त्यात मी अगदी लहान असताना तरी जास्तीच. घरी खुप मामा शिकणारे, दुकान चालवणारे त्यामुळे भांडी पण खुप पडायची घासायला तशात भांडीवाली टिकणे मुश्किलिचे. या सगळ्यामुळे असेल मला आज्जीकडचे लहानपणी जेवलेले जे आठवतेय ते केळीच्या पानावरचेच. घरातलीच पाने असायची त्यामुळे कधीही काढली जायची. शक्यतो वार्याने वगैरे फाटलेली पाने पहिल्यांदा काढली जायची. केळीचे पान किंवा कोणताही भाग कापला की चिक गळतो आणि त्या चिकाचा डाग एकदा कपड्यांना लागला की कपडा फाटेल पण डाग जाणार नाही. त्यामुळे मामा लोकांना आज्जी सतत बजावुन सांगायची. केळीच्या झाडाचा परिचय हा असा. त्यामुळे केळीच्या पानात जेवणे म्हणजे आजोळची आठवण हे समिकरण बरेच दिवस होते. पुढे काही कारणांमुळे आजोळी जाणे एकदम बंदच झाले, केळीच्या पानांवर जेवणे फक्त मनातच राहिली.


माझा भाऊ लहानपणी बरेचदा अजारी असायचा. त्याच्या पथ्यासाठी आमच्याकडे केळी, पेरू, बोरे, चिंचा असले प्रकार कधी घरी आले नाहीत. मम्मी-पप्पांनी एक ठरवले होते की जे काही करु ते दोघांचे सारखेच. त्यामुळे त्याला चालत नाही म्हणुन मग मलादेखील नाही. मी कधीतरी हट्ट केलाच असेल तरीपण त्यांनी कधी मानले नाही आणि मला त्याचे पुढे काही वाटेनासे पण झाले. तया सगळ्यामुळे झाले काय तर लहान असताना शिकरण चपातीचे जेवण असल्याचे आठवतच नाही त्याऐवजी गुळ तूप पोळी, तूप साखर पोळी असे बरेचदा असे.दरम्यान आमचे स्वतःचे घर बांधुन झाले. मग घराभोवती कोणती झाडे लावायची असा विचार चालु असताना आमचा वॉचमन पलिकडच्या शेतातुन १-२ केळीचे अगदी बारके कोंब घेउन आला. ते जगतील अशी काही त्यांची परिस्थिती नव्हती पण असुदे लावुन पाहुयात असे ठरवुन जमिनीत रोवले. घरच्या धुण्या भांड्याचे पाणी, शेतातली काळी माती यामुळे असेल १५ दिवसात तेच कोंब मस्त तरारले आणि बघता बघता मोठे देखील झाले. केळीच्या झाडाचे एक असते की एक झाड नीट जगले की त्यालाच शेजारी शेजारी झाडे येत रहातात. त्यामुळे एकदा केळीचे एखादे रोप लावले आणि ते नीट वाढले तर शक्यतो घरातले केळिचे झाड हटत नाही. आमच्या केळीला पहिला घड धरला तेव्हाचा आनंद अजुन आठवतो. घड धरुन लहान लहान फण्या लागल्या. एकेदिवशी आम्ही शाळेला गेलो असताना मम्मीने लहान कोका काढुन आणला तेव्हा आम्ही केलेला गोंधळही आठवतोय. कशाला काढला, आपल्याला अजुन केळी मिळाली असती की वगैरे वगैरे. मम्मीने नीट कारणे सांगुन व्यवस्थित पटवुन दिले होते की हे करणे कसे चांगले आहे.

Kelphul

केळ अशी परत आमच्या आयुष्यात आली. घरच्या केळफुलाची भाजी करताना मम्मीने मला केळफूल कसे सोलावे, कसे ताकाच्या पाण्यात घालुन त्याचा काळेपणा कसा घालवता येतो वगैरे वगैरे. त्यावेळी मम्मीचा खुप राग यायचा कशाला हे सगळे माहिती पाहिजे म्हणुन. पण त्यावेळी तिने ब-याच गोष्टी दाखवल्यामुळे, सांगितल्यामुळे आज कधी अडचण पडत नाही. पुढे घरच्या केळीचा घड काढताना केळ पण कापावी लागते हे कळले. तेव्हा अक्खे झाड काढायचे म्हणुन खुप वाईट वाटलेले. पण मामा, मम्मीचे म्हणणे की त्या केळीच्या झाडाला परत घड येत नाही यामुळे ते काढावेच लागते. तेव्हा पण वाईट वाटले होते. येवढे झाड वाया जाणार म्हणुन. पण तेव्हाच लक्षात आले केळीचे झाड अज्जिबात वाया जात नाही. पाने जेवायला वापरतात. बुंध्याचे सोप काढुन भाज्याच्या पेंड्या बांधायला वापरतात. काही काही बायका केळ पाडल्यावर त्यातुन जो पांढरा चिक गळतो तो पापडाचे पीठ भिजवायला वापरतात. उरलेले झाड गाई-म्हशी वगैरे जनावरे संपवुन टाकतात. घड काढुन आणल्यावर तो थोडावेळ बहेर ठेवायचा कारण त्याचा चिक पडुन फरश्या खराब होतील म्हणुन. पुढे केळी पिकुन पोटात जाईपर्यंत रोज तो घड एकदा सकाळी उठल्या उठल्या आणि शाळेतुन परत आल्यावर पहायचा. वेलची केळी असल्यामुळे रंग आणि चव दोन्ही अप्रतीम होती. एवढी झाडे असुनही केळीच्या पानावरील जेवणे मनातच राहिली. पुढे दर आठवड्याला एक घड या हिशोबाने केळी मिळत तरीदेखील कंटाळा आला नाही कधी. निम्मा घड कोणाकोणाला देण्यात तर निम्मा घड घरी अशी वाटणी असल्याने कधी कंटाळा आला नाही.

Pangat

अलिकडे भुसावळ-जळगावला जायचा योग आला. तेव्हा केळीच्या बागेचे फोटो काढायचे अगदी ठरवुन गेले होते. त्यामुळे तिथे गेल्या गेल्या सगळ्यांच्या मागे तीच भुणभुण लावली होती. आणि त्याचवेळी घरच्या भांडीवालीने दांडी दिल्यामुळे घरी केळीची पाने जेवायला आणली गेली. मग मला आवडते म्हणुन मग नाष्टा, जेवणे सगळेच केळीच्या पानावर मिळु लागले. अगदी पुरणपोळी, साबुदाणा खिचडी पासुन ते शेतात केलेल्या पिकनीकचे जेवण देखील केळीच्या पानावर जेवण. केळीच्या पानावर अगदी मनसोक्त जेवले ब-याच वर्षांनी. केळीच्या बागेचे, केळीच्या घडाचे, कोक्याचे(केळफुलाचे) फोटो काढले.येवढेच नव्हे तर कच्च्या केळ्याची भाजी, केळफुलाची भाजी, कच्च्या केळ्याचे वेफर्स, कच्च्या केळीच्या पिठाचे थालीपीठ असले सगळे प्रकार खायला देखील मिळाले.

Saturday, January 24, 2009

खानदेशातली पंगत

लग्नातल्या पंगती हा एक महाराष्ट्रातला अगदी नवलाचा प्रकार. पश्चिम महाराष्ट्रातल्या खेडेगावातली शाक-भाताची पंगत, जरा मोठ्या गावातली मसालेभात, मठ्ठा, जिलेबी किंवा लाडवाची पंगत, पुण्याकडची श्रिखंड, पुरी-बटाट्याच्या भाजीची पंगत अशा अनेक प्रकाराच्या पंगतीची वर्णने आपण ऐकतो. कधीकाळी आपल्यापैकी ब-याच लोकानी हा प्रकार पाहिलेला/अनुभवलेला देखील असेल. आपल्या बहिणाबाईंच्या खानदेशातली पंगत देखील अशीच एक साधी गावातली पंगत. त्या पंगतीचे हे वर्णन -



(तळटीप - ही चित्रफीत एका छोट्या गेट-टुगेदर मधे बनवलेली आहे. त्यामुळे लहान मुलांचा दंगा वगैरे आहे)

Sunday, September 28, 2008

बागेतला फेरफटका

शनिवारी रविवारी कधी नव्हे ते थोडा वेळ मिळाला बागेत चक्कर टाकायला. आमच्या रोझमेरीला आलेली फुले त्यावरच्या मधमाश्या, तुळशीच्या झाडाला आलेल्या मंजि-या, लॅव्हेंडरची जांभळी फुले, टोमॅटोची वाढती झाडे, काकडीच्या वेलावरचे लेडी बग्ज, आळुच्या बारक्याश्या पानांवरचे दवबिंदु ही निसर्गचित्रे पहायला मिळाली. माझ्या तोकड्या फोटोग्राफीच्या बळावर काढलेले हे फोटो.















Thursday, September 11, 2008

हायकू

कविता हा माझा प्रांत नोहे. पण परवा सुमेधाचा ब्लॉग आमच्या 'ह्यांना' दाखवत होते तिथे साखळी हायकुचे पोस्ट वाचले. त्याने त्याचवेळी थोडावेळ डोके चालवुन हे कागदावर उतरवले त्याला पण आता ८-१० दिवस होऊन गेले. मला ब्लॉगवर टाकायला आज सवड(?) मिळाली.

क्षितिजावर सोनेरी रंग कुंभ उधळिला
पुष्पोदरी भृन्ग विसावला

~ सं.पा.

Wednesday, September 03, 2008

मंगलमुर्ती मोरया!

वक्रतुंड महाकाय सुर्यकोटी समप्रभ|
निर्विघ्नं कुरुमे देवं शुभकार्येशु सर्वदा||

Hand Painted Ganesh

मला गणपतीच्या मुर्ती, फोटो जमवायचे अतोनात वेड होते. सध्या काही दिवस ते थोडे थांबवले आहे. ही तीन चित्रे पुण्याच्या एका मुलाने काढलेली आहेत. मला आवडतात म्हणुन माझ्या एका मैत्रिणीने माझ्यासाठी आणली. कडेच्या फ्रेम मला हव्या असलेल्या रंगाच्या न मिळाल्यामुळे मी साध्या फ्रेम्स आणुन रंगवल्या आहेत. आज घरी गणापती बसले. त्यामुळे सकाळी लवकर उठुन पुजा केली दोघानी. मग नैवेद्य बनवुन ऑफिसचे काम केले. रात्री दोन मित्रआरतीला आणि जेवायला होते. अगदी देशातल्या गणपती उत्सवासरखे वाटले मला तरी.

घरच्या गणपतीचे फोटो इथे टाकावे वाटत नाही म्हणुन मग माझ्या आवडीच्या या तीन चित्रांचा फोटो आज गणपती निमित्ताने देतेय. सोबत मोदक आणि तुपाची वाटी. माझ्या अज्जीकडे मोदकाचा आकार असा असतो. आम्ही याला फुलपाखराचे मोदक म्हणतो. सकाळी मोदक करताना आज्जीची खुप आठवण झाली म्हणुन मग तिच्या प्रकारचे मोदक केले.

Modak va toop

Wednesday, August 27, 2008

आवडलेले थोडे काही ...

संवेदचा कवितांचा खो एकदा धाडसाने(!) परतवुन लावला तर गिरीने दिलाच. माझे कवितांचे वाकडे अजिबात नाही. साध्या सोप्या कवीता कळतात देखील. पण कवितांची भीती का आणि कशी बसली माहिती नाही. तरी आवडलेल्या दोन(च) कवीता इथे देतेय. त्याआधी संवेदने लिहिलेले नियम परत डकवते इथे -

१. कविता आवडते पण पुर्ण आठवत नाही आणि हाताशी पुस्तकही नाही? हरकत नाही, आठवतं तेव्हढं लिहा. कवीचं नाव मात्र आवश्य लिहा

२. एक से मेरा क्या होगा सिन्ड्रोम? या वेळी तुम्ही तुमच्या सध्या आवडणारया टॉप २ कविता लिहु शकता आणि कवितांच्या प्रमाणात खो देखील देऊ शकता. जेव्हढ्या कविता तेव्हढे खो (जास्तीजास्त अर्थात २)

३. खो खो नीट चालवण्याची जबाबदारी अर्थात सारयांचीच. त्यामुळे तुमच्या पोस्ट मधे तुम्ही ज्या/जिला खो देताय, त्या/तीचं नाव तर लिहाच, शिवाय त्या/तिच्या ब्लॉगवर ही खो दिल्याची नोंद आवश्य करा

४. कविता का आवडली किंवा कवितेचा अर्थ किंवा काहीच स्पष्टीकरण आपेक्षित नाही

५. अजून नियम नाहीत :)

१. गवतफुला -

रंग रंगुल्या सान सानुल्या गवत फुला रे गवत फुला
असा कसा रे मला लागला सांग तुझारे तुझा लळा
मित्रांसंगे माळावरती पतंग उडवीत फिरताना
तुला पाहीले गवतावरती डुलता डुलता झुलताना
विसरुन गेलो पतंग नभीच अन विसरुनी गेलो मित्रांना
पाहुन तुजला हरखुन गेलो अशा तुझ्या रे रंगकळा
हिरवी नाजुक रेशिम पाती दोन बाजुला सळसळती
नीळ निळुली एक पाकळी पराग पिवळे झगमगती
तळी पुन्हा अन गोजिरवाणी लाल पाकळी खुलती रे
उन्हा मधे हे रंग पहाता भान हरपुनी गेले रे
पहाटवेळी अभाळ येते लहान होउनी तुझ्याहुनी
निळ्या करानी तुला तुला भरविते दवमोत्यांची कणीकणी
वारा घेऊन रूप सानुले खेळ खेळतो झोपाळा
रात्रही इवली होउन म्हणते अंगाईचे गीत तुला

मलाही वाटते लहान लहान होऊनी तुझ्याहुनही लहान रे
तुझ्या संगती सदा रहावे विसरुनी शाळा घर सारे
तुझी गोजीरी शिकुन भाषा गोष्टी तुजला सांगाव्या
तुझे शिकावे खेळ आणखी जादू तुजला शिकवाव्या
आभाळाशी हट्ट करावा खाऊ खावा तुझ्यासवे
तुझे घालुनी रंगीत कपडे फुलापाखरा फसवावे
रंग रंगुल्या सान सानुल्या गवत फुला रे गवत फुला
असा कसा रे मला लागला सांग तुझारे तुझा लळा

~ शांता शेळके.

२. नको नको रे पावसा -

नको नको रे पावसा असा धिंगाणा अवेळी
घर माझे चंद्रमौळी आणि दारात सायली ॥

नको नाचू तडातडा असा कौलारावरून
तांबे, सतेली, पातेली आणू भांडी मी कुठून ॥

नको करू झोंबाझोंबी माझी नाजूक वेलण
नको टाकू फूलमाळ अशी मातीत लोटून ॥

आडदांडा नको येऊ झेपावत दारातून
माझं नेसूचं जुनेरं नको टाकू भिजवून ॥

किती सोसले मी तुझे माझे एवढे ऐक ना
वाटेवरी माझा सखा त्याला माघारी आण ना ॥

वेशीपुढे आठ कोस जा रे आडवा धावत
विजेबाई कडाडून मागे फिरव पांतस्थ ॥

आणि पावसा, राजसा, नीट आण सांभाळून
घाल कितीही धिंगाणा मग मुळी न बोलेन ॥

पितळ्याची लोटीवाटी तुझ्यासाठी मी मांडीन
माझ्या सख्याच्या डोळ्यांत तुझ्या विजेला पूजीन ॥


-- इंदिरा संत


माझा खो स्वाती अंबोळे आणि उपासला ...

(दो से मेरा क्या होगा! हा सिंड्रोम मला होईल असे अजिबात वाटले नव्हते. पण झाले तेव्हा प्रचंड आनंद झाला!)

Sunday, June 08, 2008

Why Raw?

मागच्या एका पोस्टमधे मी Raw Food खात होते असा उल्लेख होता. त्यावर ब-याच लोकानी प्रश्न विचारले होते. त्याला उत्तरे द्यायचा हा छोटासा प्रयत्न. ही मझी स्वत:ची मते आहे. तुम्हाला स्वत:वर यातले काहीही प्रयोग करायचे असल्यास स्वत:च्या जबाबदारीवर आपल्या डॉक्टरच्या सल्ल्याने करावेत. Mints याबाबतीत कशासही जबाबदार नाही.

मी David Wolfe या raw Foodist च्या सेमिनार ला गेले होते. त्याची यामागची भूमिका बरीचशी अशी आहे -

१. शाकाहार हाच मानवाचा मूळ आहार आहे. मानवाचे दात, सुळे, दाढा मांस भक्षणासाठी तयार झालेल्या नाहीत. तसेच शरिरात तयार होणारे पचनरस हे शाकाहारासाठी योग्य असेच तयार होतात. शाकाहार याचा अर्थ प्राणीजन्य पदार्थ जसे दूध, दूधापासुन तयार होणारे पदार्थ, मध, मासे, कोणत्याही प्रकारचे मांस हे शरीरास कोणतेही जीवनावश्यक घटक पुरवत नाही. Calcium, Vitamin D वगैरे घातलेले दूध बाजारात मिळते आणि ते शरीराला कसे चांगले आहे याचा बराच प्रचारही केलेला आढळतो. तसेच या प्राण्यांचे दूध आणि मांसासाठी जे वेगवेगळ्या पद्धतीने torture केले जाते तो भागही किती un-humane आहे हे आपण संगीताच्या ब्लॉगमधे वाचले आहेच.

२. पदार्थ घेताना शक्यतो organic घ्यावेत. किटकनाशके, जंतुनाशके, अनेक प्रकारची रासायनीक खते वापरल्यामुळे पालेभाज्या, फळभाज्या, वेगवेगळ्या प्रकारची फळे यामधले बरेचसे जीवनावश्यक घटक नष्ट होतात. त्यामुळे शरीरास आवश्यक असणारी जीवनसत्वे मिळत नाहीत.

३. आधीच असा किटकनाशकांनी भरलेला, खतांवर वाढलेला भाजीपाला पुढे शिजवला तर त्यातली शिल्लक राहीलेली जीवनसत्वे नष्ट होतात. त्यामुळे आपण जे अन्न खातो त्याचा शरीरला पोषणाच्या द्रुष्टीने काहीही उपयोग होत नाही.

४. ११५ डिग्री फॅरेनहाईट्च्यापुढे तापवलेले अन्न हे शिजवलेले अन्न समजले जाते. या तापमानापर्यन्त कच्च्या पदार्थामधील घटकद्रव्ये टिकून रहातात.

५. कोणत्याही प्रकारचे तेल जर 'Expeller Process' ने काढले असेल तर त्यामधले जीवनसत्व टिकून रहाते. व्यावसायीक जे तेल काढले जाते ते 'solvent based extraction या पद्धतीने काढले जाते. या पद्धतीमधे बरीच हानिकारक द्रव्ये तेलामधे मिसळली जातात. त्यामुळे तेल दुकानामध्ये अनेक दिवस राहिले तरी खराब होत नाही. पण त्यामधे मिसळलेल्या अनेक प्रकारच्या stabilizers आणि solvents मुळे शरिराला अपाय होऊ शकतो.

६. या सर्व कारणांमुळे नैसर्गीकरित्या वाळवलेले पदार्थ जसे फळांच्या काप, वेगवेगळ्या तैलबीया खाणे हे शरिरासाठी अत्यंत पोषक समजले जाते.

७. बाजारात ज्याप्रकारचे चॉकलेट व कॉफी मिळते ती भाजलेली असल्यामुळे त्यातले उपयोगी घटकपदार्थ नष्ट झालेले असतात. त्यावर त्यात लोणी साखर मिसळल्यामुळे त्याच्यामुळे होणारी शरिराची हानी ही अनेकपटीनी अधीक असते.

८. मका, गहु, सोयाबीन हे धान्य पिकवताना खूप प्रकारची खते, किटकनाशके वापरली जातात. तसेच कापणी केल्यावर ते धान्य अधीक काळ टिकावे याकरिताही त्यावर वेगवेगळ्या प्रकारचे प्रोसेसींग होते. त्यामुळे या प्रकारच्या धान्यापासून बनवलेल्या पदार्थांमुळे शरिराला हानी पोहोचते.

यापुढेही जाऊन शरीरासाठी आवश्यक असणारे Calcium आम्ही कसे आणि मिळवायचे हा प्रश्न येतोच. त्यासाठी David Wolfe यांच्याकडून मिळालेले उत्तर याप्रमाणे - 'ब-याच पालेभाज्यांमधे आणि बदाम, आक्रोड यामधे शरीराला आवश्यक तेवढे calcium मिळते. वरून मिसळलेले calcium शरीरातून बाहेर टाकले जाते. त्यामुळे दूधामुळे शरीराला calcium मिळते हा समज चुकीचा आहे. '


याबद्दल जेवढे लिहावे तेवढे कमीच आहे. माझा याबद्दलचा अभ्यासही अतिशय तोकडा आहे. अधीक माहितीसाठी खालील पुस्तके वाचावीत -
Sunfood Diet Success System

The Raw Transformation: Energizing Your Life with Living Foods

Eating For Beauty

तुम्हाला जर कच्चे पदार्थ खायला सुरुवात करायची असेल तर प्रथम प्राणीजन्य पदार्थ खाणे बंद करावे. साखर, गूळ यासारखे पदार्थ बंद करावेत. त्यानन्तर शिजवलेले अन्न कमीकमी करत जाऊन कच्च्या पदार्थांचे जेवणातले प्रमाण वाढवत जावे. १००% बदल पहिल्यदिवशी करण्यापेक्षा हळुहळू केलेला बदल दीर्घकालीन यश देणारा असतो.

माझ्या Raw Recipes इथे मिळतील -
Mints' Raw Recipes

मी खालील पुस्तके रेसीपीसाठी वापरते -
Raw: The Uncook Book: New Vegetarian Food for Life
Raw

Monday, April 14, 2008

रात्र थोडी आणि सोंगे फार ...

काल माझ्या एकुणच स्वभावाचा, रोजच्या दिनक्रमाचा कामाचा वगैरे आढावा घेत होते. आणि मुख्य जाणवलेली गोष्ट म्हणजे प्रत्येक नवीन दिसणार्या कामात रस घेणे हा मला असलेला अवगुण! हो अवगुणाच!

भरतकाम करायची आवड म्हणुन मग एक मोठे काम हातात घेतलेय ते आठवड्यातुन एकदा-दोनदा हातात घेउन बसते. वाचनाची आवड आहे म्हणुन मग एक इंग्लिश, एक मराठी अशी किमान २ पुस्तके माझ्या टेबलवर सापडतील. स्वयंपाकाची आवड म्हणुन मग त्याचे फोटो, अर्ध्या आधिक लिहिलेल्या रेसिपीज लॅपटॉपवर सेव्ह केलेल्या. आठवड्यातुन किमान एकदा तरी कुंभारकाम करुन आणलेली भांडी! घर सजवायचे म्हणुन कोणते पेंटींग करायचे वगैरे ठरवत आणलेले थोडेफ़ार सामान. बागकाम सुरु केलेले आहे म्हणुन मग वेगवेगळ्या बिया, कंद, कुणाकुणाकडुन आणुन लावलेल्या कसल्या कसल्या फांद्या, वेगवेगळ्या प्रकारच्या कुंड्या वापरायच्या म्हणुन सुरु केलेल्या शोधानी भरलेले बुकमार्क्स. कुठल्या कुठल्या नाटकाच्या/ नाचाच्या कार्यक्रमाना तोंडे रंगवायला मदत करायला जाउन संपून जात आसलेले वीकेंड्स. आवडते म्हणुन पुस्तकाच्या दुकाना/ग्रंथालयाना भेटी देउन आणलेली पुस्तके नीट वर्गवरी करायची म्हणुन आणलेले शेल्फ. ब्लॉग वाचुन त्यावर लिहिलेल्या कॉमेंटस. फोतोग्राफीची आवड म्हणुन जमवलेले सामान.

रोजचे ऑफिसचे आणि घरचे काम वेगळेच!

अता वाटतेय की थोडे bead work शिकले पाहीजे. त्याच्वेळेला असेही वाटते की आपण कुठेतरी बहेर्गावी जाऊन सुट्ट्यांचा आनंद पण मिळवला पाहीजे! या सगळ्याला कुठेतरी वेळ मिळाला पाहीजे. ठोडक्यात काय माझे सध्या रात्र थोडी सोंगे फ़ार असेच चालु आहे.

त्याच्वेळेला हे कुठेतरी थांबवले पाहीजे हे देखील पटते. पण काय कमी करावे ते समजत नाही. त्यामुळे सध्या माझा फ़ूड ब्लॉग आणि भरत्काम व कुंभार्काम या गोष्टी सोडुन सगळ्या छंदाना थोडे दिवस विश्रांती देणार आहे. हा संकल्प कमीत कमी ६ महिने तरी पाळायचा विचार आहे. आता बघु कुठवर जमते ते.

Friday, November 09, 2007

रेशमाच्या रेघानी ...

रेशमाच्या रेघानी हा माझा लेख मायबोली दिवाळी अंक 2007 मधे प्रकाशित झाला.

Thursday, October 04, 2007

जे जे उत्तम ...

नंदनने लिहायला चालु केले आणि आगावुपणाने लग्गेच सांगितले की टॅग का चालु करत नाही? मला अजीबात वाटले नव्हते की तो मनावर घेईल ;) पण तो नंदन आहे हे विसरले! आज स्वाती परत टॅग केले आणि अजुन लोकानी आठवण करुन द्यायच्या आत लिहावे म्हणुन बसले आणि आवडणारी सगळी पुस्तके समोर काढली आणि हे लिहु का ते असे काहीसे झाले.
नंदन ने हा उपक्रम सुरु करण्यासाठी ’पुस्तक वाचताना, अनेकदा काही परिच्छेद आवडतात. संपूर्ण पुस्तकाचा विचार केला तर ते कदाचित तितके महत्त्वाचे नसतीलही; पण त्या त्या वेळेला ते आवडून जातात. असेच काही आवडलेले उतारे, कुठल्याही भाष्याशिवाय देण्याचा हा एक उपक्रम. अर्थात मागचा-पुढचा संदर्भ जरी नसला, तरी तो तितका उतारा वाचनीय वाटावा इतपत उद्धृत करण्याचा प्रयत्न करेन.’ असे साधे सोपे समीकरण देउनही ते आता कठीण वाटतेय :)


माझ्या अत्यंत आवडत्या उता-यांपैकी खालील एक उतारा -
धबधब्याजवळ पोचल्यावर अम्हाला काय करावं आणि काय नाही तेच समजेना इतका आनंद झाला होता. कोण पाणी उडवायला लागला कोण पाण्यात पळायला लागला. टुकण्या पाण्यातच बसुन राहीला. त्याने शर्ट काढुन टाकला होता. कणब्या रंगीत दगड गोळा करत होता. मुली फुले गोळा करत होत्या. मास्तरांनी कोट, टोपी काढुन धोतराचा काचा मारला होता. ते धबधब्यांच्या रांगेत उभे राहुन हसत होते. त्यांच्या डोक्यावरचे काळे कुरळे केस आम्ही पहिल्यांदाच पाहीले. टोपी आणि कोट नसलेले, हसणारे मास्तर आम्हाला आमच्यासारखेच वाटायला लागले. जोरात पाऊस आला तेव्हा ते देवळाकडं पळाले नाहीत. आमच्याबरोबरच भिजत राहिले. मग वेलंगीबाईही धबधब्यांच्या रांगेत येउन उभ्या राहिल्या आणि त्याही हसायला लागल्या. सगळीकडं हिरवंगार होतं. आणि सगळीकडं भरुन राहीलेला वासही हिरव्याच रंगाचा असावा, असं वाटत होतं.

पायाखालुन आणि वरुन वाहाणारं पाणी गुदगुल्या करुन पुढं जात होतं. इकडं तिकडं पळणारी मुलंमुली हळूहळू त्या धबधब्याच्या समोरच आली. आपोआपच आमची एक साखळी तयार झाली. लोखंडीसाखळीसारखी नाही, तर रंगीबेरंगी, वेगळ्या वेगळ्या हसणा-या बोलणा-या आवाजांची साखळी. आम्ही वेगवेगळी मुलं नव्हतोच, तर आम्ही सगळी एकच आहोत, असं मॅड्सारखं वाटत होतं. वाहाणा-या पाण्याच्या विरुद्ध दिशेनं एकमेकांच्या हातात हात घालुन आम्ही कुठतरी निघालो आहोत, असं वाटत होतं. मधेच मॅड्सारखं पिवळंधमक ऊन पडलं. कुठं कुठं भरुन राहीलेलं पाणी अंगठीतल्या खड्यासार्खं चमकायला लागलं. माझ्या डाव्या हातात कुणाचा तरी हात होता. तो थोडासा टोचणारा हात जाउन नवाच कोणता तरी हात आला होता. न पहाताच असं वाटत होतं की हा हात ओळखीचा आहे. मी डावीकडं पाहिलं तर शेजारी सुमी उभी होती. तिनं माझा हात घट्ट पकडला होता. ती माझ्याकडं पाहुन हसत होती. पाण्याचे कितीतरी बारीक थेंब तिच्या केसांत अडकुन राहीले होते. ती माझ्या डोळ्यातच पहात होती. त्या हिरव्या रंगाच्या वासातूनही सुमीच्या केसांतील सोनटक्क्याच्या फुलांचा वास येत होता. खरं तर त्या सर्व हसण्याला आणि ओरडण्याला सोनटक्क्याच्या फुलांचा वासच असावा, असं वाटत होतं. माझ्या डोक्यात असला कही गोंधळ चालू असताना सुमी म्हणाली,
"किती छान आहे ना?"
मी मान हलवली.

-----------
साखळी, ’वनवास’ - प्रकाश नारायण संत

आता मी खालील लोकाना टॅग करते -
संवेद
सुमेधा
प्रियंभाषीणी
कृष्णाकाठ
परागकण

मी शक्यतो अत्तापर्यंत ज्यांना टॅग केले गेले नाही असे लोक शोधायचा प्रयत्न केलाय.

(P.S. सुमेधा आणि संवेद या दोघाना अजुन कोणीतरी तग केल्याचे दिसले. म्हणुन बदलते आहे. नवीन टॅग खालीलप्रमाणे -
शोनू
गायत्री)

Friday, September 14, 2007

गणपती बप्पा मोरया!

गणपतीची तयारी कशी चालु आहे? फुले, दुर्वा, मणीवस्त्र, फुलवाती, साध्या वाती, तेल, तुप, कापुर, निरांजन, आरतीचे पुस्तक (!), प्रसाद, हार सगळी तयारी झाली का? काय? मणीवस्त्र म्हणजे काय? कसे करायचे माहीती नाही. अरेच्चा एवढेच होय१ सोप्पे आहे की ते! येथे टिचकी मरा . अगदी स्टेप बाय स्टेप दिलेय मी.

मग करा बघु बप्पासाठी मणीवस्त्र तयार.

Sunday, September 09, 2007

आई मला शाळेत जाऊ दे ...

सध्या इथे नुकतेच शाळा/कॉलेजेस सुरु झाली आहेत किंवा होत आहेत. सगळ्या दुकानांमधुन Back To School सेल चालु आहेत. निरनिराळ्या प्रकारचे पेन, रंग, वह्या, दप्तरे पाहिले की मला माझी शाळा सुरु होतानाची लगबग आठवते. सगळ्यांनाच होत असेल.
मी जवळपास तीन वर्षांची असल्यापासुन बालवाडीत जात होते कारण आजुबाजुची मुले शाळेत जातात तर मग मी का घरी बसायचे हा हट्ट. मग पप्पा शाळेत जाताना एका लहान बालवाडीत मला सोडुन पुढे कॉलेजला जायचे. ४ वर्षांची असताना बाराखडी, अंक वगैरे सगळे नीट येत होते म्हणुन मग मम्मी पप्पांना वाटले की मी पहील्या इयत्तेसाठी तयार आहे म्हणुन मग मला शाळेत घेऊन गेले. पण वय कमी असल्याने मुख्याध्यापकांनी मला शाळेत दाखल करुन घ्यायला नकार दिला. त्यावेळी मला त्या शाळेत घेत नाहीत म्हणुन पसरलेले भोकाड मला अजुनही आठवते आणि आजुबाजुची जनता अवाक! कारण शाळेत जाताना रडलेली जनता खुप असते आणि शाळेत घेत नाहीत म्हणुन रडणारे आमच्यासारखे शुरवीर खुपच कमी.

शाळेसाठीची खरेदी हा एक त्याकाळी सोहळाच असे कारण सगळ्या गोष्टी अगदी नेहेमीच मिळायच्या असे नाही दप्तरे फ़क्त मे, जुन, जुलै महीन्यातच मिळायची मधे अधे कधी दप्तर फ़ाटले तर तेच दुरुस्त करुन वापरण्याशिवाय गत्यंतर नसायचे. शाळेसाठी नवीन पाटी मिळणार का? ह्यावर्षी तरी मी मम्मीला मोठी झालीय असे वाटुन पेन्सिलच्या ऐवजी पेन मिळणार का? आणि पेन शाईचे न मिळता बॉलपेन मिळेल का असले बालसुलभ प्रश्न कायम खरेदीच्यावेळी डोक्यात. कारण घरात कितीही ’तु म्हणशील ते घेऊ’ असे म्हणलेले मम्मी पप्पा पाटील आणि कंपनी किंवा भालचंद्र स्टोअर्स किंवा रमेश स्टोअर्स मधे गेले की त्यांना जे आवश्यक वाटेल तेच घेउन यायचे आणि मग घरी आल्यावरचे मुसमुसणे, चिडचिड मग त्यावरचे रागावणे अगदी ठरलेले!
अशातच मग तिसरीच्या खरेदीच्या वेळी न मागता मिळालेला चांदीच्या रंगिबेरंगी कागदात गुंडाळलेल्या पाटीवरच्या पेन्सिलीचा अक्खा पुडा किंवा चौथीच्या खरेदीच्या वेळी न मागता मिळालेला कॅमलीनचा संपुर्ण कंपास असे मस्त धक्केही मिळायचे. असे मिळालेले धक्के ही अगदी मग न चुकता दरवर्षी मिळत गेले. कधी मस्त कार्टून्स असलेली ६ इंची पट्टी असेल किंवा मग ०.५ ची मेकॅनिकल पेन्सील असेल किंवा मग १२ रंगांच्या ट्युबचा सेट असेल. पण ते त्यावेळी कधी जाणवायचे नाहीच. आता आठवत रहाते की त्यावेळी शाळेसाठी उपयोगाचे पण जरा महागाचे, सर्वांकडे सहजी नसेल असे काहीतरी नक्की घेतले जायचे.

नविन पुस्तके, वह्या हा तर नवीन शाळेचा अविभाज्य भाग. पप्पा मनापासुन सगळ्या पुस्तकांना कव्हर्स घालुन द्यायचे. पुढे त्यांनी मलाच शिकवल्याने मी पण त्यांच्याच तन्मयतेने ते काम करायचे. आजदेखील मी देशातुन येताना जी पुस्तके आणते त्यांना पप्पा कव्हर्स घालुन देतात! त्यानंतर त्यावर आपल्या ’सुवाच्य’ अक्षरात नाव घालायचे आणि मग शाळेत गेल्यावर सगळ्यांच्या वह्यांवर आई/बाबा/मामा/काका/मोठे बहीण/भाऊ यांनी घातलेली नावे पाहीली की झालेली चिडचीडही आठवते. मला वहीच्या पहील्या पानावर नावाव्यतीरीक्त काही लिहिलेले आवडायचे नाही. आणि शक्यतो शेवटच्या पानावरही गिरगिटु नये असेही वाटायचे. साधारण ९ वी किंवा १० वी मधे असताना माझ्या डोक्यात एक कल्पना आली ती म्हणजे नावाच्या पानावर एक चित्र काढुन ते रंगवायचे. ते पण काम मग मी शाळा सुरु होण्याआधी पूर्ण करत असे. दरवर्षी एक वेगळी थीम घेउन! शेवटच्या पानावरच्या गिरगटण्यावर उपाय नाही सापडला कधी ...

पावसाळी चप्पल आणि छत्री किंवा रेनकोट घेण ही पण एक शाळा सुरु होतानाचीच खरेदी. तसेच नवीन युनिफॉर्म्सची खरेदी पण हा एक आनंदसोहळाच! केस लहान असल्याने रिबीन्स वगैरे घेणे हा भाग नसे. तसेच नविन दप्तर हेही एक प्रकरण असे. मला आवडलेली कुठलीही चप्पल, छत्री किंवा दप्तर फक्त शोभेसाठीच आहे हे मम्मी मला पटवुन देउन ’उपयोगी’ आणि ’टिकावु’ वस्तु घेउन यायची. मग घरी आल्यावर धुसफ़ुस कारण शाळेतल्या ’चांगल्या’ मुली मला नावे ठेवतील ही चिंता!

आता शाळा/कॉलेज संपले. आता ह्या ’Back To School' मधे जाउन मी एखादे नवीन प्रकारचे पेन मिळतेय का पहाते . किंवा Back To School Drive साठी जाऊन एखाद्या गरजु मुलीसाठी सगळी खरेदी अगदी मनसोक्त करुन येते. ती खरेदी अगदी माझ्याचसाठी आहे इतक्या तन्मयतेने फ़िरुन ती खरेदी करुन माझ्या शाळेच्या खरेदीची आठवण ताजी करुन येते.

Thursday, September 06, 2007

बेळगाव की बोळगाव

आज प्रकाश संत यांचे ’पंखा’ वाचत होते खुप दिवसानी. त्यातली भाषा, जागांचे उल्लेख सगळे आहेत ते बेळगावचे. बेळगावशी पहीला संबंध कधी आला माहीत नाही. मला आठवतेय तसे गिरिशकाकांच्या लग्नाला की रिसेप्शनला पहिल्यांदा बेळगावला गेलेले ते आठवते. हे सगळे असले तरी बेळगावचा पहीला ऐकीव उल्लेख आठवतो तो म्हणजे रावसाहेब! पु. ल. नी बेळगावच्या भाषेची एवढी सुंदर नक्कल केलीय की बास. पण ते गाव मनापासुन घर करुन राहीले ते मात्र दोन कारणांसाठी - एक म्हणजे आमचे हरिमंदिर आणि दुसरे म्हणजे आज्जीचे घर. हरिमंदिराविषयी मी पामर काय लिहिणार. तिथे मिळालेली शांती जगात मला अजुन कोठेही अनुभवता आलेली नाही.

आज्जी म्हणजे माझ्या वडीलांची मावशी. बहीण गेल्यावरही तितक्याच आपुलकीने आमच्या सगळ्यांचे लाड करणारी आज्जी. मला आज्जी म्हणले आठवणा~या ४ आज्जीपैकी एक. माझे आजोळ कराडच. त्यामुळे आजोळी जाणे वगैरे अप्रुप आम्हाला कधी चाखायला मिळालेच नाही. त्यातुनही अजोळी बरेच तिढे पडल्याने आज्जी, अजोबा आणि एक मामा यांच्याशिवाय कोणी प्रेमाचे वाटु नये अशी परीस्थीती. त्याच न कळत्या वयात आत्या आणि काकांच्या लग्नासाठी म्हणुन बेळगावला रहायला गेले होते. घरात आम्ही १०-१२ चुलत भावंडांची पलटण होती. त्यात मी सगळ्यात मोठी! त्यावेळी आम्हा भावंडांचे एकमेकांशी नक्की काय नाते आहे हे सांगणेही जमत नसे. टि. व्ही. नव्हता त्यामुळे सतत कसला ना कसला तरी खेळ खेळत आमचा दंगा चालायचा. आजोबांचा होलसेलचा मोठा व्यावार होता आणि त्याचे ऑफीस घरात असल्याने त्याची पण वर्दळ सतत असायची. मराठीची वेगळी ढब आधीपासुन माहीत होती पण तिथे राहिल्यावर आमच्याही भाषेत झालेला फ़रक कधी जाणवला नाही. ’आत्ता हेच जेवुन सोडलो बघा.’ असली वाक्ये ऐकुन हसणारे आम्ही २ दिवसात नकळत पणे तसेच बोलायला लागलेलो. घरात राचोटीअज्जा म्हणुन एक स्वयंपाकी होते खुप वयस्कर. ते अजुशी वगैरे कधीतरी इंग्लिशमधे बोलायचे. ऐकुन मजा वाटायची. घरात निम्मे लोक मराठी आणि निम्मे कानडी त्यामुळे सहज दोन्ही भाषा कळायला लागलेल्या. सकाळी अज्जारी दुकानात जाईपर्यंत जरा घरात शांतता कारण निम्मी पलटण उठलेली नसायची. कधीतरी लवकर उठुन अज्जारींच्याबरोबर दुध घ्यायची वेळ आली की ततपप होणार हे नक्की कारण ते नक्की कुठले तरी मराठी वाक्य ऐकवुन हे म्हणजे काय ते सांग असले काहीकाही सांगत! बेळगावमधे राहुनही आज्जी आणि अज्जारी मराठी नेहेमी वाचत त्याचे त्यावेळी आश्चर्य वाटायचे.
समादेवी गल्ली, मारुती गल्ली, गोंधळी गल्ली, रेडीओ टॉकीज, सन्मान, बिस्कीट महादेव, मिलिटरी महादेव, कित्तुर चन्नम्माचा पुतळा, बाळेकुंद्री ही सगळी ठिकाणे तिथे राहील्याने माहीत झाले. लाल मातीने पांढ~या फॉकचे जे काही नमुने झालेले ते बघुन मम्मी जवळपास बेशुध्दच पडायची राहीलेली. बेळगावला खाल्लेली ओल्या काजुची उसळ, आलेपाक अवल्लक्की, कुंदा अजुनही आठवत रहातो. प्लांचेट हा प्रकार तिथे पहिल्यांदा पाहीला. प्रचंड भीती वाटलेली तेही नीट आठवते.
तिथुन पुढे एक वर्षाआड का होईना बेळ्गावला जात आले आणि ते गाव तिथली माणसे, भाषा यांच्या परत नव्याने प्रेमात पडत आले. त्याच दरम्यान कधीतरी पुलंची रावसाहेबची कॅसेट घरी आणलेली. त्याची पारायणे करताना बेळगावची मिठास सतत वाढत राहीली. परवा डिसेंबरमधे बेळगावला जाउन आले बराच फ़रक झालेला जाणवला. आज्जी अजोबा दोघेही थकले. आज्जारींची पुर्वीइतकी भीती पण वाटत नाही पण आदर मात्र पुर्वीपेक्षा दुपटीने वाढलाय. त्यांच्या कर्तुत्वाचा मोठेपणा आता जास्ती भावतो. चुलत भाऊ बहिणी आता खुप मोठे झालेत तरी तेच प्रेम तीच आपुलकी अजुनची आहे. गाव बदलले बोळही आता राहीले नाहीत पण मातीचा रंग, हवा अज्जिबात बदललेला नाही. अजुनही आज्जी बाजारात तेवढ्याच उत्साहाने जाते पण आता धाकटी चुलत बहीण तिच्या सोबत असते.

गाव बदलत जाईलच, माझे जाणे जसे जमेल तसे जेव्हा जमेल तेव्हा ह्या प्रकारात जाईल पण प्रकाश संतांची पुस्तके आणि पुलंचे रावसहेब मला मी पाहीलेल्या बेळगावची आठवण नक्की करुन देतील.

Wednesday, August 29, 2007

श्रद्धा की अवडंबर?

गेल्यावर्षी भारतात गेले होते त्यावेळी प्रकर्षाने जाणवलेली एक गोष्ट म्हणजे देवळांची वाढणारी संख्या, खुप वेगवेगळ्या महाराजांची नावे, व्याख्याने वगैरेंच्या जाहीराती. प्रत्येक गल्लीत असलेली गणपती मंडळे प्रत्येकाचे वेगळे ऑफीस! अचानक हा बदल कधी झाला? इतके वेगवेगळे साधु अचानक कुठुन आणि कधी आले? त्यांना स्वत:च्या प्राचाराची आवश्यकता का वाटायला लागली. हे सगळे नक्की बदलले कधी.

लोकमान्य टिळकांनी ज्या कारणासाठी गणेशोत्सव चालु केला होता त्याच कारणाने अजुनही चालु ठेवावा असे मला अज्जीबात वाटत नाही पण त्याला आलेले प्रचारकी म्हणा किंवा बाजारु जे स्वरुप आहे ते कोठेतरी खटकते. गल्लोगल्ली असलेली गणेश मंडळे आहेत ती नक्की काय कामे करतात? त्या गल्लीतला गुंडच त्याचा प्रमुख असतो बरेचवेळा. हट्टाने देणग्या ’घेतल्या’ जातात. मोठे मोठे स्पिकर्स आणुन ढणढण गाणी लावायची आणि त्यावर नाचायचे. शेजारी पाजारी वृद्ध लोक असतील लहान बाळे असतील त्याचा काहीही विचारच नाही. ह्या सगळ्यात आपण गणपतीची पुजा करतो म्हणजे काय करतो, कशासाठी करतो ह्याचा सारासार विचार तरी केला जातो की नाही माहीत नाही. ह्या मंडळांचे जे कोणी कार्यकर्ते असतात त्यांना नोक~या, शाळा, कॉलेजेस वगैरे तरी असतात की नाही हे तो गणपतीबप्पाच जाणे!

एकुणच सगळ्याला खुप बाजारु स्वरुप आलेय. सगळ्या नवीन ’साधु-संताना’ आपल्या प्रवचनांच्या पानपान भरुन जाहीराती कराव्या लागतात. कित्येकांच्या अंगावर प्रचंड दागदागीने, भरजरी साड्या वगैरे दिसतात. पुर्वीचे संत तुकाराम महाराज, ज्ञानेश्वर महाराज, अक्कलकोट महाराज, वगैरे जे होऊन गेले त्यांचा साधेपणा हाच त्यांचा दागीना वाटायचा. हे कधी आणि कसे बदलले? खरोखर विचार करायला लावणारी गोष्ट आहे. कित्येक रुपये खर्च करुन लोक तिरुपतीला जातात तिथे ताटकळत उभे रहातात अक्षरशः १ मिनीटापुरते दर्शन मिळते त्यासाठी इतका अट्टाहास का? जी गोष्ट बालाजीची तिच गोष्ट कोल्हापुरच्या अंबाबाईची. गेले ३-४ वर्षे मी कोल्हापुरला जाऊन देवळात गेले नाहीये का? तर इतकी गर्दी आणि चो~या मा~या हेच नित्याचे. लोक खरोखर अचानक इतके देवभक्त झाले का? कळत नाही. गेल्यावर्षी तिरुपतीप्रमाणे पंढरपूरला देखील पैसे देवुन लगेच दर्शन मिळण्याची वेगळी रांग चालु केली होती अजुनही आहे की नाही माहीती नाही. पण वारीबरोबर येणारे भक्तगण तिष्ठत त्या सावळ्या विठुरायाच्या दर्शनासाठी उन्हा-पावसाचे ताटकळत उभे असताना कोणी धनवंत फक्त धनाच्याच बळावर स्वत:च्या गाडीतुन येउन दर्शन घेउन जाणार हे चित्र प्रचंड संतापदाय़ी आहे.

माझा देवावर विश्वास आहे. तोच माझा पाठीराखा आहे ह्याबद्दल माझी खात्री देखील आहे. पण त्याचे हे असले अवडंबर झालेले मनाला पटतच नाही. हे कुठेतरी बदलले पाहीजे. बदलण्यासाठी एखाद्या लोकमान्यांची, फुले, अंबेडकरांचीच आज आपल्या समाजाला गरज आहे.

(ही माझी वैयक्तीक मते आहेत त्याचा कृपया अन्य गोष्टीशी संबंध लावु नये ही विनंती)

Tuesday, August 28, 2007

ऐलतीर-पैलतीर

दोन आठवड्यापुर्वी मिशन पीक ला जाण्याचा पराक्रम केला आणि येताना उतारावर दगडांवरुन पाय सटकुन पडले इतके की ९११ ल फोन करुन त्यांच्या मदतीने राहीलेले अंतर खाली यावे लागले. ते पडणे इतके मोठे निघाले की आता पायाला ६ आठवडे प्लास्टर घालुन बसणे एवढाच उपाय होता. तर सध्या अस्मादीक कुबड्या घेउन कसे चालावे ह्याचे प्रशिक्षण घेत आहेत!

घरी (म्हणजे देशात) रोजचे फोन चालु आहेत. इथे मला मदतीला कोणी नाही म्हणुन घरचे हळहळताहेत आणि त्यांची आठवण येउन माझ्या डोळ्यातले पाणी ओसरत नाहीये. इथे रहाताना घरच्यांची आठवण न होता दिवस पुढे सरकत नाहीत
आणि तिथे गेले की इथल्या काळज्या मनातुन जात नाहीत. एकुण हे द्वंद्व प्रत्येक परदेशस्थ भारतीयाच्या मनात चालु असते. तिकडुन मदतीला लगेचच कोणी येउ शकेल ही परीस्थीती नाहीये. इथल्या मैत्रीणी आपापल्या भागादौडीने थकलेल्या! मला येउन मदत करण्याची त्यांची कितीही इच्छा असेल तरीही ते शक्य होत नाही. ह्या सगळ्या परीस्थीतीमधे ’आपण भारतात असतो तर’ हा विचार उचल खातो. देशात असते तर घरुन कोणीही निश्चीत आले असते मदतीला हे नक्कीच कारण पासपोर्ट, व्हीसा, थंडी, भाषा असल्या गोष्टीचा त्रास नसता झाला. आले मनात की तिकीट काढुन आले इतके ते सोपे होते. डॉक्टरशी समोरासमोर बसुन पाहीजे तितके प्रश्ण विचारता आले असते. रात्री-अपरात्री गरज लागली तर कदाचीत डॊक्टरने फोन उचलुन मदतही केली असती. येवढ्या सगळ्या जमेच्या बाजु आहेत! मग आपण इथे काय करतोय? कशासाठी इथे रहातो? पैसा? मान-मरातब? सुखसोयी? पैसा आहे पण रोजचे घरचे काम आपले आपणच करावे लागते. अगदी कितीही कंटाळा आला तरी भांडी घासणे, केर, स्वयंपाक हे सगळे आपले आपणच बघावे लागते. भाजीपाला, किराणा सामान आपले आपणच घरात आणावे लागते.
पण हवेचे प्रदुषण, आवाजाचे प्रदुषण नाही. शनिवार रविवार सुट्टी अपल्याला आवडते ते शिकण्यात घालवता येते. शिक्षण पुढे चालु ठेवता येते. मुलांसाठी सुसज्ज पाळणाघरे आहेत आणि तिथे मुलांची आबाळ होणार नाही ह्याची खात्री असते. जात-पात, धर्माच्या नावावर चालणारे दंगे नाहीत. रोजच्या व्यवहारात तुम्हाला तुमच्या जातीचा दाखला द्यावा लागत नाही. सामाजीक समानता जाणवते. तुमच्या उत्पन्नाच्या प्रमाणात तुम्हाला आयकर द्यावाच लागतो. एखाद्या कागदपत्रासठी उगीचच अडवणुक केली जात नाही. रस्ते, पाणी, वीज, वहातुक ह्यासारख्या रोजच्या गरजांसाठी धावपळ करावी लागत नाही.

एकीकडे राहीले तर घरचे सगळे जवळ आहेत पण रोजच्या जगण्यासठी कराव्या लागणा~या लढाईत आपण जगणेच विसरुन जाउ की काय अशी भीती आहे. दुसरीकडे सुसज्ज सोयीनी जगताना घरच्यांपासुन, आपल्या देशापासुन, आपल्या मुळांपासुन फ़ारकत घेतोय की काय अशी भीती आहे.

ऐलतीरी राहायचे की पैलतीरी हया प्रश्नाचे उत्तर प्रत्येकाने आपापल्या आवडीनुसार, परीस्थीतीनुसार, घ्यायचे असते, घेतलेलेही असते.

Wednesday, July 18, 2007

अविनाश धर्माधिकारी

गेल्या शनिवारी अविनाश धर्माधिकारी यांचे भाषण ऐकण्याचा योग आला. त्यांचा हा बे एरीया मधला तिसरा कार्यक्रम आणि मला हे तिनही कार्यक्रम पहायचा आणि ऐकायचा योग आला. मला हा कार्यक्रम तितकासा आवडला नाही कारण नसलेले नाविन्य! आणि मुख्य म्हणजे महाराष्ट्र मंडळाच्या कार्यक्रामात दिसणा~या सर्व चुका परत एकदा दिसल्या. जवळपास ३०% लोक लहान मुलाना घेऊन आले होते आणि त्यांची रडगाणी सतत चालु होती आणि आईवडीलांजवळ थोडीसुद्धा courtsey नव्हती की आपल्यामुळे लोकाना त्रास होतोय तर बाहेर घेउन जावे. महाराष्ट्र मंडळाची निवेदिका बोलताना आपण घरगुती गप्पा मारतोय ह्या पद्धतीने निवेदन करत होती. शेवटी म.मं.च्या नेहेमीच्या सवयीप्रमाणे त्यांनी ह्यावर्षीच्या सगळ्या कार्यक्रमांची जाहीरात करुन घेतली!

आता थोडे भाषणाविषयी! धर्माधीकारींचे स्वत:चे कार्य, व्यक्तीमत्व इतके मोठे आहे की त्याविषयी कधीही ऐकायला कंटाळा येत नाही. पण हा कार्यक्रम न आवडण्याचे मुख्य कारण असे की जाहीरात करताना २०२० चा भारत अशी केली होती आणि त्याबद्दल एकही वाक्य ते बोलले नाहीत. त्यांना न विचारताच कार्यक्रमाचे नाव जाहीर केले होते की काय अशी शंका आली. सुरुवात करताना त्यांनि असे जाहीर केले होते की शेवटी चर्चेसाठी वेळ राखून ठेवण्यात येईल पण तेवढा वेळच पुरला नाही. शेवटी ३ लोकानी चाणक्य मंडळाच्या कार्याबद्दल सांगण्याचे प्रयोजन काय हे कळले नाही. ते जे बोलले त्यातले मला जवळपास ४०% आधीच्या भाषणांमुळे, त्यांच्याबद्दल इतर कुठे वाचल्यामुळे माहीती होते. परत ऐकण्यात स्वारस्य नव्हते असे नाही पण नवीन ऐकायला जास्त आवडले असते. या माणसाचे कार्य प्रचंड आहे आणि आधी केले मग सांगीतले असे असल्याने प्रभाव जस्ती पडतो हे पण तितकेच खरे. स्वत:च्या कामावर त्यांचा प्रचंड विश्वास आहे आणि स्वत:चे कठोर परीक्षण करण्याची बुद्धी आहे. ३ वर्षांपुर्वी ते आलेले असताना त्यांनी भारताचा स्वयंपूर्णतेकडे होणारा प्रवास उदाहरणे देउन सांगितलेले आठवतेय. त्यापद्धतीने ते बोलले असते तर ते जास्त सयुक्तीक ठरले असते. हे भाषण आनंद निश्चीत देउन गेले, दुपारी घरी डुलक्या घेण्यापेक्षा काहीतरी चांगले ऐकल्याचे समाधान मिळाले. आणि इतर देशातुन येणा~या वक्त्यांपेक्षा त्यांचा ’तुम्ही इथे राहुनही आपल्या देशासाठी काहीतरी करु शकता’ हा दिलासादायक सुर पण आवडला. आणि इथे रहातो म्हणुन खिल्ली उडवणे, इथे येउन फ़क्त मदतीची अपेक्षा न करणे हेही वेगळे जाणावले.

शेवटी बाहेर पडल्यावर जाणवलेले आणि अजुनही सतत जाणवत रहाते ते म्हणजे ह्या माणसाची दुर्दम्य इच्छाशक्ती, आपल्या देशाबद्दलची श्रद्धा, देश एक महासत्ता होऊ शकेल हे स्वप्न उराशी बाळगुन आपण त्यादृष्टीने काय करु शकतो ह्याची जाणीव करुन देणारा प्रचंड आशावाद, कार्यकर्ता कसा असावा ह्याबद्दलची स्पष्ट आणि पडखर मते. आपल्या कार्याबद्दलची आत्मीयता आणि तळमळ. या आणि कदाचीत फ़क्त याच कारणांसाठी कदाचीत मी कित्येकवेळा हा कार्यक्रम पहायला-ऐकायला जाईन.